शिवकालातील एक महत्त्वाचा डोंगरी किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांची सुरुवातीची राजधानी येथे होती. तो महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात (वेल्हे तालुका) वेल्हे गावाच्या आग्नेयीस सु. १६ किमी. वर समुद्रसपाटीपासून १३२२ मी. उंचीवर आहे. पायथ्यापासून किल्याची उंची ६०० मी. आहे.
गडावर जाण्याचे दोन मुख्य मार्ग आहेत. पाली दरवाजा आणि गुंजवणे दरवाजा. पाली दरवाजा हा गडावर येण्याचा महामार्ग असून दोन दरवाजे पार करून किल्ल्यावर पोहोचता येते. पाली गाव किल्ल्याच्या पश्चिमेला आहे, तर गुंजवणे हे गाव गडाच्या ईशान्येला आहे. सध्या प्रचलित आणि लोकप्रिय असलेली वाट गुंजवणे गावातून चोर दरवाजा मार्गे पद्मावती माचीवर येते. अनेकांचा असा गैरसमज होतो की, आपण गुंजवणे दरवाजाने आलो. परंतु गुंजवणे दरवाजा गडाच्या पूर्वेला तर चोर दरवाजा उत्तरेला आहे. पाली दरवाजा हा मुख्य महामार्ग असून ही वाट रुंद आणि पायऱ्यांची आहे. राजगडाला उत्तरेस पद्मावती, पूर्वेला सुवेळा आणि नैर्ॠत्येस संजीवनी अशा तीन माच्या व एक बालेकिल्ला आहे. याचा तट व बुरूज अनेक ठिकाणी दुहेरी म्हणजे चिलखती आहेत.
गडावर येण्यास गुंजवणे आणि पाली व्यतिरिक्त आळू, काळेश्वरी, भुतोंडे असे दरवाजे व तीन दिंड्या आहेत. पद्मावती माची पुष्कळ लांब-रुंद असल्यामुळे राजगडावरील मुख्य वस्ती येथेच होती. सुवेळा व संजीवनी ह्या दोन्ही माच्यांवर आणि बालेकिल्ल्यावर त्यामानाने कमी वस्ती होती. खुद्द छत्रपती शिवाजी महाराज कुटुंबासह या बालेकिल्ल्यावर राहात असत. सुवेळा आणि संजीवनी माची चिंचोळी आहे. गडावरील मुख्य देवता पद्मावती; तिचे मंदिर पद्मावती माचीवर आहे. याशिवाय पूर्वी हवालदाराची सदर देखील येथेच होती; पण स्वातंत्र्योत्तर काळात ती भुईसपाट झाली आहे. तिन्ही माच्या व बालेकिल्ला यांवर गणेश, मारुती, ब्रह्मर्षि, जननी काळेश्वरी, भागीरथी आणि पद्मावती यांची लहानमोठी मंदिरे आणि दारूखाना, दिवाणघर, राजवाडा, पागा इ. कमीअधिक पडीक अवस्थेतील वास्तू आहेत. प्रत्येक माची व बालेकिल्ला यांवर पाण्याची व्यवस्था असून पद्मावती माचीवरील तळे पुष्कळच मोठे आहे. बालेकिल्ल्यावर वसाहतीचे अनेक पुरावे दिसतात. आजही बांधकामाची आणि सदरेची जोती (चिरेबंदी काम किंवा चौथरा) बालेकिल्ल्यावर आहेत.
या डोंगराचे प्रारंभीचे नाव मुरूमदेव. याला बहमनी आमदानीत महत्त्व नव्हते; पण अहमदनगरच्या निजामशाहीचा संस्थापक पहिला अहमद याने मुरूमदेव आपल्या ताब्यात घेतला. तदनंतर त्यास गडाचे रूप येऊ लागले. या गडाचे रक्षण करण्याचे काम प्रथम गुंजण माळवातील शिलिमकर देशमुखांकडे होते. छ. शिवाजी महाराजांनी १६४७ नंतर लवकरच मावळातील निरनिराळे गड आपल्या ताब्यात घेतले. त्याबरोबरच मुरूमदेव आपल्या ताब्यात घेतला. त्याला राजगड हे नाव देऊन ते आपले राजधानीचे ठिकाण केले. यामुळे प्रथम काही दिवस शिलिमकर व शिवाजी महाराज यांत कुरबुरी होत असत. छत्रपती शिवाजींनी १६७० पर्यंत हीच राजधानी ठेवली. शिवाजी महाराज व पुढे संभाजी महाराजांनंतर हा किल्ला एकदोन वेळा औरंगजेबाच्या ताब्यात गेला असला; तरी तो सामान्यतः मराठ्यांच्याच ताब्यात राहिला. छत्रपती शाहूंच्या कारकीर्दीत मावळातील कित्येक किल्ले भोरच्या सचिवांच्या ताब्यात दिले होते. सिंहगड वगळता संस्थाने विलीन होईपर्यंत ते त्यांच्या ताब्यात राहिले. त्यावेळी तेथे हवालदार व काही अधिकारी वर्ग असे.
आज किल्ल्यावर महाराष्ट्र शासनातर्फे जतन व संवर्धनाची कामे चालू आहेत. पद्मावती माचीवरील पडलेली सदर पुन्हा बांधण्यात आलेली आहे. तसेच गडावर पर्यटकांसाठी विश्रांतीगृह नव्याने बांधलेले आहे. गडावर खडकात खोदलेली टाकी आहेत. गुंजवणे दरवाज्यातून उतरण्याची वाट अवघड असल्याने आधारासाठी स्टीलचे रेलिंग (कठडे) लावलेले आहेत. गाडीरस्ता सध्या पालीमार्गे खंडोबाच्या माळापर्यंत येतो. तिथून पाली दरवाजामार्गे एक तासात पद्मावती माचीवर पोहोचता येते.
संदर्भ :
- खरे, ग. ह. स्वराज्यातील तीन दुर्ग, पुणे, १९६७.
समीक्षक : सचिन जोशी