विपाक ही आयुर्वेदातील एक वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना आहे. अन्न व औषधे कशाप्रकारे कार्य करतात हे सांगण्यासाठी विपाक सांगितले आहेत. खाल्लेल्या अन्नावर पाचक रसांचा जो परिणाम होतो तो चवीच्या (रस) स्वरूपात सांगितला आहे. त्याला ‘विपाक’ असे म्हणतात. पचनाच्या क्रियेस ‘पाक’ असे म्हणतात. हा ‘अवस्थापाक’ व ‘निष्ठापाक’ असा दोन प्रकारचा असतो. पदार्थाचे पचन होत असतानाच्या अवस्थेला ‘अवस्थापाक’ असे म्हणतात. पचन पूर्ण झाल्यावर अंतिम काळात उत्पन्न झालेल्या पाकास ‘विपाक’ असे म्हणतात. पचनाच्या निष्ठा (अंतिम) काळात उत्पन्न होत असल्यामुळे यास निष्ठापाक असेही म्हणतात.

विपाकाचे गोड, आंबट व तिखट असे साधारणत: तीन प्रकार आहेत. सर्वसाधारणपणे ज्या पदार्थांचा रस गोड व खारट असतो त्यांचा विपाक गोड, आंबट पदार्थांचा विपाक आंबट आणि तिखट, कडू व तुरट पदार्थांचा विपाक तिखट होतो. विपाक झाल्यानंतर त्यावर पंचमहाभूतांच्या अग्नीचे कार्य प्रारंभ होते.

विपाकाचे आकलन आपल्याला अनुमानाने होते. खाल्लेल्या पदार्थाचे शरीरावर काय कर्म होते त्यावरून आपल्याला विपाकाचे आकलन होते. प्रत्येक विपाकाचे काही गुण असतात व त्यामुळे त्या विपाकांचे शरीरावर; शरीरातील वातादि दोष, रसरक्तादि धातू व मूत्र इत्यादी मलांवर विशिष्ट परिणाम होतात. त्यानुसार तो पदार्थ विशिष्ट परिस्थितीमध्ये वापरता येऊ शकतो. गोड विपाकाचे पदार्थ स्निग्ध व पचण्यास जड, आंबट विपाकाचे पदार्थ स्निग्ध व पचण्यास हलके, तर तिखट विपाकाचे पदार्थ रुक्ष व पचण्यास हलके असतात. त्यानुसार गोड विपाकामुळे शरीरातील कफदोष वाढतो, वात-पित्तदोष कमी होतात, शुक्रधातू वाढतो व मलमूत्राचे प्रमाणही वाढते. आंबट विपाकामुळे पित्त वाढते, शुक्राचा ऱ्हास होतो व मलमूत्राचे प्रमाण वाढते. तिखट विपाकामुळे कफदोष कमी होतो, वात-पित्तदोष वाढतात, शुक्राचा ऱ्हास होतो व मलमूत्राचे प्रमाणही कमी होते.

समीक्षक : जयंत देवपुजारी