नाइट, फ्रँक हाइनमन (Knight, Frank Hyneman) : (७ नोव्हेंबर १८८५ — १५ एप्रिल १९७२). शिकागोमधील नवसनातनवादी अर्थसंप्रदायाचा अध्वर्यू अर्थशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रातील शिकागो स्कूलचे मानले जाणारे मुख्य संस्थापक. त्यांचा जन्म इलिनॉयमधील मॅक्लीन काउंटी येथे वडील विन्टन सायरस आणि आई ज्युलिया ॲन या दाम्पत्यापोटी झाला. त्यांनी १९११ मध्ये मिलिगन (टेनेसी) महाविद्यालयातून बी. ए., १९१३ मध्ये टेनेसी विद्यापीठातून बी. एस. व एम. ए. आणि १९१६ मध्ये कॉर्नेल विद्यापीठातून विद्यावाचस्पती (पीएच. डी.) या पदव्या संपादन केल्या. त्यांनी धर्मशास्त्र, जर्मन वाङ्मय, रसायनशास्त्र, तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र इत्यादी विषयांचा अभ्यास केला. १९१७ ते १९२७ या काळात त्यांनी कॉर्नेल, शिकागो व आयोवा या विद्यापीठांत अध्यापन केल्यानंतर १९२८ मध्ये ते शिकागो विद्यापीठात परतले व १९५२ पर्यंत तेथे अध्यापनाचे काम करित अखेर मॉर्टन हल हे मानाचे प्राध्यापकपद भूषविले. इतरांप्रमाणे शासकीय नोकरी, वृत्तपत्रव्यवसाय किंवा क्रियाशील संघटनांमध्ये काम न पतकरता ते शेवटपर्यंत तार्किक बुद्धिवादीच राहिले. ते विख्यात समीक्षकही होते. १९५० मध्ये ते अमेरिकन अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष झाले व १९५७ मध्ये परिषदेचा फ्रान्सिस वॉकर पदक देऊन त्यांना गौरविण्यात आले.
नाइट यांच्या १९२१ मध्ये प्रकाशित झालेल्या रिस्क, अनसर्टंटी अँड प्रॉफिट या पहिल्याच अर्थशास्त्रीय महत्त्वपूर्ण ग्रंथाने ते अमेरिकेतील अर्थशास्त्रज्ञांमध्ये नावारूपास आले. हा ग्रंथ म्हणजे त्यांनी १९१६ मध्ये लिहिलेला संशोधनात्मक प्रबंध होय. या प्रबंधात त्यांनी खंड व नफा यांच्यामधील भेद स्पष्ट केला. त्यासाठी जरी पूर्ण स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेचे विशदीकरण त्यांनी केले असले, तरी पूर्ण स्पर्धा ही केवळ एक संकल्पना असून प्रत्यक्ष परिस्थिती निराळी असते, याची त्यांना जाणीव होती. याच संदर्भात धोका व अनिश्चितता यांच्यातील फरक त्यांनी स्पष्ट केला व अनिश्चितता हीच नफ्याच्या मुळाशी असते, असे प्रतिपादिले. यामुळे ज्या शक्य घटना विम्यास पात्र ठरतात आणि ज्या घटनांना वस्तुनिष्ठ संभवनीय गणित लागू होऊ शकते अथवा नाही यांच्यात अंशात्मक भेद निर्माण झाला. नाइट यांच्या ग्रंथामुळे १९२१ पासून संभवनीयतेच्या सिद्धांतामध्ये होणाऱ्या प्रगतीमुळे धोका आणि अनिश्चितता यांच्यातील तीव्र भेद औपचारिक अर्थाने कमी होऊ लागला. नाइट यांच्या प्रबंधाबद्दल प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ हिक्स, सर जॉन रिचर्ड म्हणतात की, ‘नाइट यांच्या सिद्धांतामुळे भविष्यातील नफ्याच्या सिद्धांताचा पाया रोवला गेला असून त्यांनी वितरणात्मक हिस्सा असणारे भाडे व अपूर्ण ज्ञानाचा परिपाक असणारा नफा यांच्यातील फरक स्पष्ट केला आहेʼ. त्याच प्रमाणे नाइट यांनी १९३३ मध्ये विद्यार्थ्यांसाठी लिहिलेल्या दी इकॉनॉमिक ऑर्गनायझेशन या पुस्तकात अर्थशास्त्रातील संदिग्ध संकल्पनांचे विवरण केले असून अर्थव्यवस्था म्हणजे एक समाकलित सामाजिक संघटना असते, यावर भर दिला आहे. तसेच यामध्ये अर्थव्यवस्थेकडे सामाजिक संस्था म्हणून बघण्याचा परिपूर्ण दृष्टिकोन, स्थिरता व गतिमानता यांतील आणि व्यक्ती व सामाजिक अर्थव्यवस्था यांतील तीव्र भेद इत्यादी आर्थिक प्रणालींचे विस्तृत वर्णन त्यांनी या ग्रंथात केले आहे. त्यांनी संपत्ती किंवा चक्राच्या प्रतिमेचाही उपयोग यात केला आहे. नाइट यांनी सीमांत परतावा, समानता या अर्थशास्त्राच्या केंद्रस्थानी असणाऱ्या तत्त्वाला महत्त्व दिले. त्यांनी चल प्रमाण कायदा मांडला; उत्पादनाचे प्रथम, द्वितीय व तृतीय टप्प्यांमध्ये वर्गीकरण केले आणि घटत्या फलन कायद्याच्या अर्थातील फरक सांगितला. सर्वांत शेवटी त्यांनी संधीची किंमत या त्यांच्या अर्थशास्त्रातील सिद्धांतावर भर दिला. त्यांचा दी इकॉनॉमिक ऑर्गनायझेशन हा ग्रंथ शिकागो व्यतिरिक्त इतरत्र विशेष प्रसारित झाला नसला, तरी त्याचा प्रभाव लंडन अर्थशास्त्र संप्रदायावर उल्लेखनीय होता. नाइट यांचा भांडवलाचा सिद्धांत, संधीचा किंमत सिद्धांत यांचा सुसंगत विनियोग होता आणि समतोल अर्थव्यवस्थेत सर्व विनियोगांमध्ये हा दर समान असतो. त्यांच्या १९६० मधील इंटेलिजन्स अँड डेमॉक्रॅटिक ॲक्शन या ग्रंथात त्यांनी सत्याचा शोध हे स्वतंत्र समाजाचे वैशिष्ट्यपूर्ण लक्षण आहे, असे प्रतिपादिले. मानवी प्रगतीसाठी मानवाने सामाजिक समस्यांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे. केवळ सामाजिक संस्थांमध्ये फेरफार करून समस्या सुटत नाहीत, असे त्यांचे मत होते.
नाइट हे अर्थशास्त्रीय सिद्धांतांना आदर्श रचना मानीत. त्यांच्या मते, ‘माणसे जोपर्यंत चुका न करता आर्थिक प्रेरणेने कर्म करतात, तोपर्यंतच सत्यपरिस्थितीत सिद्धांत भाकित करू शकतात’; मात्र या प्रेरणा पारखण्यासाठी कोणतीच पद्धत उपलब्ध नाही. म्हणून सिद्धांत हे आधुनिक पद्धतीनुसार व्यवहार्य ठरत नाहीत. ते वर्तणूक जाणून घेण्यास व स्पष्ट करण्यास मदत करतात; पण वर्तणुकीचे शास्त्रीय अंदाज व्यक्त करण्यात नाही. नाइट हे तत्त्वत: निबंधकार असल्यामुळे त्यांचे पुष्कळसे काम प्रचलित विशिष्ट शिकवणुकीवर टीकात्म निबंधात्मक होते. त्यांच्या कामाचा दर्जा विद्यार्थ्यांनी संपादित केलेल्या, १९३५ मध्ये प्रकाशीत झालेल्या, त्यांच्या दी एथिक्स ऑफ कॉम्पिटिशन या निबंधसंग्रहावरून सुस्पष्ट होतो. अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून वर्तणुकीकडे पाहण्यावर मर्यादा घालणे, हा व्यापक दृष्टिकोन या संग्रहात आहे. सिद्धांतांना व्यापक पद्धतीने लागू करण्याबाबत नाइट यांचा असणारा शंकेखोरपणा त्यांना अमेरिकन संस्थापकांच्या ओळीत नेऊन बसवतो. त्यांच्या संकल्पनेत असलेल्या अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी क्लृप्तीयुक्त आर्थिक वर्तणूक, सहेतूक उद्दिष्टांची निश्चिती, उद्दिष्टे पूर्ण करण्याची प्रक्रिया इत्यादी बाबी आहेत. ही संकल्पना पुन्हा आर्थिक व सामाजिक वर्तणुकीचे नियम ठरविण्यासाठी विचार व प्रश्न निर्माण करून समाजरचना प्रस्थापित करतात.
नाइट यांची सामाजिक तत्त्वज्ञानाविषयीची आस्था त्यांच्या १९३५ मध्ये लिहिलेल्या ‘इकॉनॉमिक थिअरी अँड नॅशनॅलीझम’ या निबंधावरून स्पष्ट होते. त्यांनी यामध्ये विशेष करून माणसाची मोठ्या जैविक समग्राचा भाग असण्याची इच्छा अधोरेखित करून आधुनिक सामाजिक धर्माची गरज सुचविली. १९३० च्या दशकाच्या मध्यात लिहिलेला ग्रंथस्वरूपी हा निबंध आजही समर्पक वाटतो. सामाजिक तत्त्वज्ञानातील मोठ्या समस्यांबाबतची त्यांची तळमळ त्यांच्या १९४७ मधील फ्रिडम अँड रिफॉर्म या त्यांच्या विद्यार्थ्यांनी संकलित केलेल्या निबंधसंग्रहात्मक ग्रंथातून स्पष्ट होते. त्यांच्या मते, ʼऐतिहासिक उदारमतवादाने रूढीबद्ध धर्माचा नाश केला असून प्रभावी पर्यायही दिलेला नाही. परिणामी माणसे दहशतवादाकडे झुकली आहेत किंवा राज्यकर्त्यांना देव मानू लागली आहेत. त्यामुळे माणसांमध्ये सत्य, प्रामाणिकता, परस्पर आदर, खिलाडूवृत्ती इत्यादींवर आधारित सामूहिक नैतिकता असणे आवश्यक आहे. ही नीतिमत्ता उदारमतवादाने निर्माण होऊ शकली असती; मात्र असे होण्यास अपयश आले’. त्यानंतर त्यांनी सर्वांत अलिकडे लिहिलेल्या इंटीलीजन्स अँड डेमोक्रेटिक ॲक्शन (१९६०) या पुस्तकात संघटित राजकीय समाजामध्ये माणसाने त्याच्या इतरांशी असणाऱ्या संबंधांबाबत समीक्षापर बुद्धिमत्तेचा वापर करणे, याचे अत्यंत आशावादीपणे मूल्यांकन केले आहे.
नाइट यांचा संघटित धर्मांबद्दलचा दृष्टिकोन सत्य शोधण्याच्या बांधिलकीशी निगडीत होता. त्यांचा आग्रह होता की, धर्मतत्त्वे ही इतर तत्त्वांपेक्षा वेगळी नाहीत. तीसुद्धा समीक्षात्मक छाननीच्या अदीन असली पाहिजे. ते रूढ अर्थाने समाजसुधारक नव्हते. जेव्हा माणसामध्ये क्षमता आणि स्वत:च्या आत्म्याचे ऐकण्याची इच्छा निर्माण होते, तेव्हा समाजव्यवस्थेत सुधारणा होत असते, असा त्यांचा विश्वास होता. सामाजिक समस्यांबाबत ते म्हणतात की, ‘सामाजिक संस्था बदलण्यापेक्षा माणसांची विचार करण्याची पद्धत बदलली पाहिजे’.
नाइट यांनी यांची ख्याती विशेषतः निबंधकार आणि ग्रंथपरीक्षक म्हणून आहे. त्यांचे बरेचसे लेखन प्रस्थापित श्रद्धांवरील टीकात्मक निबंधांच्या स्वरूपात आढळते. त्यांचे लेखन पुढील प्रमाणे : रिस्क, अनसर्टंटी अँड प्रॉफिट (१९२१); दी इकॉनॉमिक ऑर्गनायझेशन (१९३३); दी एथिक्स ऑफ कॉम्पिटिशन (१९३५); फ्रिडम अँड रिफॉर्म (१९४७); ऑन दी हिस्टोरी अँड मेथड ऑफ इकॉनॉमिक्स (१९५६); इंटीलीजन्स अँड डेमोक्रेटिक ॲक्शन (१९६०) इत्यादी.
नाइट यांचे शिकागो येथे निधन झाले.
समीक्षक : श्रीराम जोशी