(अनेक) पृष्ठवंशी (आणि अपृष्ठवंशी) प्राण्यांच्या मुखगुहेत असलेली लहान व कठीण ऊतींची संरचना. अन्नाचे तुकडे करण्यासाठी आणि चर्वण करण्यासाठी दातांचा उपयोग होतो. काही प्राण्यांमध्ये (मांसाहारी) भक्ष्य पकडण्यासाठी किंवा संरक्षणासाठी दातांचा उपयोग होतो. आहारानुसार व उपयोगानुसार वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये दातांचा आकार, संरचना, संख्या आणि जबड्याला असलेली जोडणी यांत विविधता आढळते.
मानवी दात
मानवाचे दात असमदंती असून त्यांच्या दाताचे तीन भाग पडतात : (१) किरीट म्हणजे बाहेरील भाग; (२) दंतमूळ, हे जबड्याच्या हाडात रुतून बसलेले असते; (३) मान म्हणजे हिरडीलगतचा आकुंचलेला भाग. दात तीन स्तरांनी बनलेले असतात : दंतिन, ज्यापासून पूर्ण दात बनलेला असतो; कठीण एनॅमल म्हणजे किरिटाच्या दंतिनावरील आवरण; दंतमज्जा, ही संयोजी ऊतींनी बनलेली असून तीत चेता आणि रक्तवाहिन्या असतात. दातांमध्ये या रक्तवाहिन्या आणि चेता दंतमुळाच्या टोकाशी असलेल्या रंध्रांवाटे आत शिरतात.
दातांच्या किरिटावरील आवरण (म्हणजेच एनॅमल) अत्यंत कठीण असते. दंतमूळ हाडासारख्या भासणाऱ्या पदार्थाने बनलेले असून या पदार्थाला संधानक म्हणतात. दंतमूळ जबड्याच्या हाडाच्या खोबणीत रुतून बसलेले असते, येथे संधानकालगत परिदंत आवरण असते. (हे आवरण तलम संयोजी ऊतींच्या तंतूंनी बनलेले असते). त्याने दात हिरड्यांना जोडलेले असतात.
मानवी दात भ्रूणाच्या मध्यजनस्तर आणि बहिर्जनस्तरापासून उत्पन्न होतात. एनॅमल हे तोंडातील अभिस्तरापासून उगम पावलेल्या खास एनॅमल जनकपेशींमार्फत तयार होते. दाताचे एनॅमल हायड्रॉक्सिअपेटिटच्या कॅल्शियम फॉस्फेटयुक्त स्फटिकाने बनलेले असल्यामुळे ते अत्यंत कठीण असते. प्रत्येक दात सुरुवातीला एका लहान गोळीसारखा असतो. मात्र, हळूहळू त्याला आकार प्राप्त होतो. दंतिन हे दंतिनजनक पेशींपासून तयार होते. यात सूक्ष्मनलिका असून त्यामध्ये दंतिनजनक जीवद्रव्य असते. एनॅमल आणि दंतिन एकमेकांना कार्बनी पदार्थांपासून तयार झालेल्या जाळीदार संरचनेने जुळलेले असतात. या भागात संवेदी चेता असतात. दंतमज्जेत दंतिनजनक पेशी असतात, या पेशी दातांचे क्षरण झाल्यास किंवा इजा झाल्यास दात असेपर्यंत दंतिनाची निर्मिती करीत राहतात.
वरच्या दातांना ऊर्ध्वहनू दंत तर खालच्या दातांना अधोहनू दंत म्हणतात. जेव्हा जबडा बंद केला जातो तेव्हा वरचे-खालचे दात एकमेकांवर घट्ट बसतात. प्रौढ व्यक्तीच्या तोंडात ३२ दात असतात. प्रत्येक जबड्यात पटाशीचे दात चार, सुळे दोन, उपदाढा चार, दाढा सहा असतात. ही रचना २/२, १/१, २/२, ३/३ अशा दंत सूत्राने दाखविली जाते. जबड्याच्या सर्वांत पुढील भागातील दातांना पटाशीचे दात म्हणतात. ते पटाशीसारखे चपटे असून, त्यांचा अन्न तोडण्यासाठी उपयोग होतो. त्यामागील टोकदार दातांना सुळे म्हणतात. त्यांचा उपयोग सोलण्यासाठी होतो. त्यामागील उपदाढा व दाढांचा पृष्ठभाग सपाट असून त्यांचा वापर चर्वण करण्यासाठी होतो. पुढच्या दातांनी जेव्हा अन्न तोडले जाते आणि मागच्या दातांनी बारीक केले जाते, तेव्हा दातांचे कार्य नीट होण्यासाठी दातांची पकड व्यवस्थित असावी लागते.
बालकामध्ये (दुधाचे दात २० तर प्रौढांमध्ये कायमचे दात ३२ असतात) दुधाचे दात हे मूल जन्माला येण्यापूर्वी तयार होऊ लागतात आणि त्याच्या जन्मानंतर ६ महिने ते २ वर्षांच्या कालावधीत हिरड्यांमधून बाहेर येतात. जेव्हा मूल ६–९ महिन्यांचे होते तेव्हा पटाशीचे दात येतात. १२–१४ महिन्यांनी पहिल्या दाढा येतात, १६–२० महिन्यांच्या कालावधीत सुळे येतात तर २०–२४ महिन्यांच्या कालावधीत दुसऱ्या दाढा येतात. कायमचे दात ६–७ वर्षांपासून येण्यास सुरुवात होते आणि वयाच्या १३ वर्षांपर्यंत तोंडात २० दात असतात, त्यानंतर सर्व दात पडून कायमचे दात येतात. कायमच्या दातांमध्ये प्रथम दाढा दिसू लागतात. त्यानंतर ६–९ वर्षाच्या कालावधीत पटाशीचे दात येतात, सुळे आणि उपदाढा ९–१२ वर्षांच्या कालावधीत तर दुसऱ्यादाढा ११–१३ वर्षांच्या कालावधीत येतात. तिसऱ्या दाढा म्हणजे अक्कलदाढा १८–२१ वर्षांच्या दरम्यान येतात. त्यानंतर दात येण्याचे थांबते. प्रत्येक व्यक्तीत हा कालावधी वेगवेगळा असतो.
दातांची वाढ होताना वा वेगवेगळ्या रोगांमुळे दातांवर वाईट परिणाम होऊ शकतात. मनुष्यामध्ये दंतक्षरण (दातांची झीज), परिदंत आवरणाचे रोग आणि अन्य रोग होतात. दंतक्षरण हा जीवाणूंमुळे होणारा रोग असून या रोगात दाताचे एनॅमल आणि दंतिन यांवर थर जमा होतो किंवा त्यांचा नाश होत जातो. वेळीच उपचार केले नाहीत तर दंतमज्जा बधिर होऊन दाताच्या टोकाकडील भागाला गळू होते. हे जीवाणू दातावरील संरक्षक आवरण स्तरावर पसरतात आणि दातातील कॅल्शियमयुक्त संयुगाचे विघटन करू शकणारी आम्ले आणि विकरे निर्माण करतात. गोड आणि अन्य खाद्यपदार्थ दातांच्या पृष्ठभागावर चिकटून राहतात; हे पदार्थ अशा जीवाणूंच्या क्रियांसाठी फायदेशीर ठरतात. लाळेमधील इम्युनोग्लोब्युलिन दातांचे क्षरण (होण्यापासून) रोखतात. लाळेचे पाझरणे कमी झाल्यास दातांचे क्षरण होऊ शकते. दातांना जोडलेल्या ऊतींना होणारे परिदंत आवरणाचे रोग तीव्र किंवा सामान्य संसर्ग आहेत. मात्र त्यामुळे दातांची किंवा ऊतींची हानी होते.
तोंडात सतत पाझरणाऱ्या लाळेमुळे दातांच्या पृष्ठभागावरील आम्लता कमी होते, दातांतील कॅल्शियम विरघळण्याची क्रिया बंद होते व कॅल्शियम क्षारांचे संरक्षक आवरण दातांवर पुन्हा निर्माण होण्याची क्रिया सुरू होते. काही विशिष्ट प्रकारचे चीज खाण्याने दात किडण्याला प्रतिबंध होतो असे आढळून आले आहे. आहारात व पाण्यात (विशेषत: वाढीच्या वयात) सौम्य प्रमाणात फ्ल्युओराइड असल्यास दातांवरील एनॅमल कठीण होऊन दात किडण्याच्या प्रक्रियेला प्रतिबंध होतो. परंतु जगात अनेक ठिकाणी नैसर्गिक पाण्यात व अन्नात फ्ल्युओराइड असल्याने पाण्यात किंवा दंतमंजनात फ्ल्युओराइड मिसळण्याच्या योग्यतेबद्दल मतभेद आहेत.दात किडून खड्डे पडल्यावर ते निर्जंतुक करून ते भरण्याचा उपचार दंतरोगतज्ज्ञ करतात. यासाठी पूर्वी सोने, चांदी, पारा यांसारख्या धातूंची मिश्रणे वापरली जात. आता या पदार्थांसोबत दाताच्या रंगाचे रासायनिक व सिरॅमिक पदार्थ वापरतात. दातांच्या मुळापर्यंत शोथ पसरून मुळाशी पू झाला असल्यास आधी दातांतील खड्ड्यांतून मुळापर्यंत पोहोचून तो भाग जंतुनाशकांनी स्वच्छ केला जातो व नंतर दात मुळापासून भरला जातो. याला रूट कॅनल ट्रिटमेंट असे म्हणतात. याही उपचाराने दात पूर्ववत झाला नाही तर शेवटचा उपाय म्हणून तो भाग बधीर करून किडलेला दात मूळापासून काढून टाकतात. दुधाचा दात किडल्यामुळे काढून टाकल्यास त्या जागी कायमचा दात येतो. मात्र, कायमचा दात किंवा उतारवयात सर्व दात काढून टाकल्यास त्या जागी नवीन दात येत नाहीत, अशा वेळी कृत्रिम दात किंवा कवळी लावावी लागते.
दात कॅल्शियमयुक्त असल्यामुळे ते हजारो वर्षे टिकून राहतात. म्हणूनच कपीपासून मानव कसा उत्क्रांत होत गेला, हे पाहण्यासाठी पुराजीवशास्त्रज्ञ दातांचा अभ्यास करतात. पुराजीवशास्त्रज्ञांनी मानवाच्या पूर्वजांच्या दातांचे आकार, आकारमान आणि दातांची संरचना या संदर्भात चित्रस्वरूपात माहिती जमा केली आहे. त्यानुसार उत्खननात सापडलेल्या मानवाचा कालखंड ठरविणे सुलभ होते.
प्राण्यांचे दात:
सस्तन प्राण्यांच्या दातांचे सूत्र आणि आकार यांत विविधता आढळते. कपींचे दात माणसांप्रमाणे असतात; परंतु त्यांच्या नरांचे सुळे मोठे व टोकदार असतात. बॅबूनला एकूण ८ उपदाढा, १२ दाढा असतात तर माकडांना १२ उपदाढा, १२ दाढा असतात. मांसाहारी प्राण्यांमध्ये कुत्र्याला १६ उपदाढा, ८ दाढा असून ६ पटाशीचे दात असतात. त्यांचे सुळे लांब असून ते पटाशीच्या दातांपासून अलग असतात. मार्जार कुलातील प्राण्यांना ८–१२ उपदाढा आणि केवळ ४ दाढा असतात. खुरी प्राण्यांच्या दाढा आणि उपदाढांचा पृष्ठभाग सपाट असतो. त्यामुळे त्यांना गवताचे चर्वण करणे सोपे जाते. कुरतडणाऱ्या प्राण्यांना ४ पटाशीचे दात, १२ दाढा असतात. सतत काही ना काही कुरतडत राहिल्यामुळे त्यांच्या दातांची जरी झीज होत असली तरी पटाशीचे दात सतत वाढत असतात. मासे, काही उभयचर आणि सरीसृप प्राण्यांच्या दातांचा आकार आणि संरचना सारखी असते. या दातांना समदंती म्हणतात. या दातांमध्ये फक्त किरीट असतो. या दातांचा उपयोग केवळ भक्ष्य पकडण्यासाठी होतो, अन्न चावण्यासाठी होत नाही. पक्ष्यांना दात नसतात.