इंद्रियांचा संयम करून मन एकाग्र करणे म्हणजे योग होय. रुग्णाला रोगापासून मुक्त करणे किंवा रोगाच्या लक्षणांवर उपाययोजना करणे यांसाठी करण्यात येणाऱ्या सर्व उपचारात्मक प्रक्रिया म्हणजे चिकित्सा होय. ज्या रोग चिकित्सेत योगोपचार वापरतात, तिला योगचिकित्सा म्हणतात. आयुर्वेद, होमिओपॅथी, अ‍ॅलोपॅथी, बारा-क्षार चिकित्सा अशा वैद्यकीय शास्त्रांचा मुख्य उद्देश रोगोपचार असतो. काही हजार वर्षांपासून चिकित्सेमध्ये योगाचा उपयोग होत आलेला आहे. मात्र योगचिकित्सा किंवा योगोपचार हे योगशास्त्राचे मुख्य उद्दिष्ट नाही.

महर्षी पतंजलींनी इ.स.पू. सु. दुसऱ्या शतकात योगसूत्र या आपल्या ग्रंथात योगाचे शास्त्र मुद्देसूद रीतीने पूर्णपणे विशद केले आहे. त्यात यम, नियम, आसन, प्राणायाम, तसेच प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या आठ अंगांचा उल्लेख आहे. यांपैकी पहिली चार अंगे शरीराशी निगडीत असून त्यांचा शरीराच्या आरोग्याशी संबंध येतो, तर इतर चार अंगे मनाच्या आरोग्याशी निगडीत आहेत. शरीराची विशिष्ट तयारी करणे, तसेच मन आणि चित्तशक्ती यांची ताकद वाढविणे यांच्यासाठी पहिल्या चार अंगांचा अभ्यास उपयोगी पडतो. निरोगी शरीरात मनही निरोगी असते, असे योगशास्त्रात मानले जाते. भारतीय तत्त्वज्ञानात मन व शरीर एकाच संयुगाचे घटक मानतात आणि आयुर्वेद या भारतीय वैद्यकशास्त्रातही हेच गृहीत धरले आहे.

योगशास्त्र मुळात वैद्यकशास्त्र नाही, हे लक्षात घेऊन त्याचा रोगोपचारात उपयोग केला पाहिजे. जाणकार वैद्य वैद्यकशास्त्रानुसार योग्य ते उपचार करतात. तसेच गरजेनुसार योग्य असलेले योगोपचार करतात. कोणतीही चिकित्सा परिपूर्ण नसते. अपघातजन्य रोग किंवा संसर्गजन्य रोग यांवर योगचिकित्सेत उपचार नसल्याने तीही परिपूर्ण नाही.

पतंजली योगसूत्रांनुसार शरीर व मन दोन्ही अखंड आहेत. या दोन्हींमध्ये समस्थिती राखणारी यंत्रणा असते. तीमुळे प्रत्येक व्यक्तीमध्ये जुळवून घेण्याची जन्मजात शक्ती असते. शरीर व मन यांना समस्थिती संतुलित ठेवण्यास किंवा बिघडल्यास शक्य तितक्या लवकर पूर्ववत होण्यास मदत करणे, हा योगोपचारांचा उद्देश असतो. रोग किंवा व्याधी हा समस्थिती संतुलनातील बिघाड आहे. प्रक्षोभक (रोगजनक) कारण शोधून ते नाहीसे करणे व शरीराची पूर्व अवस्था येण्यासाठी फक्त तेवढेच करणे; तसेच शरीराला स्वत:च प्रक्षोभकाविरुद्ध लढा देण्यास समर्थ बनवून स्वप्रयत्नांनी रोगावर मात करणे; या दोन दृष्टिकोनांतून योगोपचारांकडे पाहाता येते. रोग आणि आरोग्याच्या इतर सर्व बाबींकडे पाहण्याचा योगाचा दृष्टिकोन प्रक्षोभक कारणाचा शोध घेऊन ते नाहीसे करण्यात वेळ घालविण्याऐवजी आपले शरीर अधिक बळकट करून रोग नष्ट करणे, हा असतो.

योगशास्त्र वैद्यकाप्रमाणे चिकित्साशास्त्र नाही. मात्र वैद्यकात आरोग्यरक्षण, रोगनिवारण, व्यक्तिमत्त्व विकास यांसारखे विषय येतात; म्हणून या दोन्ही शास्त्रांमध्ये जवळचा संबंध आहे. धौती, बस्ती, नेती, त्राटक, नौली आणि कपालभाती या सहा यौगिक शुद्धिक्रिया हठयोगात समाविष्ट झाल्यानंतरच योगाचा रोगावरील उपचारांमध्ये उपयोग सुरू झाला आहे.

धौती क्रियेत शरीरातील अन्नमार्ग, मलमार्ग इ. आतील भाग धुवून किंवा पुसून स्वच्छ करतात. यासाठी वस्त्र, रबरी नळी वगैरे वापरतात. पाणी किंवा जलमिश्रित औषधे साठविलेल्या पिशवीला नळी जोडून ती औषधे गुदद्वारातून गुदाशयात ढकलून साफ करण्याच्या क्रियेला बस्ती म्हणतात. हिचे अनेक प्रकार व फायदे (बद्धकोष्ठ बरे होणे, मोठ्या आतड्याचे रक्ताभिसरण सुधारणे इ.) आहेत. नाक स्वच्छ करण्याच्या क्रियेला नेती म्हणतात. यासाठी पाणी (जल नेती), सुताची दोरी (सूत्र नेती) वगैरे वापरून नासामार्ग स्वच्छ करतात. डोळे उघडे ठेवून म्हणजे पापण्यांची उघडझाप न होऊ देता, दृष्टी एखाद्या वस्तूवर एकाग्र करणे म्हणजे त्राटक क्रिया होय. डोळे शुद्ध होणे व मन स्थिर होणे हे हिचे काही फायदे आहेत. उदरभित्तीतील उदरदंडी स्नायूंची विशिष्ट हालचाल म्हणजे नौली होय. अपचन, मलावरोध, पोटावरील मेद कमी करणे यांसाठी ही क्रिया उपयुक्त असते. हवेचा किंवा पाण्याचा उपयोग करून कपालभाती क्रिया करता येते. फुप्फुसांत घेतलेली हवा पोटाला जोराचा आकस्मित झटका देऊन बाहेर ढकलण्याच्या क्रियेला कपालभाती म्हणतात. सर्दी, पडसे व दमा यांसारख्या विकारांवर ही शुद्धिक्रिया उपयुक्त असते.

योगचिकित्सेकरिता काही मार्गदर्शक तत्त्वे अवलंबिणे गरजेचे असते. अशी काही मूलभूत तत्त्वे पुढीलप्रमाणे आहेत : चित्त, बुद्धी, मन, इंद्रिय आणि शरीर शिथिल करणे यांमुळे शरीरांतर्गत तणाव दूर होतात. व्यक्तीच्या क्षमतेनुसार सहज व सोपी करता येणारी विविध आसने करणे. आसन ही शरीर आणि मन यांच्या स्थिरतेसाठी घेतलेली विशिष्ट प्रकारची अंगस्थिती असते. प्रत्येक आसन करताना श्‍वासोच्छ्‌वास नैसर्गिकरीत्या चालू ठेवणे गरजेचे असते.

योगचिकित्सेत प्राणायामाला विशेष महत्त्व आहे. श्‍वसनाचे नियंत्रण करण्याच्या विविध प्रक्रियांना प्राणायाम म्हणतात. श्‍वसनासंबंधीच्या व्यायामांना श्‍वासायाम म्हणतात. प्राणायाम आणि श्‍वासायाम यांच्यात शिकवण व अभ्यास या दोन्ही पातळ्यांवर फरक करणे गरजेचे असते. पुष्कळ लोक प्राणायामाऐवजी श्‍वासायाम करतात आणि आसनांऐवजी फक्त व्यायामच करतात. रुग्णाच्या आहारविचारांत नेहमीच बदल करायला हवेत. तसेच आयुर्वेदानुसार उपचार परिणामकारक होण्यासाठी पथ्ये पाळणे गरजेचे असते.

काही रोग व त्यांवर सुचविलेले योगोपचार पुढे दिले आहेत: (१) अतिरक्तदाब – शवासन; (२) हृद्‌रोग – झटक्यानंतरच्या काळात सोपी अल्पकालीन आसने; (३) दमा – दोन झटक्यांदरम्यानच्या काळात आसने, प्राणायाम आणि यौगिक शुध्दिक्रिया; (४) मधुमेह – यौगिक शुध्दिक्रिया, आसने, प्राणायाम व आहारनियंत्रण; (५) बद्धकोष्ठ – काही आसने आणि यौगिक शुध्दिक्रिया; (६) स्त्रियांचे रोग – मासिक पाळी, सुलभ प्रसूती व प्रसूतीनंतरच्या तक्रारींवर काही आसने आणि यौगिक शुध्दिक्रिया; (७) लठ्ठपणा – सोपी आसने, प्राणायाम, यौगिक शुद्धीक्रिया आणि आहारनियंत्रण; (८) निद्रानाश – आसने, व्यायाम, चिंतन, झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने पाय धुणे, पाठीच्या कण्यावर वीस मिनिटे थंड पाण्याने स्नान; (९) मणक्यांचा त्रास – आसने, प्राणायाम; (१०) मनोविकार – आसने, प्राणायाम, यौगिक शुध्दिक्रिया, ध्यान; (११) सर्दी आणि डोकेदुखी – नेती, कपालभाती व प्राणायाम आणि (१२) आम्लपित्त, अग्निमांद्य, अन्नमार्गाचे काही विकार – शवासन, प्राणायाम, विशिष्ट यौगिक शुध्दिक्रिया (धौती शुध्दिक्रिया वगैरे). सर्वांत महत्त्वाचे म्हणजे योगोपचार तज्ज्ञ-व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली करणे हिताचे असते.

प्रतिक्रिया व्यक्त करा