शिलाहार हे महाराष्ट्रातील एक मध्ययुगीन राजघराणे. या राजघराण्यातील राजांनी विद्या, कला आणि साहित्य यांना उदार आश्रय दिला होता. त्यांच्या काळात अनेक उत्तमोत्तम असे ग्रंथ संस्कृत आणि प्रादेशिक भाषांमध्ये निर्माण झाले. काळाच्या ओघात यांतील बहुतांश ग्रंथसंपदा नष्ट झाली आहे. यांपैकी संस्कृत कवी सोड्ढलरचित उदयसुन्दरीकथा, याज्ञवल्क्यस्मृतीवरील अपरार्कटीका आणि सोमदेवाची जैनेंद्रव्याकरणावरची शब्दार्णवचन्द्रिका हे  ग्रंथ उपलब्ध आहेत. तसेच कर्णपार्याचा नेमिनाथपुराण हा कन्नड भाषेतील एकमेव ग्रंथ आज संदर्भग्रंथ म्हणून उपयोगी आहे. शिलाहार राजांच्या दरबारी अनेक प्रतिभावान कवींना आश्रय मिळाला होता, हे त्यांच्या ताम्रपटातील भाषेचा दर्जा आणि मजकुराची सुंदर रचना यावरून लक्षात येते. परंतु त्यांची नावे अज्ञात आहेत.
कवी सोड्ढलकृत उदयसुन्दरीकथा : शिलाहार नृपती मुम्मुणिराज याचा आश्रित  सोड्ढल कवी याचे हे चंपू प्रकारातील गद्य काव्य असून यात नागलोकाची राजकन्या उदयसुंदरी आणि प्रतिष्ठान म्हणजेच पैठणचा राजा मलयवाहन यांच्या लग्नाची कथा आहे. हे काव्य आठ उच्छ्वासांमध्ये रचले आहे. त्याच्या सुरुवातीला आणि शेवटी कवीने स्वतःविषयी आणि आपल्या घराण्याविषयी माहिती दिली आहे. हर्षचरितकर्ता कवी बाण याचा या काव्यावर विशेष प्रभाव दिसून येतो. तसा उल्लेख सोड्ढलाने काव्यात केला आहे. या काव्यात अनेक समकालीन राजांचे उल्लेख असल्यामुळे याच्या रचनेचा काळ ठरवणे तुलनेने सोपे जाते. इ. स. च्या अकराव्या शतकात याची निर्मिती झाली असावी. या काव्यातील उल्लेखांवरून असे दिसते की, याची निर्मिती लाटदेश (दक्षिण गुजरात) आणि उत्तर शिलाहार राज्यांच्या सीमावर्ती भागात झाली असावी. कवीने यात समासांचा भरपूर वापर केला आहे; परंतु त्यात श्लेष नसल्यामुळे काव्य सहजसुंदर झाले आहे. कवीची सौंदर्यदृष्टी आणि अचूक निरीक्षणशक्ती काव्यातील विविध वर्णनांवरून प्रत्ययास येते. समकालीन कवी व त्यांचे काव्यग्रंथ तसेच  शिलाहार नृपती मुम्मुणी याने केलेला आदरसत्कार यांचे वर्णनही या काव्यात आले आहे. आरंभीच्या चंपू काव्याचे उदाहरण म्हणून संस्कृत साहित्याच्या इतिहासात या काव्यास महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.

याज्ञवल्क्यस्मृतीवरील अपरार्कटीका : या ग्रंथाचे श्रेय शिलाहार नृपती पहिला अपरादित्य किंवा अपरार्क याला देण्यात येते. ग्रंथाच्या सुरुवातीला प्रास्ताविक श्लोकात ग्रंथकर्त्याविषयी माहिती आहे. त्यात कवीने स्वतःला जीमूतवाहनाच्या वंशातील म्हणविले आहे. तसेच टीकेच्या शेवटच्या श्लोकामध्ये आलेल्या वर्णनानुसार कवी राज्यकर्त्या वर्गातला असावा, याची खात्री पटते. जीमूतवाहनाचा वंश म्हणजे शिलाहार वंश हे सर्वज्ञात आहे. तेव्हा या ग्रंथाचा कर्ता शिलाहार राजा पहिला अपरादित्य हा असण्याची दाट शक्यता आहे. अनेक इतिहासकारांचे मत असे आहे की, या ग्रंथाची निर्मिती अपरादित्याच्या दरबारातील पंडितांनी केली असावी; परंतु त्याचे श्रेय मात्र राजाला दिले गेले असावे. या ग्रंथाची निर्मिती इ. स. च्या बाराव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात झाली असावी, असे अभ्यासकांचे मत आहे. अपरार्काच्या या  ग्रंथास पूर्वोक्त प्रास्ताविक श्लोकात टीका म्हटले असले, तरी ती रूढ अर्थाने टीका नसून मूळ ग्रंथाचे अधिक स्पष्टीकरण करण्यासाठी लिहिलेला निबंध आहे, असे ग्रंथकर्त्यानेच अखेरच्या श्लोकात म्हटले आहे. अपरार्क ज्या वेळी ह्या ग्रंथाची रचना करत होता, तोपर्यंत हिंदू समाजात धार्मिक व सामाजिक बाबतींत अनेक बदल घडून आले होते. अपरार्काने याज्ञवल्क्यऋषींच्या वचनांचा सरळ अर्थ सांगितला आहे. त्यानंतर त्यावरची इतर धर्मशास्त्रकारांनी मांडलेली मतेही सांगितली आहेत आणि मग त्याविषयी स्वतःचे मत मांडले आहे. हा ग्रंथ काश्मीरमध्ये प्रमाण मानला जातो.

सोमदेवकृत शब्दार्णवचन्द्रिका : महाराष्ट्रातील शिलाहार या मध्ययुगीन वंशातील कोल्हापूर शाखेतील दुसरा शिलाहार भोज राजा याचा आश्रित कवी सोमदेव (सोमेश्वर) याने जैनेंद्र व्याकरणावरच्या गुणनंदीकृत शब्दार्णव  या ग्रंथावरील शब्दार्णवचन्द्रिका  ही टीका लिहिली. या ग्रंथाच्या शेवटी असा उल्लेख आढळतो की, याची रचना श्रीकोल्लापुर देशातील आजुरिका महास्थानामध्ये महामंडलेश्वर गंडरादित्याने बांधलेल्या त्रिभुवनतिलकनामक जिनालयात (वसतीत) पूर्ण केली. श्रीकोल्लापूर म्हणजे आजचे कोल्हापूर आणि त्यातील आजुरिका म्हणजे आजचे कोल्हापूर जिल्ह्यातील आजरे गाव होय. याची रचना शिलाहार राजा वीरभोजदेवाच्या काळात इ. स. १२०५ मध्ये झाली. ग्रंथात लेखक स्वतःला तीर्थंकर महावीरांचा अनुयायी म्हणवतो. या टीकेची रचना मूलसंघाच्या माघचंद्राचा शिष्य नागचंद्र याच्या हरिचंद्र नावाच्या शिष्याकरिता केली. सोमदेवाने आपल्या ग्रंथात दिलेली उदाहरणे सामाजिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाची आहेत.

कर्णपार्याकृत नेमिनाथपुराण : कोल्हापूरचे शिलाहार राजे आणि त्यांचे मांडलिक यांनी कन्नड ग्रंथकारांनासुद्धा उदार आश्रय दिला होता. या ग्रंथाची रचना कर्णपार्याने केली. हा शिलाहार राजा विजयादित्य याचा समकालीन होता. त्याने या ग्रंथात विजयादित्य आणि त्याचा पिता गंडरादित्य यांची स्तुती केली आहे. त्याने हा ग्रंथ कोल्हापूर जिल्ह्यातील हेर्ले गावात असलेल्या चंद्रप्रभ तीर्थंकर यांच्या त्रिभुवनतिलक नावाच्या मंदिरात लिहिला. या ग्रंथात वर्णिलेली एक घटना ऐतिहासिक घटनेवर आधारित असावी, असा अंदाज इतिहासकारांनी व्यक्त केला आहे. ती म्हणजे राजा विजयादित्य याने गोमंथगिरीवर स्वारी करून ते जिंकून घेतल्याची घटना. कोल्हापूरचे शिलाहार राजे कर्नाटक राज्यामधील शिमोगा जिल्ह्यातील गोमंथ येथून आले होते आणि गोमंथगिरीमधील चंद्रगुप्ती ही त्यांची राजधानी होती, असे उल्लेख मिळतात. विजयादित्याने आपल्या पूर्वजांच्या भूमीवर ताबा मिळवला म्हणून आपल्या गोमंथशैलाग्रावरील जन्मभूमीला त्याने मुक्त केले आणि स्वतः तिला विभूषित केले, असे कर्णपार्याने म्हटले आहे. त्याने या ग्रंथात त्याच्या आधी होऊन गेलेल्या अनेक आचार्यांचा आणि ग्रंथकारांचा उल्लेख केलेला आहे.

शिलाहार काळातील प्रमुख साधनांमध्ये वरील समकालीन साहित्याचा समावेश होतो. समकालीन ग्रंथांमधून त्या काळातील सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि धार्मिक जीवनाविषयी अमूल्य माहिती मिळते. यामुळेच शिलाहार राजांच्या इतिहासलेखनासाठी या ग्रंथांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

 

संदर्भ :

  • Sharma, Sudarshan Kumar, Udaysundari Katha of Soddhala, Parimal
    Publications, Delhi, 2004.
  • Kane, P. V. History of Dharmasastra (Ancient and mediaeval Religious and
      Civil Law In India), Bhandarkar Oriental Research Insitute, Pune, 2006.
  • खरे, ग. ह. संपा., दक्षिणेच्या मध्ययुगीन इतिहासाची साधने, भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे, १९३०.
  • मिराशी, वासुदेव विष्णु, शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख, विदर्भ संशोधन मंडळ, नागपूर, १९७४.

                                                                                                                                                                                                                     समीक्षक – श्रीकांत गणवीर

प्रतिक्रिया व्यक्त करा