स्किनर, बुऱ्हस फ्रेडरिक : (२० मार्च १९०४ — १८ ऑगस्ट १९९०). अमेरिकन मानसशास्त्रज्ञ. जन्म अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया (Pennsylvania) राज्यातील सस्क्वेहॅना  (Susquehanna) येथे. हार्व्हर्ड विद्यापीठातून एम्.ए.ची पदवी मिळवल्यानंतर (१९३०) त्याच विद्यापीठातून त्याने प्रायोगिक मानसशास्त्रातली पीएच्.डी. ही पदवी प्राप्त केली (१९३१). १९३६ पर्यंत तो हार्व्हर्डमध्येच संशोधक म्हणून काम करीत राहिला. त्यानंतर मिनेसोटा विद्यापीठात त्याने अध्यापन केले. १९५४ मध्ये इंडियाना विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाचा प्रमुख म्हणून त्याची नियुक्ती झाली.

रशियन शरीरक्रियावैज्ञानिक  इव्हान पाव्हलॉव्ह (१८४९ — १९३६), त्याचप्रमाणे विख्यात अमेरिकन मानसशास्त्रज्ञ जॉन ब्रॉड्स वॉटसन (१८७८— १९५८) ह्यांच्या वर्तनवादाने प्रभावित होऊन स्किनर मानसशास्त्राच्या अभ्यासाकडे वळला. मानसशास्त्राला एक भौतिकशास्त्र म्हणून स्थान प्राप्त करून घ्यावयाचे असेल, तर ह्या शास्त्राला विशुद्ध वैज्ञानिक स्वरूप दिले पाहिजे; ज्याप्रमाणे निरनिराळी भौतिकशास्त्रे केवळ इंद्रियगोचर घटनांचा अभ्यास करतात, त्याप्रमाणे मानसशास्त्रानेही केवळ इंद्रियगोचर वर्तनाचाच अभ्यास केला पाहिजे; उद्दीपक आणि प्रतिक्रिया ह्यांच्यातील संबंध म्हणजे अमुक एका उद्दीपकामुळे कोणती प्रतिक्रिया घडून येईल हे अचूकपणे सांगता आले, तर मानवी वर्तनाबद्दलची भाकितेही अचूकपणे करता येतील. मन, जाणीव हे सर्व अमूर्त असल्यामुळे त्यांच्या आधारे वैज्ञानिक संशोधन करणे योग्य नाही. इंद्रियगोचर अशा मानवी वर्तनाचाच अभ्यास केला पाहिजे, अशी वर्तनवाद्यांची भूमिका होती. R = f (S) म्हणजे प्रतिक्रिया उद्दीपकमूल्यांवर अवलंबून असतात, हे त्याचे सूत्र होते.

वर्तनवादाचे दोन टप्पे मानतात. पहिला वॉटसनप्रणीत वर्तनवाद आणि दुसरा नव-वर्तनवाद. स्किनर हा नव-वर्तनवादी होता. नव-वर्तनवाद्यांनी मुख्यतः शिक्षणप्रक्रियेचा विचार केला. त्यांनी वेगवेगळ्या रीतींनी वर्तनाचे विश्लेषण केले.

वर्तनाच्या बाबतीत स्किनरची दृष्टी सर्वांगस्पर्शी होती. विशेष म्हणजे त्याने प्रतिक्रियांचे दोन प्रकार मानले : एक, प्रत्युत्तरात्मक प्रतिक्रिया आणि दोन, स्वयंभावी प्रतिक्रिया. प्रत्युत्तरात्मक प्रतिक्रिया ही एखाद्या बाह्य उद्दीपकाने प्रेरित झालेली असते, तर स्वयंभावी प्रतिक्रियेत बाह्य उद्दीपक दिसत नसतो. ती स्वयंस्फूर्त असते. ती प्राण्यांकडून आपोआप निक्षिप्त होते. स्वयंभावी प्रतिक्रियांमागे तहान, भूक ह्यांसारखी अंतःस्थ प्रेरके असतात. अशा प्रेरकांना एडवर्ड चेस (१८८६—१९५९), टोलमन ह्या नव-वर्तनवाद्यांनी मध्यस्थित परिवर्तके ( इंटरव्हेनिंग व्हेरिएबल्स ) असे म्हटले आहे; तथापि स्किनरने ही मध्यस्थित परिवर्तके प्रायोगिक नियंत्रणाच्या पलीकडची असून अध्ययनासाठी उपयोगी नसतात; ती विचारात घेण्याची आवश्यकता नाही असे मत व्यक्त करून ती उपेक्षणीय ठरविली.

प्राण्यांच्या ज्ञानसंपादन प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी स्किनरने एक पेटिका बनवली होती. ‘ स्किनर बॉक्स ’ म्हणून ती प्रसिद्ध आहे. ह्या पेटिकेतला तरफेचा एक दांडा दाबला, की टण् असा आवाज करीत अन्नाची गोळी थाळीत पडते. प्राण्याला प्रथम तो आवाज ऐकू येतो आणि नंतर ती गोळी खावयास मिळते. टण् असा येणारा आवाज अभिसंहित प्रबलक ( कंडिशन्ड रेन्फोर्सर ) म्हणून काम करतो. हा आवाज येताच त्याने प्रयोगासाठी वापरलेले उंदीर आधी अन्नासाठी धावायला शिकले आणि नंतर तो दांडा दाबायला शिकले; कधी कधी एकाच प्रयत्नात त्यांना हे कळत असे. स्किनरच्या पेटिकेचे वैशिष्ट्य असे, की त्यात एडवर्ड ली थॉर्नडाइक (१८७४ —१९४९) ह्या मानसशास्त्रज्ञाने ज्ञानसंपादन प्रक्रियेत अतिशय महत्त्वाची मानलेली प्रयत्न-प्रमाद पद्धती आणि पाव्हलॉव्ह ह्याने दाखवून दिलेली प्रतिक्षेपी क्रियांच्या अभिसंधानाची पद्धती ह्या दोहोंची सांगड तेथे घातलेली आहे. थॉर्नडाइकच्या पद्धतीत केवळ प्रतिक्रियेचा बदल असतो, तर पाव्हलॉव्हच्या पद्धतीत उद्दीपकाचा बदल असतो. स्किनरच्या पेटिकेत हे दोन्ही बदल एकत्र सापडतात.

स्किनरचे विशेष उल्लेखनीय ग्रंथ असे : बिहेव्हिअर ऑफ ऑर्गॅनिझम्स  (१९३८), वॉल्डन टू (१९४८),सायन्स अँड ह्यूमन बिहेव्हिअर  (१९५३), व्हर्बल बिहेव्हिअर (१९५७), द टेक्नॉलॉजी ऑफ टीचिंग (१९६८), द कंटिनजन्सीस ऑफ रेन्फोर्समेंट (१९६९), बियाँड फ्रीडम अँड डिग्निटी  (१९७१), रिसेंट इश्यूज इन द अ‍ॅनॅलिसिस ऑफ बिहेव्हिअर (१९८९). स्किनरने आपले आत्मचरित्र तीन स्वतंत्र भागांत लिहिलेले आहे : (१) पर्टिक्यूलर्स ऑफ माय लाइफ (१९७६), (२) द शेपिंग ऑफ ए बिहेव्हिअरिस्ट (१९७९) आणि (३) ए मॅटर ऑफ कॉन्सिक्वेन्सिस (१९८३).

केंब्रिज, मॅसॅचूसेटस् येथे तो निधन पावला.

संदर्भ :

  • Bjork, D. W., B. F. Skinner : A Life, 1993.
  •  Catania, C. A.; Harnad, S. Eds. The Selection of Behaviour : The Operant Behaviorism of B. F. Skinner : Comments and Consequences, 1988.
  • Modgil, S.; Modgil, C. Eds., B. F. Skinner : Consensus and Controversy, 1987.

प्रतिक्रिया व्यक्त करा