परिमैत्रीपूर्ण ही संज्ञा परिसंस्थापूरक या अर्थाने मानवी वर्तनाला, कृतीला किंवा उत्पादनांना लावली जाते. या संज्ञेतून पृथ्वीवरील सजीवांना अपाय होणार नाही, परिसंस्थेतील कोणत्याही घटकावर दुष्परिणाम होणार नाही, असे मानवी वर्तन किंवा कृती असणे अभिप्रेत आहे. ही संज्ञा प्रामुख्याने ऊर्जा, जल व मृदा अशा नैसर्गिक संसाधनांच्या संधारणाच्या कृतीसाठी वापरली जाते.
परिमैत्रीपूर्ण उत्पादन पर्यावरणपूरक असते. अशा उत्पादनांमुळे जल, भूमी आणि मृदा यांच्या प्रदूषणास प्रतिबंध होतो. संसाधनांच्या वापरासाठी योग्य जाणीव ठेवून तसे कार्य करणे अशा कृतींची सवय असणे, हे परिमैत्रीचे वर्तन होय.
पर्यावरण व मानवी जीवन यांची सुरक्षा लक्षात घेऊन परिमैत्र उत्पादने तयार केली जातात. ही उत्पादने विषारी नसतात. शाश्वत रीत्या वाढणारे, वाढविल्या जाणाऱ्या घटकांचा वापर करणे आणि परिसंस्था टिकून राहतील अशा रीतीने उत्पादने घेणे, हे परिमैत्रीमध्ये घडते. यात सेंद्रिय घटक किंवा पदार्थांची वाढ ही विषारी कीटकनाशके व तणनाशके यांचा वापर न करता केलेली असते. काही उत्पादने काच, लाकूड, धातू किंवा प्लॅस्टिक ही पुनर्चक्रीकरणाने तयार होतात. त्यांच्या अपशिष्टापासून नव्या वस्तू वापरासाठी तयार केल्या जातात. स्वत:जवळील असलेल्या संसाधनांचा कमीत कमी वापर करून परिमैत्रीपूर्ण सवयी जोपासता येतात.