चेनाब. भारत व पाकिस्तान या देशांतून वाहणारी सतलज नदीची उपनदी. लांबी सुमारे १,५२० किमी. जलवाहन क्षेत्र सुमारे २७,५२९ चौ. किमी. हिमाचल प्रदेशातील लाहूल-स्पीती जिल्ह्यात उगम पावणारे चंद्रा व भागा हे चिनाब नदीचे दोन शीर्षप्रवाह आहेत. चंद्रा या प्रवाहाचा उगम पंजाब हिमालयात बारालाचा खिंडीच्या आग्येन भागात, सस. पासून सुमारे ६,००० मी. उंचीवर एका हिमस्तरातून होतो. भागा प्रवाह याच खिंडीच्या वायव्य उतारावर झिंगझिंगवार या ठिकाणाजवळ उगम पावतो. पश्चिमेस सुमारे ११२ किमी. वाहत जाऊन हे दोन्ही प्रवाह हिमाचल प्रदेशातील तंडी (तांडी) येथे सस.पासून सुमारे २,२५० मी. उंचीवर एकत्र येतात. येथपासून यांचा संयुक्त प्रवाह चंद्रभागा अथवा चिनाब या नावाने ओळखला जातो. तंडीच्या वरच्या भागात चंदर आणि भागा ही दोन्ही नावे आजही वापरात आहेत.

ऋग्वेदात उल्लेखिलेली असिक्नी म्हणजे चिनाब होय. तिच्याकाठी रोगहारक वनस्पती असल्याचा उल्लेख मिळतो. ग्रीक लोक तिला अकेसिनेस म्हणत; तर टॉलेमी यांनी तिचा संदोबल असा उल्लेख केला आहे. संस्कृत वाङ्मयात तिचा चंद्रभागा असा उल्लेख आढळतो.

चिनाब नदी पहिल्या टप्प्यात हिमाचल प्रदेशातून पीर पंजाल व हिमाद्री या पर्वतश्रेणींमधील सांरचनिक द्रोणीतून १६० किमी. वायव्येस वाहते. जम्मू व काश्मीर राज्यातील किश्तवारजवळ ती दक्षिणेकडे वळते. पुढे ती एका निदरीतून पीर पंजाल रांग छेदून पश्चिमेकडे व पुन्हा दक्षिणेकडे वळून अखनूर येथे सपाटीवर येते. तंडीपासून किश्तवारपर्यंत नदीप्रवाहाचे उतारमान दर किमी.ला १०.२ मी. इतका आहे. हिच्या उगमाकडील भागात अनेक द्रुतवाह आहेत. या प्रवाहमार्गात चिनाबने अनेक खोल दर्‍या (घळी) निर्माण केल्या आहेत. जम्मू व काश्मीर राज्यातील रामबनजवळील घळ प्रसिद्ध आहे. अनसी गावाच्या दक्षिणेस चिनाब नदी हिमालय पर्वत सोडून सखल प्रदेशात येते. खैरी रिहाल येथे ही नदी पाकिस्तानच्या सियालकोट जिल्ह्यात प्रवेश करते.

काश्मीरच्या सीमेपासून १४ किमी.वरील मराला येथे अपर चिनाब कालवा व पुढे ५६ किमी.वर खांकी येथे १८९२ मध्ये काढलेला लोअर चिनाब कालवा सुरू होतो. त्यानंतर वायव्येचा छाज दोआब व आग्येयेचा रेचना दोआब यांमधून वाहत जाते. त्रिम्मू येथे तिला झेलम व सिंधूजवळ रावी या नद्या मिळतात. बिआसचे पाणी घेऊन आलेल्या सतलजला ती अलीपूरच्या पूर्वेस मडवाला येथे मिळते व मग त्यांचा संयुक्त प्रवाह पंचनद नावाने मिथनकोट येथे सिंधू नदीला मिळतो. इ. स. १२४५ पर्यंत चिनाब नदी मुलतानच्या पूर्वेकडून वाहत होती; परंतु १३९७ नंतर ती त्याच्या पश्चिमेकडून वाहू लागली.

पहिल्या व दुसर्‍या टप्प्यात (भारतात) चिनाब नदीला उजवीकडून संसारी नाला (प्रवाह), उदेपूरजवळ मियार नाला आणि साचजवळ सायचू नाला मिळतो. त्यानंतर परमार, हुंडन, सुरल व गणौर हे नाले मिळतात. डावीकडून छाबिया व कालीछो हे त्रिलोकनाथजवळ मिळतात. तिर्डोजवळ हरसर, धरमी, माढू; तर किलारजवळ साच आणि मिंदालजवळ चैती हे नाले मिळतात. यांशिवाय गोलनहार, लिडारकोल, बिचलारी, अन्स (आन्स), तावी, वडवान इत्यादी तिला मिळणारे आणखी प्रवाह आहेत.

नदीच्या खालच्या टप्प्यात गुजराणवाला, लाहोर, झांग व मंगमरी या जिल्ह्यांतील ८,०५५ किमी. क्षेत्राला १९०३-०४ मध्ये लोअर चिनाब कालव्याद्वारे जलसिंचन करण्यात आले असून

चीनाब नदीवरील जगातील सर्वांत उंच रेल्वे पूल

येथील पडीक जमिनी लागवडीखाली आणल्या आहेत. याच टप्प्यात चिनाबच्या डाव्या तीरावर मुलतानच्या व शुजाबादच्या पठाण राजांनी पूर-कालवे काढलेले होते. ब्रिटिश अमदानीत या पूर-कालव्यांमध्ये बरीच सुधारणा करण्यात आली. रेचना दोआब भागातील जमिनीस हिच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात लाभ होतो. सपाट भागात चिनाब नौसुलभ आहे.

सिंधुजल करारानुसार या नदीचे पाणी पाकिस्तानलाही पुरविले जाते. भारत आपल्या भागातील पाण्याचा वापर मुख्यत्वे शेती व घरगुती वापरासाठी करतो. जम्मू व काश्मीर राज्यातील

सलाल वीजनिर्मिती प्रकल्प, रामवत जिल्ह्यातील बागलीहार, दुलहस्ती हे प्रकल्प विशेष महत्त्वाचे आहेत. यांशिवाय पाकिस्तानात या नदीवर मराला हेडवर्क्स (सियालकोटजवळ), खानकी हेडवर्क्स (गुजराणवाला जिल्हा), त्रिम्मू बॅरेज (झांग जिल्हा) ही धरणे महत्त्वाची आहेत. या नदीवर जम्मू व काश्मीर राज्यात बाक्कल व कौरी यांदरम्यान १.३१५ किमी. लांबीचा व ३५९ मी. उंचीचा जगातील सर्वांत उंच रेल्वे पूल बांधण्याचे काम सुरू आहे. तो डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. याशिवाय या नदीवरील चिनाब रेले ब्रीज, चिनिओट ब्रीज, जुना चुंद ब्रीज हे प्रसिद्ध आहेत.

समीक्षक : वसंत चौधरी