काही सस्तन प्राण्यांच्या पावलांवरील असलेली कठिण वाढ म्हणजे खूर. अशा प्राण्यांचा समावेश खूरधारी प्राणी (अंग्युलेटा) गणात होतो. यामध्ये डुक्कर, झीब्रा, घोडा तसेच शिंगे असलेल्या सस्तन प्राण्यांचा समावेश होतो. नखरांमध्ये उपयोगांप्रमाणे बदल होऊन खूर तयार झालेले आहेत. त्वचेच्या बाहेरील संरक्षक स्तरापासून केराटिनमय खूर बनलेले असतात. ते टोकाला बोथट असतात आणि पायाची बोटे किंवा पाऊल यांना पूर्णपणे घेऱून टाकतात.
नखे किंवा शिंगांप्रमाणे खूर हे तंतुमय, कठिण आणि अविद्राव्य केराटिनापासून बनलेले असतात. खुरांची वाढ आयुष्यभर होत असल्यामुळे झिजेद्वारे त्यांच्या लांबीवर नियंत्रण राखले जाते.
अंग्युलेटा गणातील प्राण्यांचे वर्गीकरण आर्टिओडॅक्टिला (समखुरी ; ज्यांच्या खुरांची संख्या सम आहे) आणि पेरिसोडॅक्टिला (विषमखुरी ; ज्यांच्या खुरांची संख्या विषम आहे) असे केले जाते. घोड्याचा खूर हा एका बोटापासून विकसित झालेला आहे. त्याच्या खुरामुळे पाऊल पूर्णपणे झाकले (आच्छादले) जाते. गाढव आणि झीब्रा या प्राण्यांमध्येही एकच खूर असतो. समखुरी प्राण्यांमध्ये खुरांची संख्या दोन किंवा चार असते. दोन खुरांमध्ये भेग असते. या समखुरी प्राण्यांच्या गटात हरिण, काळवीट, मेंढी, शेळी, गाय, म्हैस, डुक्कर आणि पाणघोडा यांचा समावेश होतो. खुरांमुळे प्राण्यांना पाय भक्कमपणे रोवता येतात आणि पायांचे संरक्षणदेखील होते. काही प्राणी लढताना, हल्ला करण्यासाठी किंवा स्वतःचे रक्षण करण्यासाठी खुरांचा वापर करतात. खडकाळ, डांबरी वा सिमेंटच्या टणक पृष्ठभागावर खुरांची झीज अधिक होते. यावर उपाय म्हणून घोडे, बैल अशा पाळीव प्राण्यांच्या खुरांवर लोखंडी नाल मारण्याची पद्धत आहे.
घोड्यांच्या दृष्टीने खुरांना विशेष महत्त्व असून त्यांच्या खुरांची संरचना विशिष्ट असते. त्यांचा खूर भित्तिका, तळवा आणि बेडूक थर (बेडकाच्या पाठीवरील त्वचेप्रमाणे दिसणारा भाग) यांचा बनलेला असतो. घोडा उभा असताना डोळ्यांना दिसणार्या खुराचा बाहेरील भाग म्हणजे भित्तिका. पुढचे टोक, कडेच्या बाजू आणि टाच यांपासून ही भित्तिका बनलेली असते. भित्तिकेद्वारे पायांतील तिसरी अंगुलास्थी वेढलेली असते. जेव्हा घोड्याचे पाऊल उचलले जाते तेव्हा तळवा, बेडूक थर आणि मागील बाजूला असलेली खाच दिसते.
खुरावरील भित्तिका शृंगी पदार्थाची (केराटिनाची) बनलेली असते. या पदार्थाची सतत वाढ होत असते आणि झीज होत असते. भित्तिकेत रक्तवाहिन्या तसेच चेता नसतात. पुढच्या पावलांमधील पुढच्या टोकाला भित्तिका जाड असते ; मागच्या पावलांमध्ये भित्तिका जाडीला सारखी असते. भित्तिका दंड आणि बेडूक थर यांच्यामार्फत शरीराचे वजन पेलले जाते. सामान्यपणे तळवा जमिनीला टेकत नाही. लोखंडी नाल भित्तिकेच्या कडांवर ठोकलेले असतात.
खुराच्या आत तिसर्या अंगुलास्थीच्या आतील आणि बाहेरील कडांपासून कास्थी (कूर्चा) मागे वळलेल्या असतात. या कास्थी लवचिक असतात. परंतु जसे घोड्याचे वय वाढत जाते तशा या कास्थी कठिण होऊन त्यांचे अस्थींत (हाडांत) रूपांतर होते. दुसरी आणि तिसरी अंगुलास्थी यांच्या दरम्यान लहानसे हाड असते. याला नौकाकार हाड म्हणतात. या हाडाभोवती असलेल्या द्रवामुळे खुरातील हाड आणि त्याला जुळलेले स्नायू (कंडरा) यांमधील घर्षण कमी होते. गादी लवचिक पदार्थाची बनलेली असून ती टाचेच्या भागात असते. या संरचनेमुळे पावलाला बसणारे धक्के सहन केले जातात.
जेव्हा खुरांवर वजन पडते तेव्हा अंगुलास्थीपासून भित्तिकेवर आणि गादी व बेडूक थर यांवर दाब संक्रमित होतो. सर्वांत प्रथम जमिनीला बेडूक थराचा स्पर्श होतो. बेडूक थरामुळे गादीवर दाब पडतो व ती दबली जाते. परिणामी कास्थी बाहेरच्या बाजूला वळतात. बेडूक थरदेखील दबला जातो आणि भित्तिकेचे दंड दूर सारले जातात. घोड्याचे पाऊल वर उचलले जाते तेव्हा बेडूक थर आणि पावलातील सर्व लवचिक भाग मूळ स्थितीत येतात. त्याचे पाऊल जमिनीला टेकते, तेव्हा बेडूक थर आणि गादी दोन्हींवर दाब वाढल्यामुळे आणि त्यांच्या आकारात बदल झाल्यामुळे खुरांकडून पायाकडे रक्त ढकलले जाते. दाबामुळे आणि आकारात झालेल्या बदलांमुळे पावलांतील शिरा दबल्या जातात. पाऊल परत वर उचलले जाते तेव्हा शिरांवरील दाब कमी होतो आणि रक्त पुन्हा शिरांकडे वाहते. अशा प्रकारे, खुरातील वेगवेगळ्या भागांच्या हालचालीमुळे घोड्याचा खूर पंपासारखे कार्य करतो. व्यायामामुळे पावलाच्या भागातील रक्तपुरवठा वाढतो आणि खुरांची वाढ चांगली होते. व्यायामाचा अभाव, कोरडे (शुष्क) आवरण आणि निकृष्ट आहारामुळे त्याच्या खुरांची वाढ खुंटते.
घोड्याच्या खुराच्या भित्तिकेवर एक विशिष्ट पदार्थाचा स्तर असतो. या स्तरामुळे ओलसरपणा टिकून राहतो. काही कारणाने हा स्तर खराब झाल्यास खुरभित्तिका कोरडी होते आणि तिच्या खपल्या पडतात, तसेच त्यावर भेगा पडतात. म्हणून खूर कोरडा होऊ नये म्हणून खुरांना रंगही लावतात. शर्यतीत पळणार्या घोड्यांचे खूर निरोगी राहावेत आणि त्यांची वाढ योग्य प्रकारे व्हावी म्हणून खास निगा राखली जाते.