असाइत ठाकर : (इ. स. १४ व्या शतकाचा उत्तरार्ध). गुजरातमधील लोकनाट्यकार, पद्यात्मक कथाकार, कवी, वक्ता आणि संगीतकार म्हणून ख्यातीप्राप्त. ते गुजरातमधील सिद्धपुर येथील यजुर्वेदी भारद्वाज गोत्रातील औदीच्य ब्राह्मण. वडिलांचे नाव राजाराम ठाकर. त्यांच्यासंबंधी असे सांगितले जाते की, त्यांचे आश्रयदाते माळा पटेल यांच्या मुलीला ऊंझामध्ये छावणी घातलेल्या एका मुस्लिम सरदाराने पळवून नेले असता, असाइत तिला सोडवण्यासाठी गेले व ती आपलीच मुलगी आहे असे सांगितले. ते सिद्ध करण्यासाठी तिच्याबरोबर जेवण घेतले; त्यामुळे ब्राह्मण समाजाने त्यांना जातीबाहेर काढले. असाइत यांनी आपल्या मांडण, जयराज आणि नारण या तीन पुत्रांसह सिद्धपूर सोडले व ते ऊंझात येऊन राहिले. माळा पटेलने त्यांना घर, जमीन व अनेक वंशपरंपरागत हक्क दिले. असाइत हे भवाई करणाऱ्या ज्ञातीचे आदिपुरुष मानले जातात. ही जात आज नायक या नावाने ओळखली जाते. या असाइत ठाकरांनी ऐतिहासिक, धार्मिक आणि सामाजिक विषयावरच्या एकंदर ३६० भवाईवेश रचल्या अथवा संकलित केल्या असे म्हटले जाते. पण आज त्यापैकी पन्नासपेक्षा अधिक भवाई उपलब्ध नाहीत.
त्यापैकी रामदेवनो वेश आणि कजेडानो वेश यात हास्यरसकारक चित्रण व त्याबरोबरच अनेक विषयांची माहिती, व्यावहारिक शहाणपणदर्शक सुभाषिते आली असून या दोन्ही भवाई विस्तृत व अधिक लांबीच्या आहेत. त्याचबरोबर हंसवच्छकथा /चरित / चोपाई / पवाडो या कृतीत हंसाउलीनरवाहनच्या लग्नाची अद्भुतरम्य कथा आली आहे; व त्यात असाइतच्या सर्जकशक्तीची प्रतीती येते. या कथेला जैन धर्मातही मान्यता आहे. असाइत यांच्या नाममुद्रेखाली असणाऱ्या दुहा, छप्पा, कविता यासारख्या रचनाबंधात समस्याचातुर्य, व्यवहारज्ञान, प्रापंचिक शहाणीव इ. चे चित्रण दिसून येते.
संदर्भ: शास्त्री, केशवराम का.,आपणा कविओ :रासयुग, १९७८.