वडाच्या पानांवर मोठ्या प्रमाणात               साचलेली धूळ.

हवेतील घन धुळीचे प्रमाण हे वायुप्रदूषणाचे साधारण मापक म्हणून बऱ्याचदा वापरले जाते. ०.०१-१०० मायक्रॉन आकाराचे धुळीचे कण आकारमानाप्रमाणे काही वेळ हवेत तरंगत राहतात. ते श्वसनक्रियेत अडथळा आणतात व दृष्टीवर परिणाम करतात.

धुलिकण प्रदूषणात वनस्पतिजन्य कण म्हणजे बुरशी, बीजकण आणि नैसर्गिक मातीचे कण असतात. कारखाने, उद्योगधंद्यांमुळे येणारे कण म्हणजे कापसाचे धागे, धूर, वाहनांच्या रबरी टायरचे कण, माती बांधकामातून येणारी धूळ, सिमेंट आदींचा समावेश होतो.धुळीचे कण रसायनयुक्त असल्यास त्याचे परिणाम त्या रसायनाप्रमाणे होतात. परंतु सहसा धूळ सिलिका असते. ती वनस्पतींना विषारी ठरत नाहीत. धूळ मोठ्या प्रमाणात पानावर साचल्यास तिच्या थरामुळे पानांचा श्वासोच्छवास व प्रकाशसंश्लेषण या क्रियांना अडथळा येऊ शकतो. सूर्यप्रकाशात धुळीचा थर तापून पानांना इजा पोहोचू शकते. सिमेंट कारखान्याच्या परिसरातल्या झाडांवर पडलेला थर पानाच्या ओलाव्याने पृष्ठावर घट्ट बसतो आणि धूळ झटकण्याच्या प्रयत्नात पान सोलले जाऊन झाडास अपायकारक ठरते.

शेती, बागा व मळे यांतील पालापाचोळा आणि पिकांचे शेष तेथेच जाळण्यामुळे आसपासच्या झाडांवर दुष्परिणाम होतो,असेही आढळून आले आहे.

संदर्भ :

  • Darley, E.F. Studies on the effect of cement kiln dust on vegetation, J.Air Pollut. Contr.Assoc. 16:145 – 150., 1966.
  • Pierce, G.J. The possible effect of cement dust on plants, Science, 30:775.

समीक्षक – बाळ फोंडके

प्रतिक्रिया व्यक्त करा