यशस्तिलक चम्पू : संस्कृतमधील एक जैन चम्पूग्रंथ. याचा काळ इ.स. ९५९. यातील कथेचा मूळ संदर्भ गुणभद्राच्या उत्तरपुराणात येतो. याचा कर्ता सोमदेव वा सोमप्रभसूरी हा दिगंबर जैनधर्मीय होता.तो स्वतःचा संबंध जैन तीर्थंकर नेमिदेव आणि यशोदेवाशी जोडतो. तो स्वतः मोक्षासाठी उत्सुक होता असे त्याने स्पष्ट म्हटले आहे. राष्ट्रकूट राजा कृष्ण याचा चालुक्यवंशातला तृतीय अरिकेसरी हा सामंत होता. सोमदेव या अरिकेसरीच्या आश्रयाला होता. नीतिवाक्यामृत ही सोमदेवाची आणखी एक रचना होय.

स्वतः सोमदेवाने या ग्रंथाला महान अभिधान कोश असे म्हटले आहे. या ग्रंथात एकून आठ आश्वास (अध्याय) आहेत.यामध्ये योधेय देशातील राजपूरनगर येथील चंडमारिदेवीच्या देवळात राजा मारिदत्त व तांत्रिक वीरवैभव यांच्यातील घटना सांगितल्या आहेत.यातील पहिल्या पाच आश्वासांत अवन्तिनरेश यशोधर याच्या अनेक जन्मांची कथा येते व शेवटी त्याने जैन धर्माचा कसा स्वीकार केला हे वर्णिले आहे. दुसऱ्या आश्वासात उज्जैन नगरी, यशोधर राजाचा राज्याभिषेक आणि पाणिग्रहण याचे वर्णन आहे. तिसऱ्या आश्वासात राजा यशोधराच्या चरित्रचित्रणाला अनुकूल असे राजनैतिक तत्त्वांविषयी विवेचन केले आहे. अहिंसा हे महत्त्वाचे जैन तत्त्व विशद करताना पुनर्जन्माचा सिद्धान्त मांडला आहे.श्रावकाचाराचे वर्णन सहा ते आठ या आश्वासात केले आहे. या अध्यायांना उपासकाध्ययन असेही नाव आहे.यामध्ये उपासकांची व्रते, अहिंसा, सत्य, अचौर्य, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह यासंबंधी विवेचन करतांना अहिंसा या तत्त्वावर भर दिला आहे. चार प्रकारच्या हिंसांची शास्त्रीय नावे देऊन आरंभी हिंसा, उद्योगी हिंसा, विरोधी हिंसा व संकल्पी हिंसा याबाबत विस्तृतपणे सांगितले आहे. गृहस्थासाठी यापैकी अंतिम म्हणजे संकल्पी हिंसेचा त्याग अनिवार्य सांगितला आहे.

‘‘सर्व एव ही जैनानां प्रमाणं लौकिकोविधि:। न यत्र सम्यक्त्वहानिर्न यत्र व्रतदूषणम्।।’- (यशस्तिलकचम्पू, ८/२२/३७९) धर्माच्या हानिपासून वाचण्याचे उपाय कोणते? ह्या प्रश्नाचे उत्तर देतांना आचार्य सोमदेव सूरी म्हणतात की जैन धर्माचे पालन करणाऱ्या गृहस्थांना लौकिक धर्मच प्रमाण आहे. ज्या धर्माच्या पालनामध्ये सम्यकत्वाची हानी होत नाही तसेच व्रतांमध्ये दोष लागत नाही तोच योग्य धर्म होय.यशोधराच्या मानवी जन्माबरोबरच हरिण, जलजंतू, मासा, बकरा, कोंबडा अशा वेगवेगळ्या जन्मांतील निवेदन करण्यात ग्रंथाचा बराचसा भाग वाहिलेला आहे व शेवटचे तीन आश्वास जैन श्रावकांच्या धार्मिक कृत्याला वाहिले आहेत.

हा ग्रंथ बोधप्रद असून पूर्णपणे धार्मिक अंगाने नटलेला आहे. दहाव्या शतकातील सांस्कृतिक आणि सामाजिक अंगाचे एक चित्र या ग्रंथातून उभे राहते.यशोधरच्या कथेचा स्रोत, प्रभंजन यांनी रचलेली पूर्ववर्ती कथा आणि यशोधरचरित आणि हरिभद्रसूरीकृत समराइच्चकहा याच्या चतुर्थ भवामध्ये सापडतो. पण सोमदेवाने त्यामध्ये अनेक बदल केले आहेत. हरिभद्राच्या रचनेमध्ये मारिदत्त आणि युगलांची कथा नाही. तसेच दोन्ही पात्रांच्या नावातही सोमदेवाने बदल केला आहे.

श्लेषयुक्त भाषा, दीर्घ-समास-प्रचुर वाक्यरचना, ठिकठिकाणी दिसून येणारा शब्दच्छल ही सोमदेवाच्या गौडी शैलीची वैशिष्ट्ये संपूर्ण ग्रंथात दिसून येतात. तसेच त्याने आक्षेप, उत्प्रेक्षा, उपमा, रूपक, विरोध, स्वभावोक्ती, सहोक्ती, निदर्शना, अनुप्रास अशा अलंकारांचाही सढळ हस्ते उपयोग केला आहे. वर्णन-शैलीवर असणारे प्रभुत्व विशेष आहे. ऋतुवर्णने असो वा चंडमारी देवतेचे मंदिर असो किंवा स्मर-सौमनस या उद्यानांचे वर्णन असो, सोमदेव यात वाकबगार आहे. त्याचा पुराण व इतिहास या दोहोंचा अभ्यास प्रशंसनीय आहे. या ग्रंथात आरंभी कवीने भास, कालिदास, भारवी, भवभूती, भर्तृहरी,गुणाढ्य, भाण, मयूर, नारायण, माघ, राजशेखर यांचे उल्लेख केले आहेत.ते साहित्याच्या इतिहासासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. गुरू, शुक्र, विशालाक्ष, पाराशर, भीष्म, भारद्वाज इ. राजनीतिशास्त्र प्रणेत्यांचे आणि वैय्याकरणांचेही उल्लेख महत्त्वाचे आहेत.

या ग्रंथातील पहिल्या पाच आश्वासांवर श्रुतसागराची टीका उपलब्ध आहे. सहा ते आठ या आश्वासांवर जिनदास फडकुले यांनी उपासकाध्ययन ही टीका प्रकाशित केली आहे. श्रीदेव यांनी पंजिका तयार केली आहे. पंजिका ही लघुटीका किंवा मुख्य शब्दांचा अर्थ देणारा शब्दकोश या स्वरूपाची असते.

संदर्भ : १.चौधरी, डॉ. गुलाबचंद,जैन साहित्य का बृहद् इतिहास – भाग ६, पार्श्वनाथ विद्याश्रम शोध संस्थान, वाराणसी, १९७३.                                                                २.जैन, डॉ. गोकुलचंद्र,यशस्तिलक का सांस्कृतिक अध्ययन, सोहनलाल जैनधर्म प्रचारक समिती,अमृतसर,१९६७.