अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी पेनसिल्व्हेनिया आणि न्यूयॉर्क राज्यांतून वाहणारी नदी आणि ओहायओ नदीचा मुख्य शीर्षप्रवाह. लांबी ५२३ किमी., जलवाहनक्षेत्र ३०,३०० चौ. किमी. ॲलेगेनी नदीचा उगम पेनसिल्व्हेनिया राज्याच्या उत्तरमध्य भागातील पॉटर परगण्यातील टेकड्यांयुक्त पठारी प्रदेशात, सस. पासून ७३० किमी. उंचीवर होतो. हे उगमस्थान न्यूयॉर्क राज्याच्या सरहद्दीपासून दक्षिणेस अवघ्या १६ किमी.वर आहे. उगमानंतर सुमारे १३० किमी. ती सामान्यपणे उत्तरेकडे वाहत जाते. त्यानंतर न्यूयॉर्क राज्याच्या नैर्ऋत्य कोपर्यात वक्राकार वळण घेऊन पुन्हा ती पेनसिल्व्हेनियात प्रवेश करते. जेथे न्यूयॉर्क राज्यात प्रवेश करते, तेथेच ॲलेगेनी जलाशय आणि ॲलेगेनी राज्य उद्यान आहे. येथून पुढे सुमारे १९० किमी. ती साधारणपणे नैर्ऋत्येस वाहते. येथे ॲलेगेनी राष्ट्रीय अरण्याची वायव्य सरहद्द सीमित करते. त्यानंतर रुंद पात्रातून नागमोडी वळणांनी प्रथम आग्नेयीस व त्यानंतर नैर्ऋत्येस वाहत गेल्यानंतर पिट्सबर्ग येथे तिचा आणि मनाँगहीला नदीचा संगम होतो. ॲलेगेनी-मनाँगहीला या दोन नद्यांच्या संगमानंतरचा संयुक्त प्रवाहच पुढे ओहायओ या नावाने ओळखला जातो. ओहायओ ही मिसिसिपी नदीची उपनदी आहे. ॲलेगेनी नदीतून वाहणार्या पाण्याच्या प्रमाणाचा विचार करता हा ओहायओबरोबरच मिसिसिपी नदीचाही प्रमुख शीर्षप्रवाह आहे. किस्किमिनटस, क्लॅरीअन, कॉनमॉ, रेड बँक क्रीक, ऑइल क्रीक, फ्रेंच क्रीक या ॲलेगेनीच्या प्रमुख उपनद्या आहेत. नदीचा बराचसा प्रवाहमार्ग वृक्षराजींनी आच्छादलेल्या टेकड्यांमधून वाहतो. नदीप्रवाहाचे सरासरी ढाळमान दर किमी.ला ४ मी. आहे.
पूर्वी स्थानिक अमेरिकन आणि यूरोपीयन वसाहतकरी ॲलेगेनी नदीला वरच्या टप्प्यातील ओहायओ (अपर ओहायओ) नदी म्हणूनच संबोधत. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात येथे लोहमार्ग सुविधा येईपर्यंत कील बोटींच्या वाहतुकीसाठी ही नदी विशेष महत्त्वाची होती. पिट्सबर्ग ते ईस्ट ब्रॅडी यांदरम्यानच्या ११० किमी. लांबीच्या नदीच्या उथळ प्रवाहमार्गात १९०३ ते १९३८ या कालावधीत उभारलेल्या धरण आणि जलपाश मालिकांद्वारे ही नदी जलवाहतूकयोग्य करण्यात आली. पूरनियंत्रणाच्या दृष्टीने तिच्या अनेक मुख्य उपनद्यांवर धरणे बांधली आहेत. पेनसिव्हेनियात या नदीवर केंद्रीय पूरनियंत्रण प्रकल्पांतर्गत बांधलेले ‘किंझुआ डॅम’ हे धरण १९६५ मध्ये पूर्ण झाले. या धरणामुळे निर्माण झालेला ३८ किमी. लांबीचा जलाशय पेनसिल्व्हेनिया आणि न्यूयॉर्क या दोन्ही राज्यांत पसरला आहे. किंझुआ डॅम ते ऑइल सिटी यांदरम्यानच्या नदीपात्रात अनेक बेटे असून ती पारिस्थितिकी, सृष्टीसौंदर्य आणि मनोरंजनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहेत. या नदीखोर्यात दगडी कोळसा, खनिज तेल आणि नैसर्गिक वायू या जीवाश्म इंधनांचे मोठे साठे आहेत. वाहतुकीसाठी नदीवर अनेक ठिकाणी पूल आणि बोगदे निर्माण करण्यात आले आहेत. पिट्सबर्गशिवाय ओलीअन (न्यूयॉर्क), वॅरन व ऑइल सिटी (पेनसिल्व्हेनिया) ही या नदीच्या काठावरील प्रमुख शहरे आहेत.
समीक्षक – चौधरी, वसंत.