इथिओपियात मिळालेली एक ऑस्ट्रॅलोपिथेकस प्रजात. इथिओपियन पुरामानवशास्त्रज्ञ बेरहान अस्फाव आणि त्यांचे अमेरिकन सहकारी टीम व्हाइट यांना मध्य आवाश भागात बौरी (Bouri) या ठिकाणी १९९० ते १९९७ दरम्यान नवीन ऑस्ट्रॅलोपिथेकस जीवाश्म मिळाले. त्यांनी या नव्या प्रजातीला ऑस्ट्रॅलोपिथेकस गार्ही असे नाव दिले (१९९७).

‘गार्हीʼ या शब्दाचा अर्थ स्थानिक अफार भाषेत ‘आश्चर्यʼ असा आहे. बीओयू-व्हीपी-१२/१३० ही कवटी या प्रजातीचा एकमेव अधिकृत नमुना आहे. या कवटीचे भूवैज्ञानिक वय २५ लक्षवर्षे आहे. या जीवाश्मांच्या बरोबर ओल्डोवान तंत्राशी साम्य असणारी दगडाची अवजारे मिळाली असली, तरी ती याच प्रजातीच्या प्राण्यांनी तयार केली होती किंवा काय, ते स्पष्ट झालेले नाही.

ऑस्ट्रॅलोपिथेकस गार्हीच्या कवटीचे आकारमान ऑस्ट्रॅलोपिथेकस प्राण्यांप्रमाणे ४५० घ. सेंमी. एवढे होते. ही कवटी निश्चितपणे ऑस्ट्रॅलोपिथेकस अफारेन्सिस आणि ऑस्ट्रॅलोपिथेकस आफ्रिकानस यांच्यापेक्षा निराळी आहे. या प्रजातीचे दात मोठे असून ते पॅरान्थ्रोपस (Paranthropus boisei) या प्रजातीशी साम्य दर्शवणारे आहेत.

इथिओपियन पुरामानवशास्त्रज्ञ योहानेस हाइली-सेलॅसी यांना बीओयू-व्हीपी-१२/१३० या कवटी खेरीज ऑस्ट्रॅलोपिथेकस प्राण्याच्या पायांची काही हाडे जवळच्या स्थळांवर मिळाली (२०१२). तथापि ती निश्चितपणे ऑस्ट्रॅलोपिथेकस गार्हीची असल्याचे मान्य झालेले नाही. तसेच या प्रजातीबद्दलची माहिती अपुरी असल्याने तिचे मानवी उत्क्रांतिवृक्षावरील स्थान स्पष्ट झालेले नाही.

संदर्भ :

  • Asfaw, B.; White, T.; Lovejoy, O.; Latimer, B.; Simpson, S. & Suwa, G. ‘Australopithecus garhi : a new species of early hominid from Ethiopia,’ Science 284, pp. 629-635, 1999.
  • Wolpoff, M., Paleoanthropology, Boston, 1999.

 समीक्षक – शौनक कुलकर्णी