बिंबिसार : (इ.स.पू.सु. ५५८—४९१). बिंबिसार हा मगध राज्याचा राज्यकर्ता होता. बुद्धचरितानुसार हर्यंक या घराण्यातील भट्टिय नावाच्या एका छोट्या टोळीच्या प्रमुखाचा तो मुलगा. वयाच्या १५व्या वर्षीच तो टोळीप्रमुख झाला. इतर टोळ्यांचा पराभव करून राजगीर येथे त्याने आपली छोटी राजधानी स्थापन केली आणि आपले राज्य स्वपराक्रमाने वाढविले. त्या काळात अनेक छोटी तसेच काही विस्तृत राज्ये १६ महाजनपद म्हणून ओळखली जात होती. महाभारतापासून सुप्रसिध्द असलेले मगध साम्राज्य तोपावेतो लयास गेले होते. पूर्वेकडील अंगदेशाचा पराभव करून बिंबिसारने मगध साम्राज्याची पुनर्स्थापना केली. त्याच्या विवाहामुळे जोडल्या गेलेल्या संबंधांकरवी त्याच्या राज्याची आणखी वाढ झाली. बिंबिसार मगध साम्राज्याचा संस्थापक म्हणून ओळखला जातो. गौतम बुद्ध यांच्या संपर्कात आल्यावर त्याने बुद्ध धर्म स्वीकारला आणि राजगृह या राजधानीची नीव घातली.

बिंबिसार एक पराक्रमी राजा म्हणून प्रसिद्धीस आला. गंगा नदीच्या खोऱ्यात वसलेले त्याचे राज्य सुपीक होते. त्याच्या राज्यात सुबत्ता होती आणि लोक गुण्यागोविंदाने नांदत होते. राज्यात लोखंडाच्या खाणी असल्यामुळे शस्त्र आणि अवजार निर्मितीचा उद्योग विकसित झाला होता. त्यामुळे राज्याच्या उत्कर्षाला चालनाही मिळाली. बिंबिसार एक कसलेला सेनानी होता. त्याने हत्तींचा वापर लढाईत नद्या-नाले सहजपणे ओलांडण्यासाठी आणि शत्रूच्या किल्ल्यांवर हल्ला करण्यासाठी परिणामकारकरीत्या केला. घोडदळाचा वापर करून शत्रूवर अचानक हल्ला करण्यावर त्याचा जोर होता. पायदळ आणि घोडदळ यांचा प्रभावी वापरामार्गे प्रतिस्पर्ध्यांवर अनेक लढायांत मात करून बिंबिसार एक यशस्वी सेनानी म्हणून नावारूपाला आला.

संदर्भ :

  • Deshpande, Suhasini & Other, History of Ancient and Mediaeval India, Ashwamedh Prakashan, 1994.

समीक्षक – सु. र. देशपांडे

प्रतिक्रिया व्यक्त करा