एक सात अंकी संस्कृत नाटक. राजकीय विषयावरील हे एकमेव संस्कृत नाटक असून त्याचा कर्ता विशाखादत्त आहे. नाटकाच्या प्रारंभकात विशाखादत्ताने स्वत:विषयी पुढीलप्रमाणे माहिती नोंदविली आहे; ती अशी याचा पितामह वटेश्वरदत्त किंवा वत्सराज कोणत्या तरी देशाचा सामन्त होता आणि पिता भास्कर दत्त किंवा पृथू याने महाराज ही पदवी धारण केली होती.

विशाखादत्ताच्या कालाविषयी विद्ववानांत मतभेद आहेत. नाटकाच्या भरतवाक्यात एक राजाने नाव दिले आहे. ‘‘म्लेछांनी त्रस्त केलेल्या या पृथ्वीचे हा राजा रक्षण करो’’, असे तिथे म्हटले आहे. निरनिराळ्या मुद्राराक्षसाच्या हस्तलिखित प्रतींत अवंतिवर्मा, दंतिवर्मा व चंद्रगुप्त अशी नावे आढळतात आणि या राजांचे काळ भिन्न असल्यामुळे तत्संबंधी निश्चित अनुमान काढणे वा एकमत होऊ शकत नाही. श्री तेलंग व प्रा. धुव यांच्या मते भरतवाक्यातील पार्थिवो अवन्निवर्मा हा पाठभेद ग्राह्य धरून कनोजचा मौखरी वंशीय अवन्तिवर्मा (कार. ५८०-६००) हा विशाखादत्ताचा आश्रयदाता राजा होता. त्याचा मुलगा ग्रहवर्मा याच्याशी स्थानेश्वराचा राजा हर्षवर्धन याची बहीण राज्यश्री हिचा विवाह झाला होता. त्या सुमारास वायव्य भारतात म्लेच्छांचा (हूणांचा) उपद्रव वाढला होता. तेव्हा अवन्ति वर्म्याने स्थानेश्वरच्या प्रभाकर वर्धनाच्या मदतीने हूणांचा इ. स. ५८२ च्या सुमारास पराभव केला. त्यावरून विशाखादत्त इ. सनाच्या सहाव्या शतकाच्या उत्तरार्धात झाला असावा, हे सयुक्तिक ठरते.

चाणक्याने चंद्रगुप्त मौर्याचे राज्यशासन दृढमूल करण्यासाठी राजकारणी डावपेच लढवून नंदराजाचा अमात्य राक्षस याच्यावर जी बौद्धिक मात केली. ती या नाटकाची पार्श्वभूमी आहे. राक्षसाच्या सर्व कारस्थानांना हुशार चाणक्य आतूनच सुरूंग लावतो. राक्षसाची ‘मुद्रा’ (अंगठी) गुप्त हेराकरवी हाती येताच, कपट लेख लिहवून, राक्षसाच्या साहाय्यक राजांचा तो धुव्वा उडवितो. एकीकडे चंद्रगुप्तात व आपल्यात बेबनाव झाल्याचे दाखवून दुसरीकडे राक्षसाच्या कुटुंबाला आश्रय देणाऱ्या चन्दन दासावर राजद्रोहाचा आरोप ठेवून त्याला सुळी देण्याचे नाटक चाणक्य रचतो. मित्राचे प्राण की शत्रूचे अमात्यपद असा राक्षसापुढे डाव टाकून त्यासाठी घटनाव्यूह रचून त्याला चंद्रगुप्ताचे अमात्यपद स्वीकारवयास भाग पाडतो आणि प्रतिज्ञापूर्तीच्या आनंदात तपश्यर्येसाठी निघून जातो. नाटकातील सुरुवातीपासून शेवटपर्यंतच्या सर्व घटना राक्षसाला वश करण्याच्या दिशेने योजल्या आहेत आणि त्या सर्व गुंतागुंतीच्या आहेत. राजनीती या एकाच विषयाला वाहिलेल्या या नाटकात चाणक्य आणि राक्षस यांचा बौद्धिक संघर्ष हे नाट्यकथेचे सूत्र आहे. त्यामुळे या नाटकात शृंगार, भावचित्रे, अलंकारिक भाषा विलास इत्यादी रंजक संकेत नाहीत. स्त्री पात्रही एकच चंदनदासाची पत्नी आहे. यात प्राधान्य आहे ते वीररसाला. संस्कृत नाटकातील ही एक अद्वितीय साहित्यकृती असून अन्य संस्कृत नाटकांप्रमाणे याची कथा प्रणय किंवा युद्ध या विषयावर आधारलेली नाही. हे नाटक पूर्णपणे ऐतिहासिक असून कूटनीतीवर आधारलेले बुद्धिविलासाने नटलेले एकमेव होय.

त्याचे इंग्रजी, जर्मन, फ्रेंच, इटालियन भाषांत अनुवाद झालेले आहेत. मराठीत कृष्णशास्त्री राजवाडे (१८६७) आणि जयराम केशव अनसारे (१९००) यांनी अनुवाद केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा