फक्त समुद्रात राहणार्या आणि बहुतांश कठिण व काटेरी (कंटक) त्वचा असणार्या अपृष्ठवंशी प्राण्यांचा संघ. या संघाला एकायनोडर्माटा असे नाव आहे. या संघात तारामीन, समुद्रनलिनी, सागरी काकडी, समुद्री अर्चिन इ. प्राणी येतात. कँब्रियन काळापासून म्हणजे सुमारे ५७ कोटी वर्षांपूर्वीपासून हे प्राणी अस्तित्वात आहेत. प्राचीन काळी ग्रीक तसेच रोमन लोक औषधासाठी तसेच अन्न म्हणून या प्राण्यांचा वापर करीत असत.
कंटकचर्मी प्राण्यांच्या शरीररचनेची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे त्यांची अरीय सममित रचना आणि मध्यशरीराला जोडलेल्या पाच किंवा त्या पटीने असलेल्या भुजा. शरीर पाच समान भागांत विभागलेले असून मध्यभागी तोंड असते. शरीरभर मज्जातंतूंचे जाळे असते, पण मेंदू नसतो. ज्ञानेंद्रिये प्रगत व गुंतागुंतीची नसतात. रक्ताभिसरण संस्था खुली असते; यात हृदयाचा समावेश नसतो. शरीरात सुमद्राच्या पाण्यासारख्या द्रवाने भरलेल्या नलिकांची जलाभिसरण संस्था असते. या नलिका नलिकापादांना जोडलेल्या असतात. नलिकापादांचे कार्य जलस्थित दाबावर आधारलेले असते. या पादांचा उपयोग अन्नग्रहण तसेच वायूंच्या विनिमयासाठी केला जातो. शरीराच्या तुटलेल्या अवयवाचे पुनर्निर्माण हे प्राणी करू शकतात.
कंटकचर्मी प्राणी भिन्नलिंगी असतात. त्यांच्या अंडांचे फलन शरीराबाहेर होते. फलित अंडांपासून डिंभ तयार होतात आणि पाण्यात मोकळेपणे पोहतात. द्विपार्श्व सममित शरीरे (दोन्ही बाजू सारख्या) असलेले डिंभ समुद्राच्या तळाशी जातात आणि तेथे त्यांचे अरीय शरीराच्या प्रौढांत रूपांतर होते. काही जातीचे कंटकचर्मी अलैंगिक प्रजनन करू शकतात.
कंटकचर्मी संघात २१ वर्ग असून हे वर्गीकरण शरीरातील सांगाडयाच्या रचनेवर आधारलेले आहे. यांतील सु. १६ वर्ग आणि त्यांमधील १३,००० जाती विलुप्त झाल्या असून आज केवळ पाच वर्ग आणि त्यांमधील ३,००० जाती अस्तित्वात आहेत. हे पाच वर्ग खालीलप्रमाणे आहेत :
क्रिनॉयडिया वर्ग : सु. ६०० जाती; उदा., समुद्रनलिनी, पिच्छतारा इत्यादी. हे प्राणी तात्पुरते किंवा कायम स्वरूपात समुद्रतळावर जखडलेले असतात. यांचे मुख वरच्या दिशेला असते. भुजांचा आकार नेचासारखा दिसतो. या वर्गातील प्राणी पाण्यात तरंगणार्या जीवकणांवर उपजीविका करतात. विलुप्त झालेल्या एका जातीच्या समुद्रनलिनींची लांबी सु. २० मी. होती.
अॅस्टरॉयडिया वर्ग : सु. १६०० जाती; उदा., तारामीन. यांच्या मध्यशरीराला पाच भुजा जोडलेल्या असतात. काही जातींमध्ये भुजांची संख्या पाचच्या पटीत ५० पर्यंतही आढळते. या भुजा मध्यशरीराजवळ रुंद, तर टोकाशी निमुळत्या होत जातात. मुख मध्यशरीरावर खालच्या दिशेने असते. तारामीन मांसाहारी असून मृदुकाय प्राणी, विशेषकरून शिंपले हे त्यांचे भक्ष्य असते.
ऑफियूरॉयडिया वर्ग : सु. २,००० जाती; उदा., भंगुरतारा. यांच्या शरीराचा मध्यभाग लहान असतो, तर भुजा अरूंद व लवचिक असतात. मुख मध्यशरीरावर खालच्या दिशेने असते. मृदुकाय प्राणी, पाण्यातील सूक्ष्मजीव, कृमी व खडकांवरील सेंद्रीय पदार्थ हे त्यांचे अन्न असते.
होलोथुरॉयडिया वर्ग : सु. ९०० जाती; उदा., सागरी काकडी. या वर्गातील प्राण्यांचे शरीर काकडीच्या आकाराचे, स्नायुयुक्त व लवचिक असते. शरीराच्या एका टोकाशी मुख असून त्याभोवती आखूड अशा पाचच्या पटीत अनेक भुजा असतात. भुजांचा वापर करून सागरी काकडी समुद्रतळावरील गाळ गिळते. या गाळातील सेंद्रिय अंशाचे पचन झाल्यावर उरलेली वाळू शरीराबाहेर फेकली जाते. सागरी काकड्यांचा अन्न म्हणून वापर केला जातो. काही जातींच्या सागरी काकड्यांमधून औषधी द्रव्ये मिळवितात.
एकिनॉयडिया वर्ग : सु. ९०० जाती; उदा., समुद्री अर्चिन. या वर्गातील प्राण्यांचा आकार गोलकासारखा असतो. त्यांना भुजा नसतात. शरीरावर लांब काटे असून त्यांचा वापर संरक्षण तसेच हालचालीसाठी केला जातो. काट्यांबरोबर शरीराच्या पृष्ठभागावर पेडीसेलेरी हे खास अवयव आढळतात. संदंशिका ह्या तीन जबड्यांच्या पकडीसारखे असतात. नलिकापादांच्या दहा रांगा असतात. समुद्री अर्चिनाव्यतिरिक्त या वर्गात हार्ट-अर्चिन, केक-अर्चिन हे इतर प्रकार आढळतात.
या वर्गातील प्राणी मुख्यत: समुद्री गवत खातात. कॅलिफोर्नियाच्या किनार्यावर लागवड केलेल्या समुद्री गवताची समुद्री अर्चिनामुळे हानी झालेली आहे. भारताच्या किनारपट्टीवर समुद्री अर्चिनाचा अन्न म्हणून वापर केला जातो. सागरी अन्नसाखळीत कंटकचर्मी प्राण्यांचा महत्त्वाचा वाटा आहे.