संगणकीय मदरबोर्डवरील बस
संगणकीय मदरबोर्डवरील बस

संगणकीय बस ही एक संप्रेषण प्रणाली (Communication system) आहे, ज्याद्वारे संगणकातील एका घटकापासून ते दुसऱ्या घटकापर्यंत किंवा दोन निरनिराळ्या संगणकांमध्ये माहितीचे हस्तांतरण (Data transformation) होते. ही प्रणाली संगणकामध्ये मदरबोर्डवर (Motherboard) उपस्थित असून ती समांतर किंवा क्रमाने (Parallel or Series) स्वरूपात जोडलेली असते. संगणकीय बस आपले माहिती हस्तांतरणाचे कार्य नियमित अंतराने काटेकोरपणे करत असते. उदा., जर बस २०० MHz इतक्या वारंवारतेने चालत असेल तर ती प्रति सेकंदाला २०० दशलक्ष माहिती हस्तांतरणाचे कार्य पूर्ण करते. बस हे कोणत्याही शब्दाचे संक्षिप्त रूप नाही.

  • संगणकामध्ये मुख्यतः बसेस चे पाच प्रकार पडतात :

१. पत्ता बस (ऍड्रेस बस; Address Bus) :  पत्ता बस ही तारांचा किंवा ओळींचा एक समूह आहे जी स्मृती (Memory) किंवा आदान-प्रदान (Input-Output) उपकरणांचे पत्ता हस्तांतरण करण्यासाठी वापरली जाते. संगणकाच्या मांडणीनुसार पत्ता बस ही वेगवेगळ्या बिट्स (Bits = माहिती मोजण्याचे एकक) ची असू शकते. उदा., इंटेल ८०८५ सूक्ष्मप्रक्रियकामधील (Microprocessor) पत्ता बस ही १६ बिट्स एवढी होती.

२. माहिती बस (Data Bus) : सूक्ष्मप्रक्रियक, स्मृती आणि आदान-प्रदान या उपकरणांमध्ये माहिती बसचा उपयोग माहिती स्थानांतरित करण्यासाठी होतो. सूक्ष्मप्रक्रियकाला माहिती पाठविणे किंवा प्राप्त करणे आवश्यक आहे. म्हणून माहिती बसचा उपयोग करून एकाच वेळी माहिती पाठवता येते व प्राप्त करता येते (Bi-Directional). प्रक्रियकाचा वेग किंवा शब्द लांबी ही माहिती बसवर अवलंबून असते. उदा., ८०८५ हा सूक्ष्मप्रक्रियक ८ बिट्स आणि सूक्ष्मप्रक्रियक आहे कारण याच्या शब्दाची लांबी (Word Length) ८ बिट्स असते.

३. नियंत्रण बस (Control Bus) : सूक्ष्मप्रक्रियक हा माहिती वर प्रक्रिया करण्यासाठी नियंत्रण बसचा वापर करतो. नियंत्रण बस माहिती वाचण्याचे, माहिती लिहिण्याचे, पत्ता वाचण्याचे इत्यादी. काम करते. सूक्ष्मप्रक्रियक विविध प्रकारे नियंत्रण बसचा वापर करते. नियंत्रण बस ही एक समर्पित बस आहे, कारण सर्व संकेत (Signal) हे नियंत्रण संकेतानुसार तयार होते.

४. प्रणाली बस (System Bus) : प्रणाली बस ही प्रक्रियकाला मदरबोर्डवर मुख्य स्मृतीला जोडते. प्रणाली बसला समोरील बाजूला असलेली बस (Front Side Bus), स्मृती बस, स्थानिक बस किंवा होस्ट बस असे देखील म्हणतात.

५. आदान-प्रदान बस (I/O Bus) : आदान-प्रदान बस ही वेगवेगळ्या परिधीय उपकरणांना प्रक्रियकाशी जोडून ठेवते. आदान-प्रदान बस प्रक्रियकाने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करून प्रणाली बस सोबत जोडणी करते.

कळीचे शब्द : #टोपाॅलाॅजी #नेटवर्किंग #मदरबोर्ड

संदर्भ :

समीक्षक : विजयकुमार नायक