योगासनाचा एक प्रकार. हठयोगातील हे आसन शरीरसंवर्धनात्मक प्रकारात मोडते. ‘भुजंग’ म्हणजे सर्प. भुजंग ह्या शब्दाने क्वचित नागाचाही बोध होतो. या आसनात शरीराची रचना फणा काढलेल्या नागाप्रमाणे दिसते म्हणून या आसनाला भुजंगासन हे नाव प्राप्त झाले आहे.
कृती : जमिनीवर सतरंजीसारखे जाड आसन घालून त्यावर पालथे म्हणजे पोटावर झोपावे. दोन्ही पाय सरळ व एकमेकांस लागून असे ठेवावे. कपाळ जमिनीवर ठेवून हातांचे पंजे छातीच्या बाजूला जमिनीवर ठेवावेत म्हणजे दोन्ही कोपर वर उचललेली राहतील. ही आसनापूर्वीची स्थिती झाली. आता हनुवटी समोर करून मस्तक वर उचलत न्यावे. तसेच खांदे, छाती असे नाभीपर्यंतचे शरीर वर उचलावे. नाभी जमिनीवरच असावी. हातावर भार देणे टाळावे आणि शरीर मेरुदंडाच्या आधारे वर उचलावे. या स्थितीमध्ये १० ते २० सेकंद स्थिर रहावे. श्वासोच्छवास संथ असावा. सर्व क्रिया सहजतेने व हळूहळू कराव्या. आसन सोडताना मस्तक सावकाश खाली आणावे व कपाळ जमिनीवर ठेवावे. थोडा वेळ थांबून ह्या आसनाची १ ते २ आवर्तने आवश्यकता असल्यास व शक्य असल्यास करावीत.
लाभ : या आसनात मेरुदंडाच्या वरच्या भागाला बाक मिळतो. मान व पाठीचा वरचा भाग मागे ताणला गेल्यामुळे मणक्यांना धरून ठेवणारे स्नायू व स्नायुबंध बळकट होतात. मेरुदंडाची लवचिकता वाढते. हे आसन केल्यामुळे मानेचे आणि पाठीचे दुखणे उद्भवण्याची शक्यता कमी होते. खांदे बळकट होतात. श्वसन सुरू असताना नाभीप्रदेशावर दाब पडल्याने त्या ठिकाणी धन व ऋण दाब आलटून पालटून निर्माण होतात. त्यामुळे त्या भागातील रक्ताभिसरण सुधारते. बद्धकोष्ठता व अग्निमांद्य या विकारांवर मात करता येते. फुप्फुसांची क्षमता वाढते. थकवा येत नाही. दिवसभर उत्साह राहतो. आत्मविश्वास वाढतो व नैराश्य दूर होते. या आसनाचा आध्यात्मिक लाभ असा की, यामुळे साधकाची कुण्डलिनी शक्ति जागृत होते (घेरण्ड संहिता २.४३).
विधिनिषेध : कंबर दुखत असल्यास हे आसन काळजीपूर्वक करावे. सहन होईल इतपतच छाती वर उचलावी. आसन स्थिर असताना श्वसन नैसर्गिकरीत्या चालू राहिले पाहिजे. पाय शिथिल ठेवावेत. अनावश्यक ताण किंवा झटके देऊ नयेत. तीव्र मानदुखी, पाठदुखी, आतड्यातील व्रण (Ulcer), आंत्रपुच्छ (Appendicitis), अंतर्गळ (Hernia) या सारख्या उदरातील वेदनादायक विकारात तसेच उदरात वातविकाराचे प्राबल्य असल्यास हे आसन वर्ज्य करावे.
समीक्षक : श्रीराम आगाशे