पर्यावरणाचा वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास करणारी ज्ञानशाखा. एखाद्या सजीवास परिवेष्टित करणारे सजीव, निर्जीव, रासायनिक आणि भौतिक घटक म्हणजेच त्या सजीवाचे पर्यावरण होय. जैविक व अजैविक घटक मिळून परिसंस्था तयार होते. पर्यावरणविज्ञान म्हणजे विविध परिसंस्थांच्या प्रणालींमधील परस्परसंबंधांचे अध्ययन होय. यामध्ये पृथ्वीवरील पर्यावरणाचे आकलन व मानवी जीवनाचा पर्यावरणावर पडणारा प्रभाव यांचा अभ्यास केला जातो. या ज्ञानशाखेत भौतिकविज्ञान आणि जीवविज्ञान यांचा समन्वय साधला जातो; त्याद्वारा पर्यावरणीय आव्हानांचे व समस्यांचे अध्ययन केले जाते; त्यावर उपाय शोधण्यासाठी संशोधन केले जाते.

पर्यावरणविज्ञान ही भौतिकविज्ञान, रसायनविज्ञान, जीवविज्ञान, परिस्थितिविज्ञान, मृदाविज्ञान, भूविज्ञान, भूगोल, वातावरणविज्ञान अशा विविध विज्ञानविषयांना एकत्र आणणारी ज्ञानशाखा आहे. पर्यावरण विज्ञानांतर्गत सामाजिक घटकांचासुद्धा अभ्यास केला जातो. यात मानवीय आंतरसंबंध व पर्यावरणविषयक धोरणे यांचा अभ्यासही अंतर्भूत होतो.

पर्यावरणविज्ञान हा विषय १९६० च्या दशकात अभ्यासला जाऊ लागला. गुंतागुंतीच्या पर्यावरणीय समस्या व आव्हानांचा यशस्वीपणे सामना करण्यासाठी विविध ज्ञानशाखांमधील महत्त्वपूर्ण तत्त्वांचा आणि सिद्धांतांचा प्रत्यक्ष वापर कसा करायचा हा या विषयाचा आशय आहे. पर्यावरणीय समस्या सोडविण्यासाठी केलेल्या पर्यावरणीय कायद्यांचासुद्धा समावेश यात करण्यात आला आहे.

पर्यावरणविज्ञानाचे घटक

वातावरणविज्ञान : यामध्ये पृथ्वीच्या वातावरणातील (वायुमंडलाचे) वायू व हरितगृह वायू, वायुजनित प्रदूषके, ध्वनिप्रदूषके, अतिनील किरणे इत्यादींचे अध्ययन केले जाते.

पारिस्थितिकीविज्ञान : यात सजीव आणि त्यांच्या पर्यावरणातील आंतरक्रियांचे अध्ययन केले जाते.

रसायनविज्ञान : यात पर्यावरणातील रासायनिक बदलांचे अध्ययन केले जाते. रासायनिक प्रदूषणामुळे कोणत्या सजीवांवर काय परिणाम होतील, याचे आकलन यात होऊ शकते.

भूविज्ञान : पृथ्वीची संरचना, जलावरण, सागरविज्ञान इत्यादी बाबींचे यात अध्ययन केले जाते. पर्यावरणविज्ञान हा एक आंतरशाखीय आणि व्यापक स्वरूपाचा विषय आहे आणि पर्यावरणाच्या सर्वंकष अभ्यासासाठी उपयुक्त आणि आवश्यक आहे.