धार्मिक भावनेतून पवित्र मानलेले उपवन. जगातील निरनिराळ्या संस्कृती असलेल्या समाजाने पवित्र भावनेतून वृक्षांची वाढ करून ते क्षेत्र सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न या उपक्रमाद्वारे केला आहे. भारतातील समाजाने धार्मिक महत्त्व देऊन राखीव ठेवलेल्या लहानलहान क्षेत्राच्या उपवनास देवराई म्हणतात. देवराई ही वृक्षवाढीसाठी मनुष्याने व्यक्त केलेली कृतज्ञतेची एक भावना आहे.

देवराई ही एक स्वतंत्र परिसंस्था असते. सामाजिक श्रद्धेतून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे या परिसंस्थांचे संरक्षण होते. त्यामुळे वनस्पती आणि प्राणी यांच्या विविध जातींचे संरक्षण होते. भारताच्या निरनिराळ्या प्रदेशांत देवराया आहेत. बहुतेक देवरायांचे हिंदू, मुस्लिम व बौद्ध धर्म तसेच वेगवेगळ्या आदिवासी गटांमार्फत रक्षण केले जाते. आयुर्वेदिक औषधी वनस्पतींची उपलब्धता हे देवरायांचे एक वैशिष्ट्य मानले जाते. फळे, फुले, मध, वाळलेले लाकूड इ. गोळा करण्यासाठी देवरायांचा उपयोग होतो. अशा परिसरात निर्वनीकरणास प्रतिबंध असल्यामुळे वृक्षांचे संरक्षण होते आणि मृदेची धूप होत नाही. बहुतेक देवराया या जलाशयाजवळ असतात. त्यामुळे लोकांची पाण्याची गरज भागविण्यास देवराया नकळत उपयोगी पडतात.

या पारंपरिक उपयोगाशिवाय आधुनिक दृष्ट्या या देवराया उपयुक्त आहेत. देवराया या जैविक विविधतेच्या दृष्टीने समृद्ध असतात. शिकारी व वृक्षतोडीला बंदी असल्याने प्राण्यांचा अधिवास सुरक्षित राहतो. देवरायांच्या आजूबाजूच्या प्रदेशापेक्षा देवरायांमध्ये प्राणी व वनस्पती यांच्या वाढीसाठी अनुकूल पर्यावरण असते. त्यांचे संरक्षण होत असल्याने जनुकीय विविधता राखली जाते.

भारतात सु. एक लाख तर महाराष्ट्रात सु. २,५०० देवराया आहेत. लहानलहान क्षेत्राच्या देवराया भारतात सर्वत्र आहेत. मेघालयात प्रत्येक गावात एक देवराई असते. उत्तराखंड राज्यातील हरियाली, तर हिमाचल प्रदेशातील शिपीया या सर्वांत मोठ्या देवराया आहेत. महाराष्ट्रातील कृष्णा, भीमा, गोदावरी या नद्यांच्या उगम परिसरातील महाबळेश्वर, भीमाशंकर आणि त्र्यंबकेश्वर येथील देवराया वैशिष्ट्यपूर्ण आहेत. नागरीकरणात वाढ, संसाधनांचा अतिरिक्त वापर, पर्यावरण गुणवत्तेत होत असलेली घट, अपवादात्मक राबविलेल्या चुकीच्या धार्मिक प्रवृत्ती यांमुळे देवरायांच्या अस्तित्वास धोका निर्माण झाला आहे. मात्र स्थानिक, सामाजिक व सांस्कृतिक परंपरेचे जतन करण्यास देवराया पूरक ठरल्या आहेत.