सुवर्णप्रभास : बौद्धसंकर संस्कृतातील वैपुल्यसूत्रांच्या उत्तरकालीन ग्रंथांपैकी एक महत्त्वाचा ग्रंथ. महायान सूत्रसाहित्याच्या आकरग्रंथापैकी एक. सुवर्णप्रभास म्हणजे सोन्याचे तेज. या ग्रंथातील मौलिक विचार तेजयुक्त आहेत या अर्थाने हे ग्रंथशीर्षक दिले आहे. या ग्रंथाची अनेक संस्करणे झाली होती व त्यामुळे त्यात पाठभेदही पुष्कळ दिसतात. चीन आणि जपानमध्ये हा ग्रंथ अतिशय श्रद्धेने वाचला जातो. याचे चीनी भाषेत अनेक भाषांतरे झाली. चीनी भाषेमध्ये धर्मरक्ष (इ.स. ४१२-४२६), परमार्थ (इ.स. ५४९), यशोगुप्त (इ.स. ५६१-५७७), पाओक्वी (इ.स. ५६७) तसेच इत्सिंग (इ.स. ७०३) यांनी केलेले पाच अनुवाद उपलब्ध आहेत. या ग्रंथरचनेचा नेमका काळ माहीत नसल्यामुळे अनुवादावरून त्या ग्रंथांच्या काळासंबंधी तर्क करावा लागतो.पाचव्या शतकात धर्मरक्ष यांनी या ग्रंथाचा चीनी भाषेत अनुवाद केला.त्याआधी या ग्रंथाची रचना पूर्ण झाली असावी.या ग्रंथाची रचना एकूण १९ परिवर्तात केली आहेत. त्यानंतर सातव्या शतकात इत्सिंग यांनी केलेल्या अनुवादात ३१ परिवर्त (प्रकरण)आहेत. त्यावरून या ग्रंथातील पुष्कळ भाग प्रक्षिप्त म्हणजे नंतर समाविष्ट केलेला होता हे दिसून येते. नेपाळमध्ये मिळालेल्या या ग्रंथांच्या हस्तलिखितांमध्ये या ग्रंथाचे नाव सुवर्णप्रभासोत्तम, स्वर्णप्रभासोत्तम तसेच सुवर्णप्रभासोत्तमा असे सापडते.

अकराव्या शतकातील ग्रंथाचे लिखित पृष्ठ (Tangut version)

या ग्रंथातील २१ परिवर्तांमधील काही भाग कथात्मक, काही तत्त्वज्ञानात्मक तर काही तंत्राचा आहे. दर्शन, निती, तंत्र, आचार आणि उपाख्याने अशी विषयांची संमिश्रता या ग्रंथामध्ये आहे. दुसऱ्या परिवर्तापासून पुढे चार परिवर्तांमध्ये महायान बौद्ध संप्रदायाच्या मुख्य सिद्धांतांचे प्रतिपादन केलेले आहे. यातील बुद्ध नित्य आणि दैवी व्यक्तित्व असलेला आहे आणि तो निर्वाणाप्रत जात नाही. बुद्धाचे धर्मकाय स्वरूप येथे महत्त्वाचे आहे.

पहिल्या निदानपरिवर्तामध्ये सुवर्णप्रभास ग्रंथाचे श्रवणमाहात्म्य वर्णिले आहे. दुसऱ्या तथागतयुःप्रमाण या परिवर्तामध्ये बुद्धांने दीर्घायु होण्याचे दोन उपाय सांगितले आहेत. एक प्राणिवध न करणे आणि दुसरे प्राण्यांना योग्य ते खाणे देणे.बोधिसत्त्व रुचिरकेतु यांना शंका होती की भगवान बुद्धांनी दीर्घायुष्यतेच्या दोन साधनांचे पालन केले तरीही ऐंशीव्या वर्षी त्यांना मृत्यू आला, म्हणजे त्यांच्या वचनांचे काही प्रामाण्य नाही. याबद्दल समाधान करण्यासाठी अक्षोभ्य, रत्नकेतु, अमितायु आणि दुन्दुभिस्वर या चार बुद्धांची कथा आणि लिच्छिवि कुमार ब्राह्मण कोण्डिन्य याची कथा सांगितली आहे. त्यात म्हटले आहे की बुद्धाचे शरीर पार्थिव नाही. त्यामुळे त्यात मोहोरी इतकाही धातू नाही म्हणून त्यांचे शरीर धर्ममय आणि नित्य आहे. तिसऱ्या स्वप्नपरिवर्तामध्ये रुचिरकेतु बोधिसत्त्व स्वप्नात एका ब्राह्मणाला दुन्दुभि वाजवताना बघतात. त्या दुन्दुभितून धर्मगाथा ऐकू येतात. जागे झाल्यावर बोधिसत्त्वाला त्या गाथा आठवतात आणि त्यांचे निवेदन करतो. चौथ्या देशनापरिवर्तामध्ये महायान पंथातील महत्त्वाच्या सिद्धान्तांसंबंधी विवरण करणाऱ्या गाथा आहेत. पाचव्या कमलाकरसर्वतथागतस्तव या परिवर्तामध्ये बुद्धांची स्तवने आहेत, ज्याला कमलाकर हे नाव दिले जाते.सहाव्या शून्यतापरिवर्तामध्ये वस्तुमात्राच्या शून्यतेचे यात निर्देश आहेत. तसेच प्राण्याबद्दलची करुणा कशी उत्पन्न होते हा या परिवर्ताचा मुख्य विषय आहे.सातव्या चतुर्महाराज या परिवर्तामध्ये सुवर्णप्रभास या ग्रंथाचे माहात्म्य वैश्रवण, धृतराष्ट्र, विरुढक आणि विरुपाक्ष या चार महाराजांच्या द्वारे कथन केले आहे.आठव्या सरस्वतीदेवीपरिवर्तामध्ये सरस्वती देवी बुद्धाच्या सम्मुख आविर्भूत होते आणि ग्रंथात जे धर्मव्याख्यान धर्मभाणक यांनी केले आहे त्याचे वर्णन येते. यात सरस्वती देवी घोषणा करते की जे भिक्षु-भिक्षुणी या सूत्राचे धारण करतील त्यांना अनुत्तर संबोधिची प्राप्ती होईल. या देवीच्या घोषणेमुळे प्रस्तुत ग्रंथाचे महत्त्व आहे.नवव्या श्रीर्महादेवीपरिवर्तामध्ये महादेवींनी प्रकट होऊन धर्मभाणकाला व्यावहारिक तसेच आध्यात्मिक सम्पत्ती या संबंधात सांगितले आहे.दहाव्या सर्वबुद्धबोधिसत्त्वनामसंधारणि या परिवर्तामध्ये वेगवेगळया तथागतांची आणि बोधिसत्त्वांची नावे आणि त्यांचे उच्चारण यासंबंधी विवेचन येते. याच परिवर्तामध्ये ग्रंथाला ज्यांच्यावरून नाव दिले आहे त्या सुवर्णप्रभासोत्तम बोधिसत्वाची माहिती आहे.
अकराव्या दृढ़ापृथिवीदेवता या परिवर्तामध्ये दृढ़ा नावाची पृथ्वीदेवी भगवानांच्या समोर उपस्थित होऊन सांगते की धर्मभाणकाचे उपवेशन-पीठ सुखप्रदायक होईल. आणि ती धर्मभाणकाच्या धर्मामृताने तृप्त होण्याची इच्छा प्रगट करते. बाराव्या संज्ञायमहायक्षसेनापति या परिवर्तामध्ये यक्ष सेनापतीची कथा येते ज्यात ते अठ्ठावीस सेनापतींसह भगवानांकडे येतात आणि आपण सुवर्णप्रभास या ग्रंथाचा प्रचार करण्यात मदत करू तसेच धर्मभाणकांचे रक्षण करू असे आश्वासन देतात. तेऱाव्या देवेन्द्रसमयराजशास्त्र या परिवर्तामध्ये सुसम्भव राजाचा वृत्तान्त आहे. यामध्ये देवेन्द्रसमय या नावाच्या राजशास्त्रासंबंधी माहिती दिली आहे.यात राजाची कर्तव्ये, अधर्मी राजाच्या राज्याची दशा याविषयी माहिती येते. चौदाव्या सुसम्भव परिवर्तामध्ये धर्मप्रवाचक भिक्षु रत्नोच्चय यांनी सुसम्भव राजाला केलेल्या प्रवचनाचा वृत्तान्त येतो. पंधराव्या यक्षाश्रयारक्षा या परिवर्तामध्ये यक्ष आणि इतर देवतांनी सुवर्णप्रभासचे श्रवण करणाऱ्यांच्या रक्षणाची प्रतिज्ञा केली आहे. सोळाव्या दशदेवपुत्रसहस्रव्याकरण या परिवर्तामध्ये भगवान बुद्धांनी दशसहस्र देवपुत्रांना बुद्धत्व लाभाची भविष्यवाणी केली आहे. सतराव्या व्याधिप्रशमन या परिवर्तामध्ये काही जनपदातील प्राणी, प्रजा हजारो रोगांनी पीडित होऊन वेदना, दुःख अनुभवत होती. तेव्हा जलवाहनाने आपल्या जटिंधर नावाच्या आयुर्वेदाचार्यांना गाथांमधून रोग का उत्पन्न होतात, त्यांची चिकित्सा कशी करायची असे अनेक प्रश्न विचारले आणि त्यांनी व्याधि-उपशमनासंबंधी विवरण केले आहे. अठराव्या जलवाहनस्य मत्स्यवैनेय या परिवर्तामध्ये जलवाहनाने पाण्याविना तडफडणाऱ्या हजारो माशांना पाहून करुणभावाने जलाचे स्त्रोत शोधले आणि माशांनी बौद्धधर्मात प्रवेश करण्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या.
एकोणिसाव्या व्याघ्रीपरिवर्तामध्ये भगवान बुद्धांनी बोधिसत्त्व अवस्थेमध्ये एका वाघिणीची भूक भागवण्यासाठी आपल्या शरीराचा त्याग केला त्याची कथा आहे. विसाव्या सर्वतथागतस्तव या परिवर्तामध्ये सुवर्णरत्नाकरछत्रकूट नावाच्या बोधिसत्त्वने केलेली गाथामय स्तुती आली आहे. एकविसाव्या शेवटच्या निगमनपरिवर्तामध्ये बोधिसत्त्वसमुच्चय कुल-देवतेने सांगितलेल्या सर्वशून्यताविषयक गाथा आहेत.
या ग्रंथाच्या हस्तलिखित प्रती मध्य आशिया, तुर्किस्तान तसेच नेपाळमध्ये मिळाल्या आहेत. या ग्रंथाचे चीनी, जपानी,उइगर (Uigur),खोतन तसेच तिब्बती भाषेत अनेक अनुवाद झालेले आहेत. जपानी विद्वान बुन्यिउ नञ्जिओ यांनी जपान मध्ये १९३१ साली याचे देवनागरी संस्करण प्रकाशित केले. त्यानंतर १९६३ पर्यंत पाच संस्करणे प्रसिद्ध झाली. जपानी भाषेतील जिनमित्र आणि शीलेन्द्रबोधि यांचे अनुवाद महत्त्वाचे आणि प्राचीन आहेत. इत्सिंग यांच्या अनुवादावरून तिब्बती, सोगदिया तसेच उइगर हे अनुवाद झाले असावेत.

संदर्भ ग्रंथ : 1. Nariman,G.K., Literary History Of Sanskrit Buddism, G.B.Taraporwala sons and Co, 1920. 2.कौशिक,सत्यदेव (संपा.व अनु.),सुवर्णप्रभाससूत्रम्,पाठक प्रकाशन,अलीगढ,१९९९.

समीक्षक : तृप्ती तायडे