संगणकाचा एक प्रकार. पामटॉप संगणक हा एक वैयक्तिक संगणक किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. ज्यामध्ये संगणकासारखे अनेक वैशिष्ट्ये असतात आणि तो आपल्या हाताच्या तळव्याच्या आकाराचा असतो. पामटॉप हा वैयत्तिक माहिती साहाय्यक उपकरण (पर्सनल डिजिटल असिस्टंट डिव्हाइस; Personal Digital Assistant Device) आहे. पूर्ण-आकाराच्या संगणकाशी तुलना केल्यास पामटॉप कार्याच्या बाबतीत खूपच मर्यादित आहेत, परंतु ते काही विशिष्ट कार्यांसाठी व्यावहारिक आहेत. जसे फोनबुक (Phonebook) आणि कॅलेंडर (Calender). काही पामटॉपमध्ये माहिती समाविष्ट करण्यासाठी एक कीबोर्ड ऐवजी पेन (Pen) वापरतात, त्यांना सहसा हाताने पकडलेले संगणक (हॅण्ड हेल्ड; Hand Held Computer) किंवा पीडीए (PDA) म्हटले जाते.
पामटॉप हे वैयक्तिक संगणक असून हलके, लहान, बॅटरीवर चालविले जाणारे, सामान्य हेतू कार्यांसाठी योग्य संगणक आहे. डेस्कटॉप संगणकाशी (Desktop Computer) सुसंगत असलेल्या ऑपरेटिंग सिस्टिमच्या (Operating System; परिचालन प्रणाली) व्यतिरिक्त, एका पामटॉप मध्ये विशेषत: वर्ड प्रोसेसर (Word Processor), स्प्रेडशीट (Spreadsheet) या संगणक आज्ञावल्या (प्रोग्राम; Programme) आणि एक कॅलेंडर व फोनबुक असते. तसेच यामध्ये इतर अनेक आज्ञावल्या समाविष्ट करून अंमलात आणल्या जाऊ शकतात आणि माहिती (डेटा; Data) सहसा डेस्कटॉप संगणकामध्ये आणि त्या संगणकामधून हस्तांतरित केली जाऊ शकते. पामटॉपच्या लहान आकारामुळे, बहुतांश पामटॉप संगणकमध्ये डिस्क ड्राईव्हचा (Disk Drive) समावेश नसतो. तथापि, अनेकांमध्ये PCMCIA स्लॉट असतात ज्यामध्ये आपण डिस्क ड्राइव्ह (Disk Drive), मॉडेम (Modem), मेमरी (Memory) आणि इतर डिव्हाइसेस समाविष्ट करू शकतो.
जेव्हा संगणक मोठे व अवजड होते, लहान मोबाइल फोनही नव्हते आणि अगदी स्मार्टफोन्स (Smartphone) सुद्धा शोधलेले नव्हते तेव्हा पामटॉप संगणक हा शब्द लवकर वापरला जात होता. आज, या शब्दाचा वापर स्मार्टफोनच्या शोधामुळे आपल्या हातात असलेल्या संगणकाचे वर्णन करण्यासाठी क्वचितच केला जातो. पहिले पामटॉप संगणक डीआयपी पॉकेट पीसी आणि अटारी पोर्टफोलिओ होते, दोन्ही १९८९ मध्ये वापरकर्त्यांसाठी उपलब्ध झाले होते.
पामटॉप संगणकाची काही उदाहरणे खालीलप्रमाणे :
- हेवलेट पॅकार्ड 95 एलएक्स (Hewlett Packard 95LX)
- हेवलेट पॅकार्ड पामटॉप एफएक्स (Hewlett Packard Palmtop FX)
- हेवलेट पॅकार्ड ओमनीगो 700 एलएक्स (Hewlett Packard OmniGo 700LX)
- पॉकेट पीसी क्लासिक (Pocket PC Classic)
- पॉकेट पीसी प्लस (Pocket PC Plus)
- शार्प पीसी-3000 (Sharp PC-3000)
कळीचे शब्द : #संगणक #फोनबुक #कॅलेंडर #डिस्कड्राइव्ह #DiskDrive #मोडेम #Modem #मेमरी #Memory#
संदर्भ :
- https://www.webopedia.com/TERM/P/palmtop.html
- https://www.computerhope.com/jargon/p/palmtop.htm
- https://www.encyclopedia.com/science-and-technology/computers-and-electrical-engineering/computers-and-computing/palmtop
समीक्षक : रत्नदीप देशमुख