एक पर्यावरणीय नैसर्गिक आपत्ती. भूमिपातामध्ये माती, डबर व खडक यांची राशी गुरुत्वामुळे तीव्र उतारावरून खाली पडण्याची, घसरण्याची अथवा वाहत जाण्याची क्रिया घडून येते. भूपृष्ठाच्या विस्तृत क्षरणाचा हा एक प्रकार असून ती एक भूवैज्ञानिक घटना आहे. भू-उतार अस्थिर झाल्यामुळे तीव्र उताराच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भूमिपाताच्या घटना घडतात.

भूमिपाताला नैसर्गिक प्रक्रिया आणि मानवी कृती कारणीभूत असू शकतात; (१) नैसर्गिक प्रक्रिया: भूजलाचा दाब वाढून उतार अस्थिर झाल्यामुळे, उतारात उभ्या शाकीय संरचना व मृदेतील पोषकद्रव्ये आणि मृदा संरचनेचा अभाव असल्यामुळे, नदीच्या किंवा समुद्राच्या लाटांनी उताराच्या तळाकडील भागाची झीज झाल्यामुळे, बर्फ किंवा हिमकडे वितळून किंवा जोरदार पावसाने उताराचा भाग भुसभुशीत झाल्यामुळे, स्थिर असलेल्या उतारावर भूकंपाच्या घडामोडींनी दाब वाढल्यामुळे किंवा उताराच्या भागात पाण्याचे प्रमाण वाढून उतार अस्थिर झाल्यामुळे, तसेच ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूमिपात घडून येतात. (२) मानवी कृती: निर्वनीकरण, लागवड आणि बांधकाम यांनी आधीच कमकुवत झालेले उतार अस्थिर केल्यामुळे, यंत्रांच्या आणि वाहतुकीच्या कंपनांमुळे, सुरुंगांमुळे, उतारावर केलेल्या कोणत्याही प्रकारच्या बांधकामांमुळे, उतारावरील उथळ मृदेतील खोलवर गेलेल्या वनस्पती काढून टाकल्यामुळे आणि शेतामध्ये किंवा वनांमध्ये केलेल्या मानवी कृतींमधून मातीतील पाण्याचे प्रमाण वाढल्यामुळेही भूमिपात होऊ शकतात.

भूकंप, नैसर्गिक घटकांचे बल, भूमीची दुर्बलता, दीर्घकाळ अतिपाऊस, खाणकाम व सिंचन अशा विविध कारणांमुळे वेगवेगळ्या प्रकारे भूमिपात होतो. भूमिपाताच्या कारणानुसार त्यांचे वर्गीकरण करण्यात येते. अमेरिकेच्या हमरस्ते संशोधन मंडळाने केलेले वर्गीकरण भूमिपातांच्या हालचालीवर आधारलेले असून ते बऱ्याच ठिकाणी वापरले जाते. त्यानुसार भूमिपातांचे भू-कोसळ, भू-सर्पण व भू-प्रवहन असे मुख्य प्रकार केले आहेत. (१) खडक व माती यांच्या राशी मुक्तपणे पडणे, डोंगरकडे कोसळणे याला भू-कोसळ किंवा भूमिकोसळ म्हणतात. नदी, समुद्रातील लाटा, यंत्रांच्या तसेच वाहतुकीच्या कंपनांमुळे (उदा., मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, कोकण रेल्वे मार्ग) डोंगरांच्या कडांची झीज होऊन अधांतरी राहिलेले कडे व कपारी कोसळतात. हा प्रकार खूप वेगाने आणि अनपेक्षितपणे घडून येतो. (२) काही वेळा खडकांची राशी आरामखुर्चीसारख्या अंतर्गोल किंवा सपाट उतारावरून घसरते. याला भू-सर्पण किंवा भूमिसरक म्हणतात. जगातील बहुतेक विध्वंसक भूमिपाताची सुरुवात खडकांच्या अशा घसरण्यामुळे होते. (३) वातावरणातील प्रक्रियांमुळे अपक्षय व क्षरण होऊन खडक आणि मृदा भुसभुशीत व ओलसर होतात आणि त्यांच्या राशी द्रवाप्रमाणे प्रवाहित होतात म्हणजे घसरतात, याला भू-प्रवहन किंवा भूमिप्रवहन म्हणतात. जेव्हा भूमिपात होतो तेव्हा यांपैकी एक किंवा सगळ्या क्रिया एकाच क्षणी होऊ शकतात.

भारतात हिमालयाच्या पर्वतीय प्रदेशात भूमिपात वारंवार होतात. ईशान्य व नैर्ऋत्य मान्सून पर्जन्यकाळात जेथे पाऊस खूप आणि जोरदार पडतो, अशा उतारावर भूमिपात होतो. भूमिपात झाल्यामुळे पर्यावरणीय बदल घडून येतात. भूमिपात झालेल्या भागात अरुंद व खोलगट भाग तयार होतात, उताराच्या पायथ्याशी डबराच्या राशी तयार होतात, सुपीक मृदा व वने नष्ट होतात, धरणे आणि बोगदे यांच्या उभारणीत अडथळे येतात, वाहतुकीचे मार्ग विसकळीत होतात, नदी तुंबून काही वेळा सरोवरे तयार होतात, नद्या-ओढे अडवले गेल्याने त्यांना पूर येतात, वृक्ष उन्मळून पडतात, उतारावरील झाडे घसरत जातात, तसेच काही झाडे वाकतात. समुद्रकिनाऱ्यावरील भूमिपातामुळे समुद्राची पातळी तात्पुरती उंचावते, किनाऱ्यालगतच्या भागात पाणी घुसून त्या भागातील सजीवांवर दुष्परिणाम होतो आणि वनस्पती व प्राणी यांची हानी होते. भारतात पर्वतीय प्रदेशात वारंवार भूमिपात होत असल्यामुळे तेथील जैवविविधतेला धोका निर्माण होतो.

भूमिपाताचे अलीकडील ज्ञात उदाहरण म्हणजे ३० जुलै २०१४ रोजी माळीण (ता. आंबेगाव, जि. पुणे) या गावात भूमिपात झाला. मध्यरात्री भूमिपात झाला तेव्हा गावकरी झोपेत असल्यामुळे पूर्ण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आणि १५१ लोक मृत्युमुखी पडले. या घटनेतून पुढील काही बाबी न‍िदर्शनास आल्या आहेत. ढगफुटीमुळे ही घटना घडली. २९ जुलै २०१४ पासून त्या भागात संततधार पाऊस पडत होता. एका दिवसात सु. १०·८ सेंमी. पाऊस तेथे झाला होता. या भागात मोठ्या प्रमाणावर निर्वनीकरण झाले होते. तसेच तेथील गावकऱ्यांनी भात आणि नाचणी या पारंपरिक पिकांऐवजी गव्हाची लागवड चालू केली होती आणि त्यासाठी उतारक्षेत्राचे मोठ्या भागावर सपाटीकरण केले होते. पीक पद्धतीतील बदलामुळे तेथील टेकडीचा भाग अस्थिर झाला होता. याखेरीज त्या भागातील डिंभे धरण, मोठ्या प्रमाणात केली गेलेली बांधकामे आणि उभ्या राहिलेल्या दगडांच्या खाणी याही भूमिपाताला कारणीभूत असल्याचे मानतात.

अभियांत्रिकीय प्रगतीमुळे भूमिपात आपत्तीचे विश्लेषण करणे आता शक्य झाले आहे. भौगोलिक माहिती प्रणाली आणि दूरस्थ संवेदना तंत्रज्ञान यांच्या साहाय्याने भूमिपात क्षेत्राचे नकाशे तयार करता येतात. या नकाशांचा उपयोग करून भूमिपातासारख्या आपत्तीचा पूर्वअंदाज करता येतो. भूमिपात होऊ नये, म्हणून उताराची स्थिरता वाढविता येते. उताराचा कोन कमी करणे, वाहते पाणी आणि भूजल यांचा परिणाम होऊ नये म्हणून चर पाडणे व बोगदे खणणे हे उपाय केले जातात. काही वेळा वनस्पतींची लागवड करून या आपत्तीची तीव्रता कमी होऊ शकते. खडकांच्या भेगा सिमेंटने बुजविल्या जातात किंवा त्यांवर लोखंडाच्या बारीक आणि मजबूत जाळ्या बसविण्यात येतात. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये असे उपाय केल्याचे दिसून येते. भूमिपातावर विविध उपायांनी नियंत्रण आणल्यास भूमीच्या वापरासंबंधी नियोजन करता येऊ शकते.

प्रतिक्रिया व्यक्त करा