एक विशाल, दीर्घायू पानझडी वृक्ष. प्लँटॅनेसी कुलातील या वृक्षाचे शास्त्रीय नाव प्लँटॅनस ओरिएंटॅलिस आहे. हा वृक्ष मूळचा पूर्व भूमध्य सामुद्रिक प्रदेशातील असून त्याचा पूर्वेस प्रसार झाला. वायव्य हिमालयात, सतलजच्या पश्चिमेस समुद्रसपाटीपासून १,२००—२,४०० मी. उंचीपर्यंत या वृक्षाची लागवड केली जाते. चिनार वृक्ष विशाल, शोभिवंत असून सु.३० मी. पर्यंत वाढतो. खोड आखूड असून पर्णसंभार डेरेदार व पसरट असतो. साल फिकट करडी असून तिच्या मोठ्या ढलप्या निघतात. पाने साधी, एकाआड एक, हस्ताकृती, ५—७ खंडयुक्त, १२—२० सेंमी. लांब व अधिक रुंद असतात. एकलिंगी फूले दाट व गोलसर स्तबकात येतात; नर – फुले व मादी – फुले वेगळी असली,तरी एकाच झाडावर येतात. फळांचा लोंबता गुच्छ सु.३ सेंमी. व्यासाचा असून त्यात पुष्कळ लहान, एकबीजी; शुष्क व न फूटणारी फळे असतात.
चिनार (प्लँटॅनस ओरिएंटॅलिस): वृक्ष, पान व खोड

चिनाराची साल शिर्क्यात उकळून अतिसार, आमांश, अंतर्गळ व दातदुखीवर लावतात. स्कर्व्ही या रोगाला रोधक असे गुणधर्म सालीत आहेत. ताजी पाने कुस्करून त्याचा लेप डोळे आल्यास डोळ्यांवर लावतात. लाकूड पांढरे असून त्यावर पिवळी किंवा तांबूस छटा असते. ते सुबक, मध्यम कठीण व वजनदार असले तरी बळकट नसते. सावलीत ते चांगले टिकते. रापवताना वेडेवाकडे होते, रंधून चांगले गुळगुळीत होते आणि त्याला उत्तम झिलई करता येते. जम्मू व काश्मीरमध्ये त्याचा उपयोग लहान पेटया, भिन्न आकाराची तबके व तत्सम वस्तूंसाठी केला जातो. नंतर या वस्तू लाक्षारस व रंगलेप लावून रंगवितात. यूरोपात व आशियात त्याचा उपयोग कपाटे, पृष्ठावरणाचे तक्ते, गाडया, कोरीव व कातीव कामे आणि लगदा यांसाठी करतात. या वृक्षाच्या डहाळ्या आणि मुळे यांपासून कापडाला दिले जाणारे रंग मिळवितात. शोभेचा वृक्ष म्हणून पंजाब आणि जम्मू व काश्मीर या राज्यांत या वृक्षाला महत्त्व आहे. रस्त्याच्या दुतर्फा सावलीसाठी मुद्दाम लागवड करतात. चिनार वृक्षाला हिपॉक्राटीझचा वृक्ष असेही म्हणतात. हिपॉक्राटीझ (इ.स.४६०—इ.स.३७९) हा प्राचीन ग्रीक वैदयक. त्याला पाश्चिमात्य वैदयकशास्त्राचा जनक म्हणतात. त्याने याच वृक्षाखाली त्याच्या विदयार्थ्यांना वैदयकशास्त्र शिकविले, अशी आख्यायिका आहे.

मागील काही वर्षांत बेसुमार वृक्षतोडीमुळे काश्मीरमधील चिनार वृक्षांची संख्या निम्म्याने घटली आहे. त्यामुळे राज्य सरकारने चिनारच्या लागवडीचा व्यापक कार्यक्रम हाती घेतला आहे.


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.

प्रतिक्रिया व्यक्त करा