पॅरान्थ्रोपस पराजातींमधील सर्वांत कमी माहिती असलेली एक प्रजात. फ्रेंच पुरामानवशास्त्रज्ञ कॅमे ॲरमबूर्ग (१८८५–१९६९) आणि इव्ह कॉप्पन्स (जन्म : ९ ऑगस्ट १९३४) यांना इथिओपियामध्ये ओमो नदीच्या परिसरात एक खालचा जबडा मिळाला (१९६७). हा जीवाश्म ओमो-१८ या नावाने ओळखला जातो. इंग्रजी ‘व्हीʼ अक्षराच्या आकाराचा हा जबडा सर्वस्वी निराळा असल्याने ही वेगळी प्रजात मानून तिचे पॅरान्थ्रोपस इथिओपिकस असे नामकरण झाले. यातील ‘इथिओपिकसʼ हा शब्द इथिओपिया या देशाच्या नावाशी निगडित आहे. पॅरान्थ्रोपस पराजातींमधील ही सर्वांत प्राचीन प्रजाती असून ती २७ लक्ष ते २३ लक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात होती. या प्रजातीपासून पॅरान्थ्रोपस बॅाइसीची उत्क्रांती झाली, असे अनुमान काढण्यात आले.

पॅरान्थ्रोपस इथिओपिकसचा सर्वांत महत्त्वाचा पुरावा केनियन पुरामानवशास्त्रज्ञ ॲलन वॅाकर (१९३८–२०१७) आणि रिचर्ड लिकी (१९ डिसेंबर १९४४) यांना मिळाला (१९८५). लेक तुर्कानाच्या पश्चिमेस मिळालेला एक कवटीचा जीवाश्म (केएनएम-डब्ल्यूटी १७०००) ‘ब्लॅक स्कलʼ या नावाने प्रसिद्ध आहे. ही कवटी ज्या निक्षेपांमध्ये आढळली त्यांत मँगनीजचे प्रमाण खूप असल्याने तिला काळा रंग आला आहे. सुरुवातीला या कवटीचे पॅरान्थ्रोपस बॅाइसी असे वर्गीकरण करण्यात आले. साधारण २५ लक्ष वर्षांपूर्वीची ही कवटी एका प्रौढ प्राण्याची असून तिचे आकारमान ४१० घ. सेंमी. आहे. या जीवाश्मात ऑस्ट्रॅलोपिथेकस अफारेन्सिस सारखी अनेक वैशिष्ट्ये दिसतात. यात इतर पॅरान्थ्रोपस प्रजातींप्रमाणे चघळण्यासाठी बळकट स्नायूंना आधार पुरवणारा लांबलचक असलेला उंचवटा (सममितार्धी शिखा) चांगलाच जाड आहे. या जीवाश्मासाठी पॅरान्थ्रोपस वॅाकेरी अशी निराळी प्रजाती सुचवण्यात आली असली, तरी तिला मान्यता मिळालेली नाही.

एल-५५ एस-३३ हा लेक तुर्कानाच्या उत्तरेला ओमो नदीच्या परिसरात मिळालेला खालचा जबडा हा पॅरान्थ्रोपस इथिओपिकसचा तिसरा महत्त्वाचा नमुना आहे. या जीवाश्माचे भूवैज्ञानिक वय २७ लक्ष वर्षे आहे.

पॅरान्थ्रोपस इथिओपिकस हे कठीण आवरण असलेली फळे व बिया खात असावेत, असे मानले जात असे. दातांवरील झिजण्याच्या सूक्ष्म खुणांचा अभ्यास करून एल. एम. मार्टिनेझ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पॅरान्थ्रोपस बॅाइसी आणि पॅरान्थ्रोपस इथिओपिकस या दोन्हींच्या आहारांत खूप घर्षण करणाऱ्या अन्नपदार्थांचा समावेश नव्हता, उलट सहज तोडण्याजोग्या वनस्पती (सी-४) अधिक प्रमाणात होत्या, असे दाखवून दिले.

संदर्भ :

  • Leakey, R. E. F. & Walker, A. ‘New Australopithecus boisei specimens from East and West Lake Turkana, Kenyaʼ, American Journal of Physical Anthropology : 76, pp. 1-24, 1988.
  • Martinez L. M.; Estebaranz-Sánchez, F.; Galbany, J. & Perez-Perez, A. ‘Testing Dietary Hypotheses of East African Hominines Using Buccal Dental Microwear Data, PLOS ONE : 11(11), 2016.
  • Wood, B.; Schroer, K.; Ed., Begun, D. ‘Paranthropus – A Companion to paleoanthropologyʼ , pp. 457-478, New York, 2013.

समीक्षक – शौनक कुलकर्णी