जगात सर्वत्र मोठ्या संख्येने असलेला पाळीव पक्षी. प्रामुख्याने मांस आणि अंडी मिळविण्यासाठी हे पक्षी जगभर पाळले जातात. पक्ष्यांच्या फॅजिअॅनिडी कुलात त्याचा समावेश होत असून शास्त्रीय नाव गॅलस डोमेस्टिकस आहे. गॅलस गॅलस या रानटी कोंबड्यांच्या जातीपासून ही पाळीव जात निर्माण झाल्यामुळे या प्राण्याचे नाव गॅलस गॅलस डोमेस्टिकस आहे. कोंबडा म्हणजे नर (कॉक) आणि कोंबडी म्हणजे मादी (हेन) असे म्हटले जाते.
इतर सर्व पक्ष्यांप्रमाणे कोंबड्याला डोके, मान, चोच, पंख आणि पाय हे मुख्य अवयव असतात. यांखेरीज याच्या शरीरावर खास मांसल भाग (अवयव) वाढलेले असतात. याच्या डोक्यावर लालभडक तुरा असून तो एका बाजूस पडलेला असतो. कोंबड्याच्या डोक्यावर सरळ, उभा लालभडक तुरा असतो, तर चोचीच्या खाली लालभडक कल्ला असतो. यांमुळे हा पक्षी इतर पक्ष्यांहून वेगळा दिसतो. पूर्ण वाढ झालेल्या कोंबड्याचे वजन ०.५ ते ५ किग्रॅ. असते. इतर सर्व पक्ष्यांप्रमाणे याच्या अंगावर पिसे असतात. पायाचा खालचा भाग वगळता पूर्ण शरीर पिसांनी झाकलेले असते. थंड हवामानात पिसांमुळेच याचे शरीर उबदार राहते.
कोंबडीच्या व कोंबड्याच्या तळपायाला पुढे तीन व मागे एक अशा चार नख्या (नखर) असतात. नख्यांचा उपयोग जमीन उकरण्यासाठी व झुंजीच्या वेळी केला जातो. पायाचा खालचा भाग आणि पायांवर खवले असतात. पंख असले तरी इतर पक्ष्यांप्रमाणे कोंबड्यांना खूप उंच किंवा दूर उडता येत नाही. मात्र शत्रूपासून बचाव करण्यासाठी अथवा रात्री मुक्कामाच्या (निवासाच्या) जागी पोहोचण्यासाठी हा पक्षी काही अंतर (४०-५० मी.) उडू शकतात. तुर्याच्या थोडे खाली डोळे असतात. कान लहान असून पिसांमुळे सहज दिसून येत नाहीत. मानेवर पिसे असून ती नरामध्ये आकाराने मोठी असतात. मादीच्या शेपटीपेक्षा नराचे शेपूट मोठे व भरगच्च असून त्यातील पिसे लांब आणि जाड असतात. या पक्ष्याची दृष्टी व श्रवणशक्ती तीव्र असते. मात्र वास आणि स्वाद घेण्याची क्षमता माणसांपेक्षाही कमी असते. तुरा आणि कल्ला लाल भडक रंगाचे असतात, कारण या भागांत रक्तपुरवठा अधिक असतो. तुरा, कल्ला आणि कानाची पाळी यांवरून हे पक्षी एकमेकांना ओळखतात आणि त्यानुसार जोडीदार निवडतात.
या पक्ष्याच्या पचनसंस्थेत अन्नपुट (क्रॉप) आणि पेषणी (गिझार्ड) अशी दोन वैशिष्यपूर्ण इंद्रिये असतात. पिशवीसारख्या (बटव्यासारख्या) अन्नपुटात अन्न साठविले जाते आणि नंतर ते पेषणीत शिरते. पेषणीचे आतील आवरण खडबडीत असते. कोंबड्याने गिळलेले वाळूचे किंवा दगडाचे लहान-लहान खडे पेषणीत असतात. खडबडीत आवरण, स्नायूंची हालचाल आणि खड्यांच्या साहाय्याने अन्न बारीक केले जाते आणि पचन घडून येते.
नर व मादी यांच्या मिलनातून अंडी फलित होतात. या अंड्यामध्ये भ्रूणाची (जन्मणार्या पिलाची) वाढ झपाट्याने होते. त्याच्या पोषणासाठी अंड्यातील बलक, पांढरा भाग आणि कवच यांचा उपयोग होतो. २१ दिवसांनंतर अंड्यातून पिलू बाहेर येते. कोंबडीची पिले जन्म झाल्याबरोबरच चालू, पोहू, खाऊ आणि पिऊ शकतात.
अनेक देशांत मांसासाठी आणि अंड्यांसाठी कुक्कुटपालन हा औद्योगिक व्यवसाय आहे. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, चीन, जपान, ब्राझील, भारत आणि मेक्सिको हे देश या उद्योगात आघाडीवर आहेत. कुक्कुटपालन केंद्रात अंडी मिळविण्यासाठी कोंबड्या पाळतात. एकदा अंडी देण्याची प्रक्रिया थांबली की, त्याच कोंबड्यांपासून मांस मिळवितात.
लहान पिलांची वाढ होण्यासाठी त्यांना उबदार वातावरणात ठेवले जाते. या पिलांची वाढ होण्यासाठी त्यांच्या आहारात बारीक केलेले धान्य, मांसाचे बारीक तुकडे, जीवनसत्वे आणि खनिजपूरक पदार्थांचा समावेश असतो. जन्मल्यापासून २० आठवडे झाले की, कोंबडी अंडी द्यावयास लागते. सुमारे एक वर्षभर कोंबडी एक दिवसाआड एक अंड देते.
अंडी अधिक मिळविण्यासाठी कोंबडीच्या प्रकारानुसार कुक्कुटपालन केंद्रातील प्रकाशयोजना, त्यांचे पोषण आणि त्यांचे निरोगीपण इ. बाबी महत्त्वाच्या असतात. कुक्कुटपालन केंद्रात दिवसा १२ तासांचा नैसर्गिक प्रकाश व रात्री दिव्यांचा कृत्रिम अशी एकूण १४ ते १६ तास प्रकाश देणारी आणि दिवस वाढविल्याचा आभास निर्माण करणारी विशिष्ट प्रकाशयोजना केलेली असते. त्यामुळे कोंबड्या लहान वयात अंडी घालण्यास सुरवात करतात व अंडीदेखील जास्त देतात. वर्षाभरानंतर अंडी देण्याचे प्रमाण कमी-कमी होत जाते. फलन झालेल्या अंड्यांपासून पिले जन्माला येतात. मात्र अंडी देण्यासाठी कोंबड्यांमध्ये फलन होणे आवश्यक नसते. कुक्कुटपालन केंद्रातून बाजारात विक्रीसाठी आलेली अंडी अफलित असतात. त्यांना ‘शाकाहारी अंडी’ म्हणतात.
कोंबड्यांच्या मांसापासून आणि अंड्यांपासून प्रथिने मिळतात. यांच्या मांसात मेदाचे प्रमाणही कमी असते. मात्र कोंबडीच्या अंड्यातील पिवळ्या बलकात कोलेस्टेरॉल या मेदाचे प्रमाण अधिक असते. एखाद्या व्यक्तीच्या रक्तात अधिक प्रमाणात कोलेस्टेरॉल असल्यास अशा व्यक्तीला हृदयविकाराची शक्यता जास्त असते, असे आढळून आले आहे. अशा व्यक्तीला अंड्यातील बलक न खाण्याचा सल्ला दिला जातो. विविध लशी तयार करण्यासाठी अंड्यांचा वापर करतात. या लशींपासून माणसाचे आणि प्राण्यांचे रोगांपासून संरक्षण होते.