क्लार्क, विल्यम (Clark, William) : (१ ऑगस्ट १७७० – १ सप्टेंबर १८३८) अमेरिकन समन्वेषक. विल्यम यांचा जन्म अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी व्हर्जिनिया राज्यातील कॅरोलाइन परागण्यात तंबाखूची शेती करणार्‍या कुटुंबात झाला. वडिल जॉन व आई ॲन यांचे विल्यम हे नववे अपत्य होय. त्यांनी औपचारिक शिक्षण घेतले नाही; मात्र सुरुवातीचे शिक्षण घरीच घेतले.

१७८५ मध्ये क्लार्क कुटुंब केंटकी राज्यातील लूइसव्हिल येथे स्थानांतरित झाले. विल्यम यांचा मोठा भाऊ जॉर्ज रॉजर क्लार्क यांनी अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात मोठा पराक्रम गाजविला होता. आपल्या मोठ्या भावाप्रमाणेच विल्यम हेही १७८९ मध्ये अमेरिकी सैन्यदलात भरती झाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन (George Washington) यांनी १७९२ मध्ये विल्यम यांना पायदळ सेनेमध्ये लेफ्टेनंट पदावर बढती दिली. जनरल अँथनी वेन यांच्याबरोबर विल्यम यांनी चोसेन रायफल कंपनीची धुरा सांभाळली. १७९४ मधील ‘फॉलन टिंबर्स’ या लढाईमध्ये तसेच इंडियनांविरोधातील अनेक लढायांत त्यांनी भाग घेतला होता. ‘फॉलन टिंबर्स’ या लढाईपासून ‘नॉर्थवेस्ट इंडियन कॉन्फेडरेशन’ची दहशत संपुष्टात आली. १७९६ मध्ये ते आजारी पडल्यामुळे त्यांनी त्याच वर्षी जुलै महिन्यात पायदळातून राजीनामा दिला आणि आपली व आपल्या माता-पित्याच्या तब्बेतीची काळजी घेण्यासाठी ते आपल्या गावाला परतले.

उत्तर अमेरिकेच्या वायव्येकडील असंशोधित अशा विस्तृत प्रदेशाचे समन्वेषण करण्यासाठी एक मोहिम आखण्यात आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष टॉमस जेफर्सन (Thomas Jefferson) यांनी या मोहिमेचे नेतृत्व मेरिवेथर लेविस यांच्याकडे सोपविले. १८०३ मध्ये अमेरिकेने फ्रान्सकडून विकत घेतलेल्या लुइझिॲना प्रांताचे आणि अमेरिकेच्या पॅसिफिक किनार्‍यावरील प्रदेशाचे समन्वेषण करण्यासाठी आखण्यात आलेल्या या मोहिमेत सहभागी होण्याचे निमंत्रण लेविस यांनी विल्यम यांना दिले. विल्यम यांनी मित्राचा प्रस्ताव स्वीकारला. १८०४ ते १८०६  या कालावधीत पार पडलेली ही मोहिम ‘लेव्हिस आणि क्लार्क मोहिम’ म्हणून ओळखली जाते. १४ मे १८०४ रोजी ‘कॉर्प्स ऑफ डिस्कव्हरी’ ही मोहिम सेंट लूइस येथून निघाली. या मोहिमेत विल्यम यांच्यावर मोहिमेच्या मार्गाचा नकाशा तयार करण्याची आणि मोहिमेचे वृतांत लिहून ठेवण्याची जबाबदारी दिली होती. सुरुवातीला मिसूरी नदीला अनुसरून ते पश्चिमेस निघाले. १८०५ मध्ये त्यांनी रॉकी पर्वत पार केला. त्यानंतर कोलंबिया नदीमार्गाला अनुसरून खाली उतरत त्याच वर्षी नोव्हेंबर मध्ये ते पॅसिफिक किनार्‍यावरील याच नदीच्या मुखापर्यंत पोहोचले. समन्वेषणाचे कार्य पूर्ण करून सप्टेंबर १८०६ मध्ये ते  सेंट लूइस येथे परतले. तेव्हा अमेरिकी काँग्रेसने विल्यम यांना दुप्पट पगार आणि १,६०० एकर जमीन बक्षीस म्हणून दिले.

१८०९ मध्ये लेविस यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या मोहिमेचा वृतांत प्रकाशित करण्याची जबाबदारी विल्यम यांच्यावर येऊन पडली. त्यांनी १८१० ते १८१४ या कालावधीत मोहिमेसंबंधीचे नकाशे तयार केले. या मोहिमेतील त्यांचे हे महत्त्वाचे योगदान होते. वायव्य अमेरिकेतील मूळ रहिवाशांची संस्कृती समजून घेण्यात व त्यांच्याशी घनिष्ठ संबंध जोडण्यात विल्यम यांचा खूप महत्त्वाचा संबंध होता. तसेच मिसूरी प्रांताच्या विकासातही त्यांनी मोठे योगदान दिले होते. मोहिमेवरून परतल्यानंतर विल्यम यांना वेगवेगळ्या सार्वजनिक कार्यालयांकडून वेगवेगळी पदे देऊ केली. राष्ट्राध्यक्ष जेफर्सन यांनी विल्यम यांची मिसूरी प्रांताचे ब्रिगेडियर जनरल आणि १८०७ मध्ये सेंट लूइस येथील ब्यूरो ऑफ इंडियन अफेअर्सच्या अधिक्षकपदी नियुक्ती केली. त्यांनी ते पद आयुष्याच्या अखेरपर्यंत सांभाळले. १८१२ च्या युद्धात मिसिसिपी नदीच्या वरच्या खोर्‍यातील इंडियनांना निश्चल (शांत, स्थिर) ठेवण्यात विल्यम यांची कामगिरी मोठी होती. १८१३ ते १८२० या काळात त्यांनी मिसूरी प्रांताचे राज्यपालपद सांभाळले. १८२४-२५ मध्ये विल्यम यांनी इलिनॉय, मिसूरी आणि आर्कॅन्सॉ या राज्यांचा सर्व्हेअर जनरल म्हणून काम पहिले.

विल्यम यांच्या पुढाकारामुळे १८१५ मधील ‘ट्रिटी ऑफ पोर्टेज दे सू’ हा शांतता करार प्रस्थापित झाला. या करारामुळे मिसूरीमधील मूळ रहिवाशांना फायदा झाला. त्यांच्यामुळे येथील फर व्यापार विस्तारण्यास मदत झाली. मूळ रहिवाशांच्या विस्थापनाबाबत विल्यम यांना नेहमीच सहानुभूती होती. व्यापारी परवाने जारी करणे, अनाधिकृत लोकांना बेदखल करणे आणि बेकायदेशीर दारू जप्त करणे ही विल्यम यांची महत्त्वाची कामे होती. त्यांच्या पुढाकारमुळे कला, शिक्षण यांना नेहमीच प्रोत्साहन मिळाले. संशोधन कार्य करणे, बँका व शहरे यांची स्थापना करणे यांना त्यांनी नेहमीच पाठिंबा दिला. त्यांचा विवाह जानेवारी १८०८ मध्ये ज्युलिया हॅनकॉक हिच्याशी झाला. त्यांना पाच अपत्य झाली. ज्युलिया हिच्या मृत्यूनंतर १८२१ मध्ये त्यांनी आपल्या पहिल्या पत्नीची चुलत बहिण हॅरिएट हिच्याशी दुसरा विवाह केला. तिच्यापासून त्यांना दोन अपत्य झाली होती.

विल्यम यांचे मिसूरी राज्यातील सेंट लूइस येथे निधन झाले.

समीक्षक – वसंत चौधरी

प्रतिक्रिया व्यक्त करा