पृष्ठवंशीय प्राण्यांच्या गटातील एक वर्ग. हे प्राणी पाण्यात आणि जमिनीवर दोन्हीकडे राहू शकतात. तसेच यांच्या बाल्यावस्था जलचर असून प्रौढावस्था भूचर असतात. म्हणून यांना उभयचर म्हटले जाते. बेडूक, भेक, सॅलॅमँडर, न्यूट इ. प्राण्यांचा या वर्गात समावेश होतो. सर्व उभयचर पृष्ठवंशीय प्राणी फक्त गोड्या पाण्यात आढळतात.
जैव उत्क्रांतीच्या दृष्टीने उभयचर वर्गातील प्राणी हे मत्स्यवर्ग आणि सरिसृप वर्ग या दोहोंच्यामध्ये असतात. या प्राण्यांची डोकी धडाला थेट चिकटलेली असतात. त्वचेवर खवले, पिसे किंवा केस यासारखे कसलेही आवरण नसते. त्वचा ओलसर व ग्रंथियुक्त असते. काही उभयचरांच्या त्वचेत विषग्रंथी असतात. त्वचा हा श्वसनाचा प्रमुख अवयव असतो. डिंभावस्थेत श्वसनासाठी कल्ले असतात, तर प्रौढावस्थेत फुप्फुसेही असतात. श्वसन मुखगुहेच्या अस्तराच्या साहाय्यानेही होते. हृदयात दोन कर्णिका आणि एकच जवनिका असते. याशिवाय रक्त गोळा करण्यासाठी व पाठविण्यासाठी अतिरिक्त कप्पे असतात. उभयचर थंड रक्ताचे म्हणजेच अनियततापी असून परिसराच्या तापमानानुसार त्यांच्या शरीराचे तापमान बदलते. त्यांना अति-उष्णता व तीव्र थंडी सहन होत नाही म्हणून कडक उन्हाळ्यात किंवा कडाक्याच्या थंडीत ते खोल चिखलात निद्रेत जातात. यास ऋतुमानाप्रमाणे ग्रीष्मनिष्क्रियता व शीतनिष्क्रियता म्हणतात. कीटक हे उभयचरांचे मुख्य अन्न आहे. या प्राण्यांत अंड्यांचे बहुतांशी बाह्यफलन घडते. काही उभयचरांमध्ये आंतरफलनही होते.
प्रजननासाठी बहुतांशी उभयचर प्राण्यांना गोड्या पाण्याची आवश्यकता असते. या प्राण्यांच्या माद्या गोड्या पाण्यात अंडी घालतात. अंड्यातील अन्नसंचय अपुरा असल्यामुळे अपुरी वाढ झालेले डिंभ अंड्यातून बाहेर पडतात व पाणवनस्पती खाऊ लागतात. या अवस्थेत डिंभ प्रौढावस्थेपेक्षा वेगळे असतात. नंतर त्यांच्या शरीरात स्थित्यंतरे होऊन जलीय डिंभाचे रूपांतर प्रौढ उभयचरात होते. काही उभयचरांच्या ( उदा., अँब्लिस्टोमा, नेक्टूरस) प्रौढांमध्ये डिंभावस्थेतील काही गुणधर्म टिकून राहतात. यास चिरडिंभता म्हणतात.
उभयचरात आपल्या अंड्यांचे आणि पिलांचे रक्षण करण्याची वृत्ती असते. काही बेडूक झाडांच्या पानांवर तर काही पाण्याच्या काठावरील खडकांवर आपल्या शरीरातून स्रवणार्या चिकट द्रावाच्या फेसाचे घरटे तयार करून त्यात अंडी घालतात. काही नर बेडूक शत्रूंना हुसकून आपल्या डिंभांचे रक्षण करतात. काही बेडूक आपली अंडी आणि पिले आपल्या जठरात ठेवतात. या कालावधीत जठर गर्भाशयाचे कार्य करीत असल्याने त्यांना तीन ते चार महिन्यांचा कडकडीत उपवास पाळावा लागतो. काही जातींत नर बेडकाच्या पाठीवर छोटे छोटे कप्पे तयार होऊन त्यांत फलित अंड्यांचे रूपांतर छोट्या पिलांत होते. या नरांना सुईण म्हटले जाते.
तुटलेल्या अवयवांचे पुनरूद्भवन करण्याची शक्ती काही उभयचरांत असते. इतर कोणत्याही अवयवांपेक्षा शेपटीचे पुनरूद्भवन जलद होते. उभयचरांच्या रूपांतरणातील ठळक भाग म्हणजे जमिनीवर आधारासाठी चार पाय तयार होणे. याखेरीज रूपांतरणात इतरही बदल घडून आलेले दिसतात. जसे, कल्ल्यांच्या जागी फुप्फुसे तयार होतात. त्वचेत बदल होतो आणि निर्जलीभवन होऊ नये म्हणून ग्रंथींचा विकास होतो. डोळ्यांजवळ पापण्यांची निर्मिती होते. त्यामुळे पाण्याबाहेरील दृश्य पाहणे शक्य होते. मध्यकर्ण झाकण्यासाठी कानाचा पडदा विकसित होतो. बेडूक आणि भेक यांची शेपटी नाहीशी होते.
उभयचर वर्गाचे पुढीलप्रमाणे तीन गण आहेत :
(१) अॅपोडा : या गणातील उभयचरांना पाय नसतात. हे गांडुळांसारखेच वाटतात पण त्यांचे रुंद तोंड वेगळेपणा दाखविते. अंगावरील आडव्या सुरकुत्यांमध्ये सूक्ष्म आकाराचे खवले दडलेले असतात. पण यामुळे त्यांच्या त्वचेद्वारे होणार्या श्वसनास बाधा येत नाही. हे जलाशयाकाठी दगडांखाली अथवा बिळात राहतात (उदा. इक्थिऑफिस, जिम्नॉफिस). कोयना नदीच्या खोर्यात, पाटणजवळ अलिकडेच चार जाती नव्याने आढळल्या आहेत.
(२) कॉडेटा : हे उभयचर पुच्छधारी असून त्यांच्या दोन्ही पायांच्या जोडीचा आकार सारखाच असतो. बाल्यावस्थेप्रमाणे प्रौढावस्थेतही शेपूट असते. बर्याच जातींत प्रौढावस्थेत कल्ले असतात उदा. सॅलॅमँडर, नेक्टूरस, ऑम्फियुमा. हे भारतात आढळत नाहीत. चीन आणि जपान येथे १००-१२० सेंमी. लांबीचे सॅलॅमँडर आढळतात.
(३) अॅन्यूरा : याचे डोके धडाला जोडलेले असून शेपूट नसते. डिंभाचे प्रौढात रूपांतर होते, त्याला शेपूट असते. प्रौढाचे पश्चपाद अग्रपादापेक्षा मोठे व लांब असतात उदा., बेडूक, भेक, वृक्षमंडूक (हायला)