हेमचंद्र : (११ वे शतक). गुजरातमधील जैन साधू आणि प्रतिभाशाली लेखक.सिद्धराज व कुमार पाल या दोन श्रेष्ठ सोलंकी राजांच्या कारकिर्दीत हेमचंद्राच्या मार्गदर्शनाखाली गुजरातच्या सांस्कृतिक प्रगतीत वाढ झाली असे मत मांडण्यात येते. हेमचंद्र स्वत: सर्जनशील लेखक नव्हते; पण व्याकरण, भाषाशास्त्र व काव्यशास्त्रात त्यांनी विपुल निर्मिती केली.अनेकार्थसंग्रह, अभिधान चिंतामणी, देशीनाममाला हे कोशग्रंथ आणि छन्दोनुशासन व काव्यानुशासन हे काव्यविषयक ग्रंथ त्यांनी लिहिले. त्यांची साहित्यविषयक दृष्टी मर्यादित नसून फार विशाल होती. पण त्यांचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ म्हणजे सिद्ध-हेम-शब्दानुशासन हा होय. त्यात संस्कृत, प्राकृत व अपभ्रंश भाषांचे व्याकरण आहे. पाणिनीने संस्कृत भाषेसाठी जे कार्य केले तेच कार्य हेमचंद्राने प्रथम अपभ्रंश भाषेच्या व्याकरणाची संहिता बनवून केले. आपल्या प्राकृत अवतरणात उद्धृत केलेल्या काही अपभ्रंश दुह्याची भाषा म्हणजे अपभ्रंश भाषेची शेवट शेवटची अवस्था किंवा गुजराती भाषेची गर्भावस्था असे म्हटले जाते. नरसिंहराव दिवेटिया तिला अंतिम अपभ्रंश अथवा गुर्जर अपभ्रंश म्हणतात. हेमचंद्राने ह्या भाषेचे व्याकरण सविस्तर व बारकाईने दिलेले असून आपल्या प्रत्येक विधानाचे समर्थन लोकांच्या बोलीभाषेतून व तत्कालीन काव्यग्रंथातून उदाहरणे देऊन केले आहे. हेमचंद्रांनी दिलेली ही उदाहरणे काव्य गुणांनी समृद्ध असून जुन्यातील जुने प्राचीन गुजरातीचे नमुने म्हणुन त्याकडे पाहता येते.
संदर्भ :
- दिवेटिया, नरसिंहराव, गुजराती लँग्वेज अँड लिटरेचर, फॉर्बस गुजराती सभा, १९२४.