एखाद्या व्यक्तीला एकाएकी अस्वस्थ वाटू लागल्यास किंवा जखम झाल्यास जे उपचार तातडीने आणि काळजीपूर्वक केले जातात, त्यांना प्रथमोपचार म्हणतात. ज्या व्यक्तीवर असे उपचार केले जातात तिचा जीव वाचविणे, स्थिती वार्इट होण्यापासून रोखणे व पूर्ववत करणे यासाठी प्रथमोपचार आवश्यक असतात. जखमी व्यक्तीला किंवा जिचे स्वास्थ बिघडले आहे अशा व्यक्तीला वैद्यकीय मदत मिळेपर्यंत प्रथमोपचार करणे गरजेचे असते.

प्रथमोपचार करताना प्रथमोपचारांची प्राथमिक माहिती असणे गरजेचे असते. ज्या व्यक्तीवर प्रथमोपचार करावयाचे आहे तिचे अस्वास्थ्य वाढू न देणे, वैद्यकीय मदत मिळेपर्यंत तिला धीर देणे आणि उपचार चालू करणे, प्रकृतीत गुंतागुंत होऊ न देणे ही प्रथमोपचाराची उद्दिष्टे असतात. प्रथमोपचार करीत असताना श्वसनमार्ग मोकळा ठेवणे, कृत्रिम श्वासोच्छ्‌वास देणे, गरज पडल्यास हृदय स्पंदन करणे, रक्तस्राव थांबविणे आदी बाबींकडे लक्ष देणे महत्त्वाचे असते.

प्रथमोपचार कसे करावेत यासंबंधीचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेणे उपयुक्त ठरते. घरी, कामाच्या ठिकाणी तसेच सार्वजनिक ठिकाणी किंवा खेळाच्या मैदानावर प्रथमोपचार करावे लागतील अशा घटना कधीही घडू शकतात. अशा वेळी प्रथमोपचारांची माहिती, साधने आणि सराव आवश्यक असतो. प्रथमोपचाराची साधने सहज हाती उपलब्ध होतील अशा ठळक ठिकाणी ठेवतात आणि तेथे मोठ्या अक्षरात एखादा फलक लावतात. ऑक्सिजन सिलिंडरसारख्या वस्तू पटकन एका जागेवरून दुसरीकडे वाहून नेण्यासाठी ट्रॉलीवर ठेवतात. त्यांची नियमितपणे तपासणी करतात व मास्क रोज पुसून स्वच्छ करतात. एका पेटीत बँडेज (बंधपट्टी) आणि ड्रेसिंगचे सामान ठेवतात. शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सेंट जॉन ॲम्ब्युलन्स ब्रिगेड, मुंबई या संस्थेतर्फे सर्टिफिकेट कोर्सचे प्रशिक्षण घेता येते. कारखान्यांमध्ये काही कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिल्यास सर्व कर्मचाऱ्यांसाठी ती सुविधा उपलब्ध होते.

प्रथमोपचार करताना लक्षणांनुसार त्याचे पुढीलप्रमाणे उपचार सुरू करावेत.

जखमा आणि रक्तस्राव : अपघात किंवा इतर कारणांमुळे रक्तस्राव होत असल्यास सर्वप्रथम तो थांबवावा लागतो. धमणीतून रक्तस्राव होत असेल, तर रक्ताच्या चिळकांड्या उडतात. असा रक्तस्राव न थांबल्यास मृत्यू ओढवू शकतो. शिरेतून होणारा रक्तप्रवाह संथ असतो. तसेच केशवाहिन्यांतील होणारा रक्तप्रवाह थेंबथेंब गळत राहतो. पुष्कळ जखमांमधील रक्तस्राव जखमेवर बँडेज घट्ट बांधून थांबविता येतो. मात्र अशी बँडेज निर्जंतुक असावी लागते. ते उपलब्ध न झाल्यास स्वच्छ हातरूमाल, स्वच्छ टॉवेल किंवा स्वच्छ कापड वापरतात. लहानलहान जखमांची योग्य काळजी घ्यावी लागते. या जखमांमधून सूक्ष्मजीवांचे संक्रामण होऊन मोठा आजार उद्भवू शकतो. अशा जखमा साबणाच्या पाण्याने स्वच्छ  करून त्यावर टिंक्चर आयोडीन लावून बँडेजपट्टीने झाकतात.

घसा गुदमरणे : घसा किंवा श्‍वसनमार्ग यांत एखादी वस्तू अडकल्यास श्वास घ्यायला अडथळा निर्माण होतो व व्यक्ती गुदमरते. अशा व्यक्तीला खोकल्याची जोरदार उबळ येत असल्यास ती उबळ येऊ द्यावी. कारण अडकलेली वस्तू बाहेर फेकण्याचा तो एक प्रयत्न असतो. मात्र खोकला थांबेपर्यंत घशात बोटे घालून वस्तू बाहेर काढण्याचा प्रयत्न करू नये. कारण ती वस्तू अधिक खोलवर जाण्याचा धोका असतो. श्‍वसनक्रियेला गंभीर अडथळा निर्माण झाल्यास त्वरित कृत्रिम श्‍वसनाचे उपाय योजावे लागतात.

कधीकधी अन्नपदार्थाचा तुकडा श्‍वसनलिकेत शिरून गुदमरल्यासारखे होते. अशा वेळी तीव्र हृद्‌रोग उद्भवल्याचे वाटू लागते. श्‍वसनक्रियेतील अडथळ्यामुळे रुग्ण काळानिळा दिसू लागतो. अशा वेळी श्‍वसनमार्ग खुला होण्याचे सर्व उपाय व्हावेत. अन्यथा बेशुद्धी येण्याची शक्यता असते. असे घडल्यास रुग्णाला उताणे झोपवावे. पदार्थ न निघाल्यास जवळच्या रुग्णालयात दाखल करावे.

विद्युत् झटका : एखाद्या उपकरणाचे विद्युत् भूयोजन (अर्थिंग) योग्य नसल्यास किंवा त्यात दोष असल्यास अथवा तारेवरील विद्युत् वेष्टन खराब झाल्यास विजेचा झटका बसू शकतो. झटका बसल्यावर ती व्यक्ती थरथर कापते कारण स्नायूंचे आकुंचन होत राहते. अशा वेळी प्रथम विद्युत्‌प्रवाह बंद करावा. ते शक्य नसल्यास त्या व्यक्तीला कोरड्या बांबूने अथवा अगदी कोरड्या कपड्याने तारेपासून दूर करावे. अशा वेळी आपण स्वत: हातात रबरी मोजे व रबरी बूट घालावेत. विजेच्या तारेपासून किंवा उपकरणापासून दूर केल्यावर त्या व्यक्तीची नाडी व श्‍वासोच्छ्‌वास चालू आहे याची खात्री करावी.

हृदय व श्वसनक्रिया बंद असल्यास त्वरीत हृदय-फुप्फुसीय पुनर्जीवन उपचार (कार्डिओपल्मनरी रिससिटेशन – सी पी आर) चालू करावेत. त्याचे मुख्य टप्पे असे आहेत; फुप्फुसात हवा जाण्याचे सर्व मार्ग खुले करावेत. हाताच्या पंजाने पाच वेळा छातीवर दाब द्यावा. छातीच्या मध्यभागी व उजव्या बाजूस हाताच्या पंजाने दाब द्यावा व सोडावा. ३० वेळा ही कृती केल्यानंतर श्‍वासोच्छ्‌वास चालू होतो का याची खात्री करावी. श्‍वासोच्छवास आपोआप चालू न झाल्यास वैद्यकीय मदत घ्यावी.

धक्का : शरीराला होणाऱ्या अपुऱ्या रक्तपुरवठ्यामुळे शारीरिक किंवा मानसिक धक्का (शॉक) बसू शकतो. गंभीर इजा किंवा आजार यांच्यामुळेही धक्का बसू शकतो. बहुधा शारीरिक इजा झाल्यास जखम होऊन रक्त वाहू लागते तेव्हा धक्का बसतो. हृदयविकाराचा झटका आल्यानेही धक्का बसतो. तसेच एखाद्या संक्रामणामुळे धक्का बसू शकतो. जेव्हा धक्का बसतो तेव्हा अपुऱ्या रक्तपुरवठ्यामुळे मेंदूला व इतर अवयवांना ऑक्सिजन आणि अन्नपुरवठा कमी होतो. धक्का मोठा असेल तर मृत्यूही ओढवू शकतो. धक्का बसलेली व्यक्ती घाबरलेली, गोंधळून गेलेली, अशक्त दिसते आणि तिला खूप तहान लागलेली असते. कधीकधी अशी व्यक्ती उलट्या करते. त्या व्यक्तीची त्वचा निस्तेज होते व थंड पडून ती ओलसर लागते, नाडीचे ठोके अनियमितपणे, वेगाने पडतात, तिला धाप लागते आणि श्वास घेणे त्रासदायक होते. गंभीररीत्या जखमी झालेल्या व्यक्तीला धक्का बसलेला आहे असे समजून तसे उपचार करणे अत्यंत जरूरी असते. त्यामुळे ती व्यक्ती धक्क्यातून सावरू शकते. अशा व्यक्तीला पाठीवर झोपवतात, पाय थोडे वर उचललेल्या स्थितीत ठेवतात, या स्थितीत जर श्वास घेण्यास अडचण येत असेल तर त्या व्यक्तीला आधार देऊन अर्धवट बसवितात. शरीर उबदार राहण्यासाठी तिच्या शरीराभोवती एखादे ब्लँकेट किंवा चादर गुंडाळतात. जखमेतून रक्तस्राव होत असेल तर थांबविण्याचा प्रयत्न करतात. श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर कृत्रिम पद्धतीने श्वास देतात. या उपचारांनी फरक पडत नसल्यास रुग्णालयात दाखल करावे.

मौखिक कृत्रिम श्‍वासोच्छवास : बाधित व्यक्तीचे तोंड कपड्याने आतून पुसून कोरडे करावे. कृत्रिम दात असल्यास काढून ठेवावेत. प्रथमोपचार करणाऱ्या व्यक्तीने आपले ओठ बाधित व्यक्तीच्या ओठांवर दाबावेत आणि आपला श्वास जोराने त्याच्या तोंडात सोडावा. श्‍वासोच्छ्‌वास आणि नाडी चालू झाल्यावर बाधित व्यक्तीला रुग्णालयात दाखल करावे.

बुडणे : पोहोण्याच्या तलावात किंवा नदीत एखादी व्यक्ती बुडत असल्यास पोहणाऱ्या व्यक्तीने बुडणाऱ्या व्यक्तीच्या मागून जाऊन त्याचे डोके पाण्याबाहेर राहील, असे उचलावे. मागून उचलल्यामुळे ती व्यक्ती पोहोणाऱ्याला मिठी मारण्याची शक्यता कमी असते. अन्य कुणाच्या मदतीने त्या व्यक्तीला काठावर उचलून उपडे ठेवावे. तोंड उघडून कचरा काढून टाकावा. नाडी आणि श्‍वासोच्छ्‌वास बघावा. श्वास चालू नसल्यास कृत्रिम श्‍वासोच्छ्‌वास आणि हृदय स्पंदन चालू करावे. ताबडतोब रुग्णालयात दाखल करावे. पोहणारी व्यक्ती सराईत असल्यास त्या व्यक्तीने असा प्रयत्न करावा.

अस्थिभंग : (फ्रॅक्चर). पडल्यानंतर अथवा मार लागून हाड मोडल्यास व त्या ठिकाणी रक्तस्राव होत नसल्यास एखादी पट्टी त्या भागाला आधार म्हणून लावावी. अस्थिभंगाच्या जागेवर वरच्या भागास व खालच्या भागास स्वतंत्र बँडेज बांधावे. अशा तऱ्हेने त्या भागाची हालचाल बंद होते आणि त्यामुळे दुखणे कमी होते. अशा व्यक्तीला तशाच अवस्थेत अलगद उचलून रुग्णालयात दाखल करावे. तत्काळ शस्त्रक्रिया करावी लागली, तर पोट रिकामे असावे लागते. म्हणून त्याला तोंडावाटे काहीही देऊ नये.

भाजणे : एखादा गरम, पातळ व ज्वालाग्राही, पेटता पदार्थ, एखादे आम्ल किंवा आम्लारी अंगावर पडणे याला ‘अंग भाजणे’ म्हणतात. अशा वेळी भाजलेल्या भागावर गार पाणी ओतावे. स्वच्छ कापडात तो भाग गुंडाळून ठेवावा. त्या जागी फोड आल्यास ते फोडू नयेत. तसेच त्या भागावरचे जळलेले कपडे तसेच ठेवावेत. भाजलेल्या व्यक्तीला भरपूर पाणी प्यायला द्यावे, कारण भाजलेल्या भागातून शरीरातील पाणी कमी झालेले असते. शक्यतो भाजलेल्या जागी शाई लावू नये. ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्यावा.

सर्पदंश आणि इतर दंश : विषारी सापाच्या दंशामुळे दंशाची जागा (त्वचा) सुजून काळीनिळी पडते व वेदना होतात. विषारी सापाने दंश झालेल्या व्यक्तीस शारीरिक हालचाली बंद करायला सांगावे. रुग्णाला शक्य तेवढ्या तातडीने रुग्णालयात न्यावे. सर्पदंशातील बहुसंख्य साप बिनविषारी असण्याची शक्यता असते. सर्पदंश झालेली व्यक्ती बऱ्याचदा गर्भगळित होते. अशा वेळी दंश झालेल्या व्यक्तीला धीर द्यावा. जर साप मारला असेल तर रुग्णालयात सोबत न्यावा. साप विषारी आहे की बिनविषारी, हे तेथील तज्ज्ञ ठरवू शकतात. विंचवाच्या दंशामुळे सौम्य वेदना होतात. काही वेळा धक्का (शॉक) बसण्याची शक्यताही असते. ज्या व्यक्तीला विंचवाने दंश केलेला आहे, तिला शक्य असल्यास जमिनीवर झोपवून दंश झालेल्या ठिकाणी बर्फ ठेवावा. काही कीटकांच्या दंशामुळेही गंभीर परिणाम होतात. अधिहर्षता (ॲलर्जी) असलेल्या व्यक्तींच्या बाबतीत कीटकदंश जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा तीव्र दंश झाल्यास प्रथम वैद्यकीय सल्ला घ्यावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा