नस्य हे आयुर्वेदात वर्णन केलेल्या पंचकर्मांपैकी एक कर्म होय. नस्य म्हणजे नाकात औषध टाकणे.
आयुर्वेदानुसार गळ्याभोवतालच्या हाडाच्या वरील भागात असलेल्या सर्व अवयवांच्या विकारांवर नस्याचा उपयोग होतो. नस्याचा उपयोग रोगावस्थेत होतो तसेच स्वास्थ्य रक्षणासाठीही होतो. त्यामुळे नस्य हे पंचकर्मातील एकच असे कर्म आहे जे रोज केले जाऊ शकते. आयुर्वेदात नाक हे शिरस्थानाचे म्हणजेच डोक्याचे दार आहे असे म्हटले आहे. या आधाराने नस्याची कार्यपद्धती स्पष्ट होण्यास मदत होते.
नस्य करण्यापूर्वी चेहऱ्याला मालिश करून शेकले जाते. नस्याचे त्याच्या परिणामानुसार शिरोविरेचन व स्नेहन असे दोन प्रकार आहेत. शिरोविरेचन म्हणजे शिरस्थानी जमा झालेले दोष बाहेर काढणे. ज्यावेळी टाळू, कंठ आणि शिरोभाग यांमध्ये कफ जमा झालेला असतो, त्यावेळी शिरोविरेचन नस्याचा उपयोग करतात. तसेच जुनाट सर्दी, त्यामुळे निर्माण होणारा डोक्याचा जडपणा, जीभेला चव नसणे, डोकेदुखी, अर्धशीशी, आकडी येणे, वासाची जाणिव न होणे आणि गळ्याच्या हाडाच्या वरील भागात कफामुळे होणारे विकार यांमध्येही शिरोविरेचन नस्याचा उपयोग केला जातो. स्नेहन नस्य हे मान, खांदा आणि छाती या भागांतील मांसपेशींचे बल वाढविण्यासाठी उपयोगात येते. तसेच डोक्याचा हलकेपणा, वातामुळे होणारे शिरोरोग, अकाली दात पडणे, डोक्याचे व दाढीचे केस गळणे, कान दुखणे, कानांमध्ये आवाज येणे, आवाज फुटणे, तोंड कोरडे पडणे, केस पांढरे होणे, चेहऱ्यावर अकाळी सुरकुत्या पडणे तसेच मोतीबिंदू या विकारांमध्ये स्नेहन नस्याचा उपयोग सांगितला आहे.
आयुर्वेदात नस्य कोणाला करावे, कोणाला करू नये, नस्य केव्हा करावे, त्यावेळी पाळावयाचे नियम, नस्य योग्य प्रकारे झाल्याची व न झाल्याची लक्षणे, नस्यासाठी लागणाऱ्या औषधांचे प्रमाण, नस्य किती दिवसांसाठी करावे याचे वर्णन आहे. तसेच नस्यकर्म करण्यासाठी रोगानुसार औषधी तेल, साधे तेल, औषधी तूप, साधे गाईचे तूप, विविध औषधींचे काढे, चूर्ण, ताज्या वनस्पतींचा रस यांचा आवश्यकतेनुसार उपयोगही सांगितला आहेत.
पहा : नस्य, पंचकर्म, बस्ति, रक्तमोक्षण, वमन, विरेचन.
संदर्भ :
- चरकसंहिता—सिद्धीस्थान, अध्याय ९ श्लोक ८८, ११७; वाग्भटसंहिता—सूत्रस्थान, अध्याय २० श्लोक १.
- सुश्रुतसंहिता—चिकित्सास्थान, अध्याय ४० श्लोक २१, २२, २३.
- Nasal drug delivery Possibilities, problems and solutions, L lllum-Journal if controlled release, 2003-Elsevier.
समीक्षक – जयंत देवपुजारी