संस्कृतमधील दशरूपकांपैकी म्हणजे दहा नाट्यप्रकारांपैकी एक रुपकप्रकार. नाट्यशास्त्राच्या चौथ्या अध्यायात म्हटले आहे की,नाट्यवेदाची निर्मिती करून तो भरतमुनींच्या स्वाधीन केल्यावर आणि नाट्यमंडपाची निर्मिती झाल्यावर ब्रह्मदेवाने स्वतः रचलेल्या ‘अमृतमंथन‘ नावाच्या समवकाराचा प्रयोग करण्याची आज्ञा दिली. आणि त्याप्रमाणे समवकाराचा प्रयोग झाला; परंतु अलीकडे उपलब्ध संस्कृत नाटकांमध्ये समवकाराचे उदाहरण आढळत नाही.
नाट्यशास्त्रात समवकाराचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे. :
देवा सुरबीजकृत: प्रख्यातोदात्तनायकश्चैव|त्र्यङ्कस्तथा त्रिकपटस्त्रिविद्रवःस्यात्त्रिशृङ्गारः||(१८.५७)
द्वादशनायकबहुलो ह्यष्टादशनाडिकाप्रमाणश्च|वक्ष्याम्यस्याङ्कविधिं यावत्यो नाडिका यत्र||(१८.५८)
समवकार हे देव आणि असुर ह्यांच्या कृत्यांवर आधारित असते. ह्याचा नायक प्रख्यात व उदात्त असावा.तीन अंक,तीन प्रकारचे कपट,तीन प्रकारचे विद्रव (भयानक अनर्थ) व तीन प्रकारचा शृंगार (धर्मशृंगार, अर्थशृंगार व कामशृंगार)असलेला, बारा नायकांनी गजबजलेला आणि अठरा नाडिका म्हणजे घटका त्याचा प्रयोग चालणारा असावा.ह्याच्या अंकांची रचना आणि कोणत्या अंकात किती घटका येतात त्याचे स्वरूप पुढीलप्रमाणे:-
पहिला अंक प्रहसन, विद्रव, कपट आणि वीथी यांनी युक्त (विविध) क्रियांनी संपन्न व बारा घटकांच्या प्रयोगासाठी रचलेला असा करावा; त्याचप्रमाणे चार घटकांचा अवधी असलेला असा दुसरा अंक करावा आणि दोन घटका असलेला तिसरा अंक कथानकाची समाप्ती करणारा असावा.युद्ध व पूर यांमुळे उडालेला हाहाकार; वारा, आग, हत्ती यांच्यामुळे झालेला गोंधळ आणि नगराला वेढा पडल्यामुळे आलेले संकट असा तीन प्रकारचा विद्रव जाणावा.वस्तूच्या ठिकाणी असलेल्या वैशिष्ट्यामुळे उत्पन्न झालेले; वा दैवयोगाने प्राप्त झालेले आणि दुसऱ्याकडून सुख-दु:ख उत्पन्न करणारे असे तीन प्रकारचे कपट समवकारात असते.नाट्याचे नियम जाणणाऱ्यांनी धर्म, अर्थ आणि काम यांच्याशी संबद्ध असणाऱ्या कार्यांची प्रयोजने साध्य करणारा असा तीन प्रकारचा (धर्मशृंगार, अर्थशृंगार व कामशृंगार) शृंगार दाखवावा.उष्णिक्,गायत्री इत्यादी आणि दुसरे जे विषम रचनेचे छंद आहेत त्यांची योजना समवकारामध्ये करावी. समवकाराचे उदाहरण म्हणून अमृतमंथन (पयोधिमंथन वा समुद्रमंथन म्हणूनही विख्यात) ह्याचा उल्लेख केला जातो.त्यात देव आणि असुर यांच्या कार्याशी संबद्ध अशा घटना,कपट,विद्रव आणि शृंगारही आहे.अशीही एक शक्यता आहे की,ह्या प्रसंगावर आधारलेली एक दीर्घ कलाकृती नाट्यशास्त्रकाराला ज्ञात होती आणि तिच्या आधारेच त्याने समवकाराचे हे वर्णन केले असावे.दशरूपकात धनंजयाने म्हटले आहे की, समवकाराचे आमुख हे नाटकाप्रमाणे असावे. ह्यात विमर्श संधी नसते. ह्यात कैशिकीवृत्ती व्यतिरिक्त नाट्यवृत्ती असतात.दशरूपकातही अमृतमंथन ह्या समवकाराचा उल्लेख आढळतो.
संदर्भ :
- कंगले र.पं.(भाषांतरकार),दशरूपक-विधान,महा.राज्य साहित्य संस्कृती मंडळ,मुंबई,१९७४.
समीक्षक – शिल्पा सुमंत