वाटाणा (पिसम सॅटिव्हम) : (१) वनस्पती, (२) फुले, (३) शेंगा, (४) बिया.

(पी). एक उपयुक्त कडधान्य. वाटाणा ही वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव पिसम सॅटिव्हम आहे. हरभरा, भुईमूग, गोकर्ण या वनस्पतीही फॅबेसी कुलातील आहेत. वाटाणा ही वनस्पती मूळची भूमध्य समुद्राजवळील देश जसे ईजिप्त, ग्रीस, टर्की येथील असावी, असे पुराजीवविज्ञानाच्या अभ्यासातून दिसून आले आहे. भारतात वाटाण्याची लागवड इ.स.पू. २२५०–१७५० या काळात सुरू झाली. भारतात हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, ओडिशा, पंजाब व महाराष्ट्र या राज्यांत मोठ्या प्रमाणावर हे कडधान्य पिकविले जाते. जगाच्या अनेक भागात वाटाण्याची लागवड व्यापारी स्तरावर केली जाते.

वाटाणा ही वर्षायू वनस्पती आहे. तिची शिंबावंत वेल आधाराने १–२ मी. उंच वाढते. पानांच्या बगलेतून वाढलेल्या तणावांद्वारे (प्रतानांच्याद्वारे) ही वनस्पती आधाराला वेढून वाढत जाते. वाटाण्याची मुळे खोलवर जात नाहीत. मुळांवर असलेल्या गाठींमध्ये नायट्रोजन स्थिरीकरण करणारे जीवाणू असतात. खोड नाजूक व हिरवे असते. पाने संयुक्त व पिसासारखी असून पानांच्या टोकाकडील पर्णिकांचे रूपांतरण तणावांमध्ये झालेले असते. फुले एकटी किंवा लहान मंजिऱ्यांवर येतात; ती लहान, पांढरी किंवा जांभळी व पतंगरूप असतात. निदलपुंज ५, संयुक्त व असममित असते. दलपुंज ५, मुक्त असून एक दल सर्वांत मोठे, आतील दोन लहान आणि त्याच्या आतील दोन एकबाजूने जुळलेली असून ‍होडीसारखी असतात. फुलांमध्ये पुंकेसर १० असून त्यांपैकी १ मुक्त, तर ९ संयुक्त असतात. शेंगा ५–१० सेंमी. लांब व स्फुटनशील असून त्यात ३–६ हिरव्या बिया असतात. वाळल्यावर बिया पिवळ्या दिसू लागतात. या वनस्पतीमध्ये स्वपरागण घडून येते.

वाटाण्याच्या प्रति १०० ग्रॅ. बियांमध्ये ६० ग्रॅ. कर्बोदके, १ ग्रॅ. मेद, २५ ग्रॅ. प्रथिने, जीवनसत्त्व, ब-समूह जीवनसत्त्वे आणि लोह असते. तसेच कॅल्शियम, पोटॅशियम व फॉस्फरस इ. खनिजे असतात. वाटाण्याच्या ओल्या तसेच वाळलेल्या बियांची उसळ करतात. तसेच अन्य भाज्यांत वा मसालेभातासारख्या पदार्थांत ते मिसळतात. बियांपासून वाटाण्याची डाळ तयार करतात. ती पौष्टिक, वातूळ, शीतल, भूक वाढविणारी, पित्तशामक, कफ कमी करणारी असते. वाटाण्याचे सार पचनसुलभ, रक्तदोष यांवर गुणकारी असते. वाटाण्याचे हिरवे दाणे हवाबंद डब्यात भरून ठेवतात, गोठवून ठेवतात आणि सुकवून ठेवतात. त्यामुळे ते वर्षभर उपलब्ध होतात.