कार्यवाद (भाषाविज्ञानातील) : कार्यवादी भूमिका ही भाषिक संरचनेला (आणि पर्यायाने रूपाला) भाषेच्या समाजगत, संदर्भगत कार्याचे फलित मानते. म्हणजेच भाषा म्हणून जे काही रूप आपल्याला दिसते तेच मुळी आकाराला येते ते भाषेच्या कार्यात्म स्वरूपामुळे. भाषेचा समाजात किंवा कोणत्याही संदर्भात होणारा वापर हाच भाषिक रूप निश्चित करीत असतो. त्यामुळे अर्थातच भाषिक अभ्यासात रूप निश्चित करणार्या कार्याचा अभ्यास करणे अर्थपूर्ण आहे अशी निष्ठा कार्यवादी अभ्यासकांची असते. या अंतर्गत सामाजिक भाषाविज्ञान, संदर्भलक्ष्यी भाषाविज्ञान, संभाषितविद्या इ. भाषा विज्ञानाच्या उपशाखांचा समावेश होतो.
भाषाविज्ञानातील कार्यवादाची पायाभरणी आधुनिक भाषाविज्ञानाच्या उदयानंतर झाली ती प्राग वर्तुळातील अभ्यासकांनी कार्यनिष्ठ भूमिका अंगीकारल्यानंतर. प्राग स्कूलप्रणीत कार्यवाद हा एका अर्थाने सोस्यूरीय संरचनावादाचे कार्यात्मक आकलन होते असे म्हणता येईल. भाषिक संरचनेची कल्पना ही अमेरिकी भाषाविज्ञानात चॉम्स्कीनंतर ठोस रूपवादी होत गेली तर प्राग स्कूलमध्ये भाषेच्या कार्यात्म अंगावर भर दिला गेला. जर्मन मानसशास्त्रज्ञ कार्ल ब्युलर यांच्या मते भाषेची तीन प्रमुख कार्ये होत, ती अशी: ज्ञानात्मक, अभिव्यक्तिपर आणि साधनपर. पहिले अर्थात ज्ञान, आकलन हे भाषेचे कार्य, दुसरे अभिव्यक्ति यात भावनिक आणि इतर अभिव्यक्तींचा समावेश होतो आणि तिसरे साधनपर म्हणजे भाषिककृतींमधून इतर व्यक्तींचे वर्तन, कृती प्रभावित करून एखादी गोष्ट साध्य करणे होय. या विस्तृत कार्याच्या विभागणीत अर्थात संभाषण, सामाजिकता, व्यक्तींचे साहचर्य या गोष्टी प्रधान होत्या. इथे मुद्दा हा आहे की हे कार्ये मूलभूत मानून जगभरातील भाषांत सापडणारे वाक्यांचे, अभिव्यक्तीचे प्रकार या कार्यांच्या परिभाषेत सांगता येतात असा दावा कार्यवादी भाषावैज्ञानिकांचा होता. उदा. सामान्य वर्तमानकाळी वाक्ये, एखादे विधान करणारी वाक्ये ही ज्ञानपर किंवा माहितीपर कार्य साधत असतात, तसेच इच्छापर किंवा संभाव्यतादर्शक वाक्ये अमुक एक भावना, इच्छा, दृष्टिकोन यांची अभिव्यक्ती करत असतात, तर विध्यर्थ, आज्ञार्थ वाक्ये ही दुसर्या व्यक्तीकडून काही कृती करवून घेणारी, अर्थात साधणारी असतात. अशा प्रकारे प्रत्येक व्याकरणगत रूप हे मूलतः कोणत्यातरी कार्याचे साधक असते, किंबहुना ही कार्येच त्या भाषिक रूपांच्या मुळाशी असतात.पुढे चालून स्वनविज्ञानातील स्वनिम ही ध्वनींमधील भेदावर आधारित कल्पनादेखील भाषेचे ज्ञानात्मक कार्य साधत असते अशी भूमिका कार्यवाद्यांनी घेतली. स्वनांमधील अर्थभेदकता ही ज्ञानात्मक असते तर स्वनमालिकेतील चढ-उतार, हेल हे अभिव्यक्तिपर असतात हे देखील कार्यवाद्यांनी नोंदवले. त्याचप्रमाणे स्वन हे शब्द, पदसमूह, वाक्य यांतील सीमांकन करणारेही असतात आणि सीमांकन करणे हेच स्वनांचे कार्य ठरते. अर्थात भाषेभाषेनुसार कोणते स्वन हे शब्दाच्या आरंभी, मध्ये आणि अंती यावे हे बदलत असते आणि त्या त्या भाषेसाठी ते ते स्वन त्याप्रकारचे कार्य करत असतात. इथे हा मुद्दा लक्षात घ्यायला हवा की प्राग वर्तुळात विकसित झालेल्या या कल्पना चटकन निर्देशनात्म व्याकरण परंपरेत रिचवल्या गेल्या. याचा अर्थ असा नाही की या कल्पना आकारनिष्ठच होत्या (कारण निर्देशनात्म व्याकरण हे चॉम्स्कीप्रणीत व्याकरण आकारनिष्ठ होते). कल्पना या भाषिक वर्णनाला पूरक होत्या त्यांच्या तळाशी कार्य आहे अथवा आकारिक जुळणी एवढाच काय तो फरक या भूमिकांमधून व्यक्त होतो. स्वनविज्ञानातील प्रागस्कूलप्रणीत संकल्पनांवर एकाएकी आकारिक की कार्यात्मक असा शिक्का मारता येत नाही. कार्यनिष्ठ भाषेच्या वर्णनात अर्थातच या समग्र भूमिकेची दखल घेतली जाते. भाषेचे कार्यनिष्ठ वर्णन अगर सिधान्तन. हे भाषिक कार्यांची सांगड रूपाशी घालत असते तर रूपनिष्ठ व्याकरण हे केवळ भाषिक रूपातील घटक हे एकमेकांशी कसे संलग्न असतात अर्थात त्यांची जुळणी कशी होत असते यावर प्रकाश टाकत असतात.प्राग वर्तुळातील आन्द्रे मार्तिने, सायमन डिक, हॅलिडे इ. भाषावैज्ञानिक हे भाषाविज्ञानातील कार्यवादाचे अग्रणी होते.