अनिषेकजनन प्रक्रिया

अफलित अंडाचा प्रौढ जीवात विकास होण्याच्या क्रियेला अनिषेकजनन म्हणतात. लैंगिक प्रजननात सामान्यपणे मादीच्या पक्व अंडाचे (अंडाणूचे) नराच्या शुक्राणूद्वारे फलन झाल्यास अंड उद्दीपित होते व त्याच्या विकासाने नवीन जीव उत्पन्न होतो. अनिषेकजनन हा मात्र अलैंगिक प्रजननाचा प्रकार असून यात अंडाचे विदरण होऊन नवीन जीव उत्पन्न होण्याची क्रिया उत्स्फूर्तपणे घडून येते किंवा ही क्रिया कृत्रिम पद्धतीनेही घडवून आणता येते. अंडाच्या पटलात होणार्‍या विशिष्ट बदलांमुळे अनिषेकजनन घडून येते, असे काही संशोधकांचे म्हणणे आहे.अंडजनन प्रक्रियेमध्ये जेव्हा पहिले अर्धसूत्र विभाजन होते तेव्हा दोन पेशी उत्पन्न होतात. या दोन्ही पेशींत गुणसूत्रांची संख्या द्विगुणित (2n) असते.यातील एक पेशी खूपच छोटी असते. तिला प्रथम ध्रुवीय पिंड म्हणतात. ही पेशी दुस-या पेशीला जोडलेल्या अवस्थेत राहते. विकासाच्या या अवस्थेला अनिषेकजनन घडून येते. अनिषेकजननात, अंडामध्ये दुस-या अर्धसूत्र विभाजनाची सुरुवात दोनपैकी एका प्रकारे होते. पहिल्या प्रकारात जोडीने असणारी गुणसुत्रे वेगळी होतात आणि यातून दोन एकगुणित पेशी तयार होतात. प्रत्येक समजातीय गुणसूत्रातील एक गुणसूत्र दुसर्‍या ध्रुवीय पिंडामध्ये जाते. अनिषेकजननाच्या अर्धसूत्र विभाजनाच्या दुसर्‍या प्रकारात दुसरा ध्रुवीय पिंड वेगळा होण्याची क्रियाच घडून येत नाही. परिणामी अंडातील गुणसूत्रांची संख्या द्विगुणित राहते (2n). अनिषेकजनन दुसर्‍या प्रकारेच जास्त वेळा घडून येते. अनिषेकजनन हे कृत्तकरणापेक्षा (क्लोनिंग) वेगळे असते.यामध्ये जन्मणारा जीव हुबेहुब मूळ दात्यासारखा असतो. अनिषेकजननापासून जन्मणारा जीव मात्र जनुकीय दृष्टया मातेपासून वेगळा असतो.

मधमाशी, मुंगी आणि इतर समाजप्रिय कीटकांमध्ये अनिषेकजननाद्वारे नियमित प्रजनन घडून येते. या कीटकांमध्ये राणी मादी जी अफलित अंडी घालते त्यांपासून फक्त नर उत्पन्न होतात (xo). सरड्याच्या लॅसर्टा सॅक्सिकोला आणि क्नेमिडोफोरस युनिपॅरेन्स या जाती पूर्णपणे अनिषेकजनित आहेत. उभयचर प्राण्यांमध्ये रॅना जॅपोनिका रॅना ग्रोमॅक्युलेटा आणि रॅना पिपीन्स अशा बेडकांच्या अफलित अंडांना सुई टोचून त्यांच्यापासून पिले उत्पन्न केली गेली आहेत. काही वेळा कोंबड्यांमध्येही कृत्रिम अनिषेकजनन घडवून आणले जाते.

सस्तन प्राण्यांमध्ये अफलित अंडातून उत्स्फूर्तपणे उद्दीपन घडून येऊ शकते, परंतु हे क्वचितच घडते. ससा आणि उंदीर या प्राण्यांवर अनिषेकजननाचे प्रयोग यशस्वी झालेले आहेत; मात्र उद्दीपन झाल्यावर काही दिवसांत भ्रूण मरतात, असे आढळले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा