भारतात आलेले परकीय प्रवासी  : (सहावे ते अठरावे शतक).

प्राचीन काळापासून जगभरातल्या लोकांना भारतातील समृद्धता, सुबत्ता यांचे आकर्षण होते. याच आकर्षणामुळे अनेक परकीय लोक प्रवासी, राजदूत, धर्मगुरू, व्यापारी आणि सैनिक म्हणून भारतात येऊन गेले तसेच काहीजण कायमस्वरूपी येथेच राहिले. प्राचीन भारताबद्दल मिळणारी माहिती काही ऐतिहासिक ग्रंथांतून किंवा दंतकथांमधून जशी मिळते, तशीच ती परकीय प्रवाशांच्या वृत्तांतातून मिळते. स्वकीयांनी लिहिलेला इतिहास स्वधार्जिणा असू शकतो, पण परकीयांनी लिहिलेल्या वर्णनांत बहुतांश त्रयस्थ दृष्टीने केलेले वर्णन आढळते. काही वर्णनांत अतिशयोक्ती वर्णने वाचायला मिळतात. ही प्रवासवर्णने इतिहासाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची ठरतात. तसेच तत्कालीन परिस्थितीवर प्रकाश टाकणारी अभ्यासाची प्रमुख साधनेही होऊ शकतात.

प्रवासात जे प्रत्यक्ष पाहिले, अनुभवले ते लेखनरूपाने मांडणे म्हणजे प्रवासवर्णन, असे स्थूलमानाने म्हटले जाते. या प्रवासवर्णनांतून तत्कालीन प्रवासाच्या पद्धती, प्रवासी मार्ग, भौगोलिक वर्णने, तत्कालीन शहरांची वर्णने, राज्यकर्ते, राजकीय परिस्थिती, समाजजीवन, व्यक्तिविशेष, वेशभूषा, चलनपद्धती, व्यापार, देवाण-घेवाणीच्या पद्धती, धार्मिक-सामाजिक पद्धती, रीतीरिवाज, रूढी-परंपरा, भाषा यांचे दर्शन आपल्याला होते. ही प्रवासवर्णने वाचताना आपण तत्कालीन परिस्थिती तसेच लेखकाचे व्यक्तिमत्त्वसुद्धा अनुभवत असतो. सामान्यतः या सर्व प्रवासवर्णनांची पातळी हकिकतीची किंवा वृत्तांतकथनाची असल्याचे दिसते.

इ. स. सहाव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंतच्या काळात अरब, मोरक्कन, इराणी, अफगाणी, इटालियन, रशियन, डच, फ्रेंच, इंग्लिश, जर्मन, पोर्तुगीज इत्यादी प्रवासी भारतात येऊन गेल्याचे दिसते. या प्रवाशांनी आपापली प्रवासवर्णने लिहून ठेवली आहेत. परकीय भाषेत लिहिलेल्या त्यांच्या प्रवासवर्णनांची कालांतराने जगातील अनेक भाषांत भाषांतरेही प्रसिद्ध झाली आहेत.

मध्ययुगीन इतिहासाचा विचार करता ह्यूएनत्संग (युआनच्वांग; सु. ६०२-६६४), इत्सिंग हे चिनी प्रवासी सम्राट हर्षवर्धनच्या काळात म्हणजे इ. स. सातव्या शतकात भारतात येऊन गेले. यानंतर दहाव्या शतकातील राष्ट्रकूट काळात अल् मसुदी, अकराव्या शतकात महमद गझनीबरोबर त्याच्या स्वारीच्या वेळी अल्-बीरूनी, तेराव्या शतकातील महमद तुघलकाच्या काळात मार्को पोलो, चौदाव्या शतकात इब्न बतूता, पंधराव्या शतकातील विजयानगर काळात निकोलो दी काँती, अब्द-अल् रझ्झाक व बहमनी साम्राज्याच्या काळात निकितीन, सोळाव्या शतकातील कृष्णदेवरायाच्या काळात बार्थोलोमेऊ, बार्बोसा, दूमींगूश पाइश, फर्नाओ नूनीझ, सीझर फ्रेड्रिख, अकबराच्या राजवटीत अँथोनी डे माँसेरात, राल्फ फिच, जॉन लिंस्कोटेन, लामा तारानाथ, कॉस्मे द गॉर्दा, सतराव्या शतकातील जहांगीराच्या काळात विल्यम हॉकिन्झ, जॉन जुर्डान, निकोलस डफटन, निकोलस विथिंग्टन, सर थॉमस रो, पाल कॅनिंग, एडवर्ड टेरी, फ्रान्सिस्को पेलसर्ट, पेत्रा डेला व्हेले इत्यादी प्रवासी भारतात आले. तर शाहजहानच्या काळात जॉन लोयॅट, जॉन फ्रायर, पिटर मुंडी, ताव्हेर्ने आणि औरंगजेबाच्या काळात निकोलाव मनुची, फ्रान्स्वा बर्निअर, झां थेवेनोट, जेमेली कॅरी हे प्रवासी भारतात येऊन गेले. त्यांच्या वृत्तांतांमधून असे लक्षात येते की, बहुतेक प्रवासी हे भारताच्या पश्चिमेकडील प्रदेशांतून समुद्रमार्गे पश्चिम किनाऱ्यावरील सुरत, खंबायत व चौल अशा बंदरांवर उतरले व तेथून पुढील प्रवासाला लागले. तर काही प्रवासी खुष्कीच्या मार्गाने प्रसिद्ध अशा रेशीम मार्गावरून प्रवास करत आले. प्रत्येक प्रवाशाच्या लिखाणात भारताबद्दल नवीन व वेगळी माहिती मिळते. चिनी प्रवासी ह्यूएनत्संगच्या लेखनात त्याने भेट दिलेल्या प्रदेशातील जमिनीचा कस, उत्पन्न होणारी अन्नधान्ये, हवामान, लोक, त्यांचे आचारविचार, तेथील राज्यकर्त्यांची शासनपद्धती, धर्म, पंथ, मठ, धर्मग्रंथ, जतन केलेले बुद्धाचे अवशेष, त्यांविषयींच्या सांप्रदायिक कथा आणि चमत्कार यांबद्दल माहिती मिळते. त्याच्या प्रवासाचा वृत्तांत रेकॉर्ड्‌स ऑफ द वेस्टर्न रीजन्स ऑफ द ग्रेट तेंग डिनॅस्टी ह्या पुस्तकात आहे. तर इत्सिंगच्या लेखनात तत्कालीन धार्मिक व सांस्कृतिक माहिती तसेच बौद्ध धर्मातील विविध पंथ, बौद्ध मठांतील जीवन, भिक्षू व भिक्षुणी यांची वस्त्रे, अन्न, गुरुशिष्यसंबंध, रोग व त्यांवरचे औषधोपचार इ. विषयांसंबंधी सविस्तर माहिती मिळते.

अल्-बीरूनीच्या लेखनात भारतातील विविध विषयांमधील ज्ञान, ग्रंथसंपदा यांबद्दल विस्तृत महिती मिळते. मार्को पोलोने त्याने पाहिलेले देश, तेथील लोक व समाजजीवन, पशुपक्षी यांचे वर्णन केले आहे. इब्न बतूताच्या लेखनात अचूक भौगोलिक माहिती मिळते. निकितीनच्या वर्णनात भारतातील राज्यकर्त्यांचे वैभव, पराक्रम यांबद्दल माहिती मिळते, फिरिश्ता (१५५०-१६२३) याच्या गुलशन–इ-इब्राहिमी (१६०६; तारीख-इ-फिरिश्तातारीख-इ-नवरस-नामा या नावांनीही प्रसिद्ध) या ग्रंथात आदिलशाही, निजामशाही, बहमनी, इमादशाही, बरीदशाही, कुत्बशाही आणि फारुखीच्या काळातील विश्वसनीय माहिती मिळते. बार्बोसाच्या लेखनात तत्कालीन विजयानगर साम्राज्य व भारताच्या पश्चिम किनारपट्टीसंबंधी, विशेषतः कोकणपट्टीसंबंधी, तसेच तेथील व्यापाराबद्दल विस्तृत महिती मिळते.

लामा तारानाथच्या ग्रंथात बौद्ध धर्माबद्दल माहिती मिळते. जहांगीराच्या काळात इंग्रज वकील म्हणून आलेल्या थॉमस रोच्या लेखनात त्याने इंग्रजांच्या भारतात वखारी घालण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल माहिती मिळते. कॉस्मे द गॉर्दाच्या वर्णनात छत्रपती शिवाजी महाराज व पोर्तुगीज यांच्या परस्पर संबंधांबद्दल माहिती मिळते, तर मनुचीने औरंगजेबाचे दिल्लीच्या तख्तावर बसणे, पुरंदरची प्रसिद्ध लढाई, मोगलांचे दरबारी रीतीरिवाज यांबद्दल सांगितले आहे. त्याच्या आठवणींचे पहिले इंग्रजी भाषांतर या स्तोरिआ दो मोगोर या नावाने विल्यम आयर्विन याने १९०७ मध्ये प्रकाशित केले. औरंगजेबाच्या दरबारातील राजवैद्य म्हणून असलेल्या फ्रान्स्वा बर्निअर याच्या लेखनात दारा शुकोहचा वध, सुरतेची लूट, मोगल साम्राज्याच्या महसुलाचे उत्पन्न, फौजेचे पगार, तोफखाना अशी विविध माहिती मिळते. याच काळात  ताव्हेर्ने हा प्रवासी भारतात आला होता. भारतातील काही महत्त्वाची शहरे, त्यातील अंतरे, येथील रत्नांच्या खाणी, मिळणारी रत्ने, विनिमयाचे दर, चलन यांविषयीचे लेखन त्याने केले. आज या सर्व प्रवाशांची प्रवासवर्णने उपलब्ध आहेत.

मध्ययुगीन इतिहासाचा विचार करता सहाव्या शतकापासून भारतात आलेल्या प्रवाशांपैकी बरेच प्रवासी हे राजदूत, धर्मगुरू, व्यापारी अथवा सैनिक म्हणून भारतात आले होते. त्यांनी लिहिलेल्या प्रवासवर्णनांमुळे परकीयांना भारताबद्दल भुरळ पडली होती. अल्-बीरूनीचे प्रवासवर्णन प्रसिद्ध झाल्यानंतर भारतात येणाऱ्या प्रवाशांचा ओघ वाढल्याचे ध्यानात येते.

संदर्भ :

  • Commissariat, M. S. Mandelslo’s Travels in Western India (1638-39), London, 1995.
  • Elliot, H. M.; Dowson, John, The History of India. Vol. VI, London, 1875.
  • Gibb, H. A. R. Ed. Ibn Battuta, Travels in Asia and Africa, London, 1929.
  • Major, R. H. India in the Fifteenth Century : being A Collection of Narratives of Voyages to India, London, 1857.

                                                                                                                                                                                                                        समीक्षक : प्रमोद जोगळेकर