एक मोठे पानझडी झुडूप. डाळिंब ही वनस्पती प्युनिकेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव प्युनिका ग्रॅनॅटम आहे. या वनस्पतीचे मूलस्थान पश्चिम आशियातील इराण व इराक असून तेथून तिचा प्रसार वायव्य भारतात घडून आला. स्पेन, टर्की, इराण, इराक, सिरिया, भारत, पाकिस्तान, बांगला देश, ईजिप्त, चीन, इझ्राएल इत्यादी देशांत डाळिंबाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. भारतात महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेश इत्यादी राज्यांत तिची लागवड केली जाते. तिच्या लागवडीत महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे.
डाळिंबाचे झुडूप सु. ५ ते ८ मी. उंच वाढते. खोड लहान, मजबूत व राखाडी रंगाचे असते. फांद्या गुळगुळीत व खोडाप्रमाणे राखाडी रंगाच्या असतात. फांद्यांना रूपांतरित काटे असतात. पाने साधी, लांबट व समोरासमोर असतात. फुले मोठी, लाल, क्वचित पिवळी व फांदीच्या टोकाला येतात. ती एकेकटी किंवा दोन ते चारच्या झुबक्यांनी येतात. निदलपुंज नलिकाकार, जाड व लाल असून त्याला ५-७ पाली असतात. या पालींमध्ये भाल्याच्या आकाराची दले असतात. निदलपुंजावर अनेक पुं-केसर असतात. अंडाशय निदलपुंज नलिकेत, एकावर एक अशा दोन किंवा तीन थरांत असतो. फळे गोल, लाल व काष्ठीय असून त्यावर निदलपुंजाचा मुकुट असतो. फळात बियांभोवती लाल व रसाळ गराचे आवरण असते. बिया अनेक व कोनीय असून त्या पातळ पांढऱ्या पापुद्र्यात असतात.
डाळिंब खाण्यासाठी व औषधासाठी वापरले जाते. रसात पोटॅशियमयुक्त खनिजे, शर्करा आणि क-जीवनसत्त्व व ब-समूह जीवनसत्त्वे असतात. आयुर्वेदात प्राचीन काळापासून डाळिंबाचा वापर केला गेला असल्याचा संदर्भ आढळतो. फळाची आणि वृक्षाची साल जुलाब, हगवण आणि पोटाच्या तक्रारींवर गुणकारी असते. हृदय व घसा या अवयवांसाठी फळांचा रस पौष्टिक असतो. डाळिंबाच्या झुडपाचा आकर्षक कुंपणासाठी वापर करण्यात येतो. बागेत शोभेसाठी डाळिंबाचे दुहेरी फुले येणारे प्रकार लावतात. बहुधा ते वंध्य असतात. हिमाचल प्रदेश, पंजाब आणि काश्मीरमधील वनांत वाढणाऱ्या डाळिंबाच्या बिया गरासह वाळवून त्या ‘अनारदाणा’ या नावाने विकल्या जातात.