
एक सस्तन प्राणी. पाणघोड्याचा समावेश समखुरी गणाच्या हिप्पोपोटॅमिडी कुलात करतात. हिप्पोपोटॅमस हा शब्द ग्रीक भाषेतील असून त्याचा अर्थ ‘नदीतील घोडा’ असा होतो. तो बराच वेळ पाण्यात राहतो. आकारमानाने हत्ती आणि गेंडा यांच्या खालोखाल पाणघोड्याचा क्रम लागतो. तो मूळचा आफ्रिका खंडातील असून सहारा वाळवंटाच्या दक्षिणेकडील भागात आढळतो. सध्या हिप्पोपोटॅमिडी कुलातील हिप्पोपोटॅमस अँफिबियस आणि किरॉप्सिस लायबेरिएन्सिस (पिग्मी पाणघोडा) या केवळ दोन जाती अस्तित्वात आहेत.
डुक्कर आणि जमिनीवरील अन्य समखुरी प्राणी यांच्या शरीराशी पाणघोड्याच्या शरीराचे साम्य असले, तरी पाणघोड्याचे जवळचे नातेवाईक हे सिटेशिया गणातील व्हेल व पॉरपॉईज यांसारखे प्राणी आहेत. उत्क्रांती होताना सु. ५·५ कोटी वर्षांपूर्वी सिटेशिया गणातील प्राण्यांपासून पाणघोडा विभक्त झाला असावा. तसेच पाणघोडा आणि व्हेल या दोहोंचा सामाईक पूर्वज सु. ६ कोटी वर्षांपूर्वी इतर समखुरी प्राण्यांपासून विभक्त झाला असावा.
पाणघोड्याच्या शरीराची लांबी ४-५ मी., उंची सु. १·५ मी. आणि वजन ३–५ टन असते. पाय आखूड असून पायाची बोटे पडद्याने एकमेकांना जोडलेली असतात. डोके मोठे आणि वरून सपाट असते. डोळे, कान आणि नाकपुड्या डोक्याच्या वरच्या सपाट भागावर असतात. तो डोळे, नाकपुड्या आणि कान पाण्याबाहेर ठेवतो. पाण्याखाली तो आपल्या नाकपुड्या आणि कान बंद करू शकतो. दृष्टी तीक्ष्ण नसते. मुस्कटाभोवती तुरळक राठ केस असतात. गंध संवेदना तीव्र असते. जबड्यात ४० दात असतात. सुळे व पटाशीच्या दातांची वाढ सतत होत असते. सुळे बाकदार असून त्यांची लांबी ६० सेंमी. व वजन २·३-२·७ किग्रॅ.पर्यंत असू शकते. त्वचा जाड असून तिच्यात तांबूस-तपकिरी ते गर्द करडा अशा रंगछटा आढळतात. त्वचेवरील केस बारीक व विरळ असल्यामुळे ती केशहीन वाटते. त्वचा ग्रंथियुक्त असून ग्रंथींमधून स्रवणाऱ्या फिकट गुलाबी रंगाचा दाट स्राव खास छिद्रांमधून बाहेर टाकला जातो. या स्रावामुळे उन्हापासून संरक्षण होते. त्याचे शेपूट तोकडे असून त्यावर थोडे केस असतात.
पाणघोड्याचा वावर जलाशयाजवळ असतो. दिवसभर जास्तीत जास्त वेळ तो पाण्यात व चिखलात घालवतो. त्याला पोहता येत नाही. तसेच तो तरंगत नाही. खोल पाण्यात हा क्वचितच दिसून येतो. पाण्यात राहताना ते समूहाने राहतात. त्यांच्या कळपात काही माद्या आणि पिले असून त्यांची संख्या २०–३० असते. प्रौढ पाणघोड्यावर इतर प्राणी हल्ला करीत नाहीत; परंतु त्याच्या पिलांची शिकार मगर, तरस आणि सिंह करतात. एरवी निरुपद्रवी असणारा हा प्राणी पिलांच्या आणि मादीच्या रक्षणाकरिता किंवा स्वत: जखमी झाल्यावर हिंस्र बनतो. आपल्या क्षेत्राच्या स्वामित्वासाठी तो जागरूक असतो. पाणघोडा साधारणपणे संधिप्रकाशात चरण्यासाठी बाहेर पडतो. पाण्यात वाढणाऱ्या वनस्पती व गवत हे त्याचे खाद्य आहे. चरताना शक्यतो हा प्राणी एकटा असतो. तो रवंथ करीत नाही. नदीकाठी चरताना शेतात शिरून तो पिकांची नासाडी करीत असल्याने बऱ्याचदा त्याची शिकार केली जाते.
पाणघोड्याची मादी ५-६ वर्षांनी प्रजननक्षम होते. त्यांचा समागम पाण्यात होतो. गर्भावधी सु. ३४ आठवडे असतो. मादी पाण्यात प्रसूत होते. ती एका वेळी एका पिलाला जन्म देते. पाणघोड्याचा आयु:काल ४०–५० वर्षे असतो.
मांस, कातडी तसेच दातांकरिता पाणघोड्याची शिकार केली जाते. दातांपासून मिळणारा उच्च प्रतीचा हस्तिदंतसदृश पदार्थ सहज तुटत नसून पिवळाही पडत नाही. शोभेच्या वस्तू, दागिने, पियानोच्या पट्ट्या, बिलियर्डचे चेंडू इत्यादी वस्तू बनविण्यासाठी तो वापरला जातो. पाणवनस्पती आणि मासे यांच्या वाढीसाठी पाणघोड्याची विष्ठा उपयुक्त असते.

पिग्मी पाणघोडा हा पश्चिम आफ्रिकेतील लायबीरिया येथे अधिक संख्येने, तर सिएरा लिओन, गिनी आणि आयव्हरी कोस्ट यांच्या वनांत आणि दलदलीच्या प्रदेशांत कमी संख्येने आढळतो. आकाराने तो पाणघोड्यासारखा असला, तरी उंचीने त्याच्याहून लहान असतो. तो एकांतवासी आणि निशाचर आहे. त्वचा ओलसर राहावी आणि शरीराचे तापमान थंड राहावे म्हणून तो जलाशयाच्या जवळपास वावरतो. तो शाकाहारी असून नेचे, गवत, फळे इ. खातो. समागम आणि प्रसूती पाण्यात तसेच जमिनीवर होतात.
दोन्ही पाणघोड्यांची निवासक्षेत्रे अनेक ठिकाणी पिकांच्या लागवडीखाली आणली गेली आहेत. त्यामुळे त्यांच्या अधिवासाचे क्षेत्र कमी होत गेले आहे. त्यांची शिकार मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे त्यांची संख्या घटली आहे. आययूसीएन या आंतरराष्ट्रीय संस्थेने पाणघोड्याला ‘असुरक्षित’ घोषित केले असून ती संस्था पाणघोड्याच्या संरक्षणासाठी विशेष प्रयत्न करीत आहे.
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.