एक मांसाहारी वन्य प्राणी. फेलिडी कुलातील या प्राण्याचे शास्त्रीय नाव ॲसिनोनिक्स जुबेटस आहे. आफ्रिका खंडात तो आढळतो. दाट वनांपेक्षा सपाट मैदानी गवताळ प्रदेश त्याला जास्त आवडतो. भारतात वायव्य दिशेला असलेल्या खिंडीमधून तो भारतात आला आणि उत्तर व मध्य भारतातील सपाट प्रदेश आणि पायथ्यांच्या टेकड्यांत तो स्थायिक झाला. तेथून तो दक्षिणेत — कर्नाटकापर्यंत पसरला. मात्र,सद्यस्थितीत चित्ता भारतातून नामशेष झाला आहे.
चित्ता (ॲसिनोनिक्स जुबेटस)

चित्ता सडपातळ व चपळ असतो. डोक्यापासून शेपटीच्या टोकापर्यंत चित्त्याची लांबी २-२.५ मी. असते. यात ०.६-०.७५ मी. लांबीचे शेपूट समाविष्ट असते. वेगाने पळताना क्षणात दिशा बदलण्यासाठी त्याला शेपटीचा उपयोग होतो. खांद्यापाशी त्याची उंची ६७—९४ सेंमी. भरते. छाती रुंद, तर कंबर बारीक असते. प्रौढ चित्त्याचे वजन ३५—६५ किग्रॅ. इतके भरते. डोके लहान व वाटोळे असून कानही लहानच असतात. डोळ्यांच्या बाहुल्या वर्तुळाकार असतात. नाकाच्या दोन्ही बाजूंना डोळ्यांपासून ओठाच्या कोपऱ्यांपर्यंत गेलेले दोन काळे पट्टे असतात. या पट्ट्यांना त्यांचे अश्रुमार्ग म्हणतात. त्वचा खडबडीत व रंगाने पिवळी असते. अंगावर वर्तुळाकार आणि आकाराने लहान असे भरीव काळे ठिपके असतात. पोटाकडील भाग फिकट असतो. पाय लांब असतात. पायांच्या नख्या अंशत: प्रतिकर्षी असल्याने बोथट असतात. नख्या काहीशा वाकड्या असतात; परंतु भक्ष्याचा पाठलाग करताना आपली दिशा बदलण्यासाठी या उघड्या नख्यांचा चित्त्याला अतिशय उपयोग होतो.

चित्त्याचे मुख्य भक्ष्य म्हणजे लहान हरणे. पक्षी, ससे किंवा इतर सस्तन प्राणी यांचीही तो शिकार करतो. प्रामुख्याने, दिवसाउजेडीच पण गरजेनुसार चांदण्या रात्रीही चित्ता शिकार करतो. शिकार करताना प्रथम चित्ता दबकत दबकत गवताच्या व झुडपांच्या आडोशाने भक्ष्याच्या जवळ जातो आणि भक्ष्य टप्प्यात आले म्हणजे त्याचा पाठलाग सुरू करतो. भक्ष्याचा पाठलाग करताना त्याचा वेग ताशी ८०—११० किमी. असतो. मात्र, दीर्घकाळ त्याला या वेगाने पळता येत नाही. या वेगाने तो सु. ३५० मी. एवढेच अंतर धावू शकतो. या धावेत भक्ष्य हाती लागले नाही, तर तो त्याचा नाद सोडून देतो. चित्ता हा सर्वाधिक वेगाने धावणारा सस्तन प्राणी आहे.

चित्त्यामध्ये नर मादीपेक्षा मोठा असतो. नर व मादी समागमासाठी एकत्र येतात. गर्भावधिकाल ८४—९० दिवसांचा असतो. मादीला एकावेळी २—४ पिले होतात. स्वतंत्रपणे राहण्यास सक्षम होईपर्यंत पिले आईबरोबर राहतात. चित्त्याचे आयुर्मान १०—१२ वर्षे असते. मात्र, सुरक्षित अवस्थेत तो सु.२० वर्षे जगू शकतो.

चित्ता व बिबट्या यांच्यामध्ये पुष्कळदा गल्लत केली जाते. परंतु त्या दोघांमध्ये ठळक फरक आहेत. चित्ता बिबट्यापेक्षा सडपातळ असतो. चित्त्याच्या अंगावर भरीव आणि छोटे काळे ठिपके असतात, बिबट्यांचे ठिपके पुंजक्या-पुंजक्यात असून ते पोकळ असतात. चित्ता बहुदा दिवसा शिकार करतो, बिबट्या रात्री शिकार करतो. चित्ता झाडावर चढत नाही, बिबट्या आपली शिकारसुद्धा झाडावर घेऊन जाऊ शकतो. चित्त्याला आपल्या नख्या पंजात ओढून घेता येत नसल्यामुळे त्या बोथट असतात. मात्र, बिबट्याच्या नख्या तीक्ष्ण व बाकदार असतात.

चित्त्याचे कातडे हौशी लोकांमध्ये अतिशय लोकप्रिय होते. यामुळेच त्यांची फार मोठ्या प्रमाणावर तारतम्यहीन शिकार झाली. भारतात चित्ता १९४० सालापासून नामशेष झाल्याचे दिसून आले आहे. भारतात पुन्हा एकदा चित्ता आयात करून व त्याला संरक्षण देऊन त्यांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

 

This Post Has One Comment

  1. मी प्रकाश सखाराम केळकर

    ऊत्तम माहिती

प्रतिक्रिया व्यक्त करा