धाग्यांसाठी उपयुक्त अशी एक वनस्पती. स्पर्मानिएसी कुलातील कॉर्कोरस प्रजातीच्या वनस्पतींना ताग म्हणतात. पूर्वी ताग या वनस्पतीचा समावेश टिलिएसी कुलात आणि त्यानंतर माल्व्हेसी कुलात केला जात असे. आता तिचा समावेश स्पर्मानिएसी कुलात केला गेला आहे. ही वनस्पती मूळची आशियातील असून भारत (पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, ओडिश, उत्तर प्रदेश), बांगला देश व चीन या देशांत तिची व्यापारी स्तरावर लागवड करतात. भारतात तागाच्या व्हाइट ज्यूट (कॉ. कॅप्सुलॅरिस) आणि टोसा ज्यूट (कॉ. ओलिटोरियस) या दोन जाती आढळतात. व्हाइट ज्यूटपासून दोऱ्या आणि दोरखंड बनवितात. टोसा ज्यूटपासून मिळणाऱ्या तागाचे तंतू व्हाइट ज्यूटपासून मिळणाऱ्या तंतूंपेक्षा मऊ, रेशमी आणि मजबूत असल्यामुळे टोसा ज्यूट या जातीची लागवड व्यापारी स्तरावर होते. तिचा वापर धागे तयार करण्यासाठी तसेच अन्नपदार्थांत केला जातो. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी तागाचे बी लावून ताग २ मी. उंच झाल्यानंतर तो मातीत गाडण्याची पद्धत आहे.

ताग: पान, फूल व फळ

ताग ही २–४ मी. उंच वाढणारी वर्षायू वनस्पती आहे. खोड साधारण बोटाएवढे जाड व सरळ असते. ही वनस्पती जवळजवळ लावत असल्याने खोड टोकाकडे (शेंड्याला) शाखायुक्त असते. पाने साधी, लांबट, भाल्यासारखी, टोकदार व दातेरी असून पात्याच्या तळाशी दोन्ही बाजूंचे दात तंतूप्रमाणे असतात. पानांना उपपर्णे असतात. फुले लहान व पिवळी असून वल्लरीत येतात. फळ (बोंड) गोलसर व सु. १ सेंमी. व्यासाचे असून त्यावर ठळक शिरा असतात. फळाच्या वरच्या बाजूला खाच असते व फळ फुटून त्यातून अनेक पिंगट तपकिरी व गुळगुळीत बिया बाहेर पडतात.

तागाच्या पानांमध्ये प्रथिने, जीवनसत्त्व, बीटा कॅरोटीन, कॅल्शियम आणि लोह असते. या पानांचा फांट कटू, पौष्टिक, सारक व वायुनाशी असून यकृताच्या विकारावर तसेच हातापायाच्या जळजळीवर उपयुक्त आहे. अतिसारावर कच्च्या फळांचा आणि सुक्या मुळांचा काढा देतात.

तागाच्या खोडाच्या सालीच्या आत बळकट धाग्यांचे वलय असते. त्यांना तागाचे धागे म्हणतात. हे धागे १–४.५ मी. लांब असतात. या धाग्यांपासून दोऱ्या, सुतळी, गोणपाट व पोती तयार करतात. हा धागा जैवविघटनक्षम आहे. तसेच त्याचा पुनर्वापर करता येत असल्याने तो पर्यावरणपूरक आहे. या धाग्याला सोनेरी व रेशमी चमक असल्याने त्याला ‘सोनेरी धागा’ असेही म्हणतात. उत्पादन, खप आणि उपलब्धता या दृष्टीने वनस्पतींपासून मिळणाऱ्या धाग्यांत तागाचा क्रमांक कापसाच्या खालोखाल लागतो. तागाच्या उत्पादनात बांगला देश, भारत, चीन, म्यानमार, उझबेकिस्तान हे देश आघाडीवर आहेत.