आधुनिक रेणवीय जीवशास्त्रामध्ये एखादया सजीवाचा जीनोम म्हणजे त्या सजीवाच्या जनुकीय माहितीचा संपूर्ण संच. ही माहिती त्या सजीवाच्या शरीरातील डीएनए (किंवा विषाणूंचा विचार करताना, आरएनए) च्या स्वरूपात साठविलेली असते. जीनोेममध्ये जनुकांचा तसेच डीएनए/आरएनए यांमधील बिगरजनुकीय भागाचा (म्हणजे ज्या भागातील बेसपेअरांचा अनुक्रम कोणतेही प्रथिन तयार करण्याचे संकेत दाखवत नाही अशा) समावेश होतो. जीनोमसाठी काही वेळा ‘संजीन’ किंवा जनुकसंच’ याही संज्ञा वापरल्या जातात. सजीवांच्या जीनोमचा आकार सामान्यपणे बेसपेअरांच्या संख्येनुसार मोजला जातो. पुढील कोष्टकात सजीवांच्या काही जातींच्या जीनोमांचा आकार दिलेला आहे.
सामान्य नाव शास्त्रीय नाव जीनोमचा आकार (कोटीमध्ये, सु.)
फळमाशी ड्रॉसोफिला मेनोगॅस्टर १८
फुगु फुगु रूब्रीपस ४०
साप बोआ कन्स्ट्रिक्टर २१०
मनुष्य होमो सेपियन ३१०
कांदा एलियन सेपा १८००
फुप्फुसमीन (फुप्फुस मासा) प्रोटोप्टेरस इथिओपिअस १४०००
नेचे ओफिओग्लॉसम पेटीओलॅटम १६०००
अमीबा अमीबा डुबिया ६७०००

 

 

सजीवांच्या जीनोममधील काही जनुके अक्रियाशील (व्यक्त न होऊ शकणारी) असतात. उदा., रिकेटसिया आणि सायनोबॅक्टेरियासारखे जीवाणू दृश्यकेंद्रकी पेशींमध्ये सामावल्यावर ते परजीवी असल्यामुळे त्यांच्या व्यक्त जनुकांची संख्या कमी झाली आहे. एकेकाळी रिकेट्सिया व सायनोबॅक्टेरिया यांना स्वतंत्र अस्तित्व होते. त्यांचे पेशीय भक्षण झाल्यानंतर (एंडोसायटॉसिस) तंतुकणिका आणि हरितलवके यांच्यामध्ये रूपांतर झाले. त्यांच्या जीनोममध्ये सु. १,००० क्रियाशील जनुके होती. आता हरितलवकामध्ये शिल्लक राहिलेल्या व्यक्त जनुकांची संख्या २७ व तंतुकणिकेमधील व्यक्त जनुकांची संख्या २० असून त्यांच्या अव्यक्त जनुकांची संख्या वाढली आहे. मायकोबॅक्टेरियम लेप्री या कुष्ठरोगाच्या जीवाणूमधील एक-तृतीयांश जनुके अक्रियाशील झाली आहेत. या सर्व उदाहरणातील जीनोमचा मूळचा आकार तसाच राहतो. अव्यक्त व व्यक्त जनुकांची संख्या मात्र बदलते. सजीव जिवंत राहण्यासाठी किती आकाराचा जीनोम आणि पर्यायाने किती जीवनप्रक्रियांची आवश्यकता आहे यावर संशोधन चालू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा