इन्‍द्रावती : (इ. स.१६१९ – इ. स.१६९५). गुजराती कवी. प्राणनाथ स्‍वामी, महामती, आणि महेराज या नावानेही ते ओळखले जातात. इन्‍द्रावती या नावाने ते काव्‍यरचना करतात. वडिलांचे नाव केशव ठक्‍कर, आईचे नाव धनबाई. गुजरातमधील जामनगर हे मूळगाव. ज्ञाती लोहाणा. प्रणामी पंथ (महात्‍मा गांधीच्‍या आई या पंथाच्‍या उपासक होत्‍या). निजानंद संप्रदायाचे संस्‍थापक देवचंद्र यांच्‍याकडून १६३१ ला त्‍यांनी दीक्षा घेऊन प्राणनाथ हे नाव धारण केले. बुंदेलखंडाचा राजा छत्रसाल यांचे गुरू होते. देशात अनेक ठिकाणी, अनेक स्‍थानी व देशाबाहेर थेट अरबस्‍तानपर्यंत त्‍यांनी प्रवास केला. अरबीसारख्‍या विविध भाषांचे ते जाणकार होते व इस्‍लाम, ख्रिस्‍ती यासारख्‍या धर्मांचा त्‍यांचा अभ्‍यास सखोल होता. सामाजिक व धर्मपातळीवर समन्‍वय साधण्‍याविषयी ते सतत प्रयत्‍नशील असत. त्‍यांच्‍या कित्‍येक हिंदी पदरचनेत ‘महाजन/महामति’ हे कविनाम धारण केलेले दिसत असून ती प्रणामी पंथाची विशिष्‍ट दार्शनिक अवस्‍था दाखविणारी पारिभाषिक संज्ञा आहे. या संप्रदायांच्‍या मंदिरातील पूज्‍य असा बृहद् ग्रंथ म्‍हणजे तारमतसागर/ श्रीजमुखवाणी/ कुलजमसरूप हा असून त्‍यात प्राणनाथांच्‍या कीर्तनसंचयासमवेत गुजराती, हिंदी, उर्दू, सिंधी आणि अरबी भाषेतल्या १४ कृतींचा संग्रह आहे. कीर्तनात महामती, महेराज अशी नाममुद्रा धारण करणाऱ्या या कवीने गुजराती कृती इन्‍द्रावती या नाममुद्रेखाली लिहिल्‍या आहेत. त्‍यात सहा ऋतू, अधिकमास आणि कलशाच्‍या आठ खंडात मल्‍हार, वसंत, धुमार, धन्‍याश्री इ. विविध रागातील १७६ कडीचे षड्ऋतुवर्णन तर एकट्या मल्‍हार रागात रचलेले ११९ कडीचे विरहनी बारमासी या वैशिष्‍ट्यपूर्ण कृती आहेत, तसेच षडऋतु या एकाच शीर्षकाखाली रचलेल्या संप्रदायभक्‍तीच्‍या व कृष्‍णवियोग निरूपण करणाऱ्या या दोन कृती सर्वात अधिक नोंदपात्र आहेत. त्यांच्या रासग्रंथ, प्रकाश, कलशग्रंथ, श्रीनाथजीनो शणगार, वैराटवर्णन इ. अनेक कृतीही लक्षणीय आहेत.

संदर्भ : देसाई,मोहनलाल,जैन साहित्यनो संक्षिप्त इतिहास, १९३३.