बृहद्देवता : वेदांगांव्यतिरिक्त वेदांचे गूढ होत चाललेले विषय उलगडून सांगणाऱ्या काही ग्रंथांपैकी एक महत्त्वाचा संस्कृत ग्रंथ म्हणजे बृहद्देवता. वेदांची सूक्ते जाणून घेताना त्यांचे द्रष्टे ऋषी, त्यांमधे वर्णन केलेली देवता, त्या सूक्तांचा छंद आणि त्यांचा विनियोग जाणून घेतला पाहिजे अशी परंपरा आहे. यापैकी ऋषी, देवता, छंद सांगणाऱ्या अनुक्रमणी रचल्या गेल्या. या अनुक्रमणींपेक्षा वेगळी आणि अधिक माहिती बृहद्देवता या ग्रंथामध्ये सांगितली आहे. ग्रंथाच्या नावावरुनच सूचित होते की देवतांबद्दल यामध्ये विस्ताराने सांगितले आहे. आज उपलब्ध असलेला बृहद्देवता ग्रंथ ऋग्वेदाशी संबंधित आहे. ऋग्वेदातील सूक्तांबद्दल क्रमानुसार माहिती या ग्रंथात दिली आहे. प्रत्येक वेदाची अशी माहिती देणाऱ्या बृहद्देवता होत्या असे म्हणतात, पण आजमितीस फक्त एकच बृहद्देवता उपलब्ध आहे.
बृहद्देवतेमध्ये प्रत्येक सूक्ताचा ऋषी, त्याची देवता, सूक्तातील प्रत्येक मंत्राचा छंद कोणता हे सांगितले आहे. या ग्रंथाचा कर्ता शौनक आहे असे म्हटले जाते; पण हा नेमका कोणता शौनक आहे याबद्दल निश्चित असे काहीच सांगता येत नाही. तसेच या ग्रंथाची रचना केव्हा झाली याबद्दलही माहिती उपलब्ध नाही. पाणिनीच्या आधी आणि यास्कानंतर त्याची रचना झाली असावी असे सांगता येईल. यास्काचे निरुक्त आणि बृहद्देवता यांच्यात बरेचसे साम्य आहे, फक्त यास्कांची रचना गद्य आहे तर बृहद्देवता पद्यबध्द आहे. नावावरुनच असे लक्षात येते की या ग्रंथामध्ये देवतांविषयी विस्ताराने चर्चा केली आहे. या देवता ऋग्वेदातील सूक्तांमध्ये वर्णिलेल्या, स्तुती झालेल्या देवता आहेत. येथे देवतांविषयक जी माहिती सांगितली आहे तिच्याच आधारावर नंतरकालीन ग्रंथांमध्ये देवतांविषयक विवरण दिले गेले. सर्वानुक्रमणी आणि सायणाचार्यांचे ऋग्वेदभाष्य ही त्याची दोन ठळक उदाहरणे सांगता येतील.
या बृहद्देवतेमध्ये आठ अध्यायात मिळून एकूण १२०० श्लोक येतात. प्रत्येक सूक्त, ऋचा, अर्धर्च आणि पाद या सर्वांची देवता सांगण्याचे लेखकाचे उद्दिष्ट आहे, कारण देवतेचे सर्व तपशील कळल्याने देवतांची माहिती तर मिळतेच आणि या ऋचांचे उद्दिष्ट काय आहे तेही कळते . पहिल्या तीन-चार श्लोकांमध्ये ग्रंथकर्त्याने त्याची भूमिका स्पष्ट केली आहे. दैवते कळली की मंत्र पहाण्यामागे ऋषींचा अभिप्राय काय आहे, त्यातील विज्ञान काय आहे तेही कळते असे त्याचे म्हणणे आहे. त्यानंतर देवतांचे वर्ग सांगून देवतांची स्तुती सूक्तांमध्ये कशी/कशा पध्दतीने केली आहे ते तो सांगतो. पहिला संपूर्ण अध्याय (१३१ श्लोक)आणि दुसऱ्यातील सुरुवातीचे काही श्लोक देवतांचे स्थानानुसार वर्गीकरण आणि तेथील देवतांची संपूर्ण यादी देतात. यामध्ये प्रत्येक देवतेचे स्वरूप स्थान, वेगळेपण (वैलक्षण्य) विस्ताराने सांगितले आहे. पहिल्या अध्यायातील विषय दुसऱ्या अध्यायात चालू राहतो. त्यामुळे अध्यायांची विभागणीही काटेकोरपणे केलेली नाही असे जाणवते. देवतांची माहिती देताना त्यांच्या नावांच्या व्युत्पत्ती देऊन, त्याद्वारे त्या देवतांची कार्ये सांगून त्यांना ती नावे का मिळाली हे दुसऱ्या अध्यायात सांगितले आहे. वेगवेगळ्या प्रकारांनी दिलेल्या वेगवेगळ्या व्युत्पत्ती एकाच देवतेची निरनिराळी रूपे तर सूचित करतातच, त्याचबरोबर यास्काचार्यांच्या निर्गमनतत्त्वांची आठवण करून देतात. अग्नीच्या जातवेदस् या नामाभिधानाच्या तीन व्युत्पत्ती सांगून आणखी एकदा वेगळ्या प्रकाराने स्पष्ट करून इंद्रालाही जातवेदस् का म्हणतात ते सांगितले आहे. दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी सामान्यतः ऋषी म्हणजे कोण, देवता म्हणजे काय, संवादसूक्तांच्या दृष्टिकोनातून या परिभाषा कशा आहेत याचे सर्वसाधारण वर्णन करून नंतर व्याकरणातील काही संज्ञा स्पष्ट करून त्यांविषयी चर्चा केली आहे. निपात, उपसर्ग, धातू, सर्वनाम, समास हे त्यांतील काही विषय. यामध्ये निरुक्ती (म्हणजे व्युत्पत्ती) सांगणे किती महत्त्वाचे आहे हेही येते. दुसऱ्या अध्यायाच्या १२५ व्या श्लोकापर्यंत ही प्रस्तावना आहे. १२६ व्या श्लोकापासून प्रत्येक सूक्ताची, त्यातील प्रत्येक ऋचा, अर्धर्च, पाद यांची देवता सांगण्यास सुरुवात होते. विश्वे देवाः अशी देवता केव्हा असते आणि त्यातील विश्व या संज्ञेने नेमके काय म्हणायचे आहे हेही ग्रंथकर्त्याने सविस्तर सांगितले आहे.
सूक्तक्रमाने, सूक्तांच्या ऋचांचा निर्देश करून देवतांचा निर्देश करीत असताना अनेकदा सूक्तांची पूर्वपीठिका म्हणून ठिकठिकाणी काही आख्याने बृहद्देवता सांगते. जवळजवळ चाळीस वेगवेगळी आख्याने यामधे येतात. संदर्भातील सूक्त कोणत्या परिस्थितीत रचली गेली याचा इतिहास ही आख्याने सांगतात. एकूण सुमारे ३०० श्लोकात या कथा सांगितल्या आहेत. या ग्रंथाचा सर्वात महत्त्वाचा आणि माहितीपूर्ण असा हा हिस्सा आहे. सुसूत्रपणे, संगतवार सांगितलेल्या या कथा म्हणजे संस्कृत वाङ्मयातील सर्वात प्राचीन असा कथासंग्रहच आहे. काही कथा ऐतिहासिकदृष्ट्या महाभारताशी निगडित आहेत, कारण यातील अनेक कथा महाभारतात नंतर मिळतात. यांमधील कथांशांबरोबरच त्यांची ऐतिहासिकताही महत्त्वाची आहे.
देवतांच्या संदर्भात या ग्रंथात आणखीही काही माहिती दिली आहे. सूक्तद्रष्टे ऋषी, ऋषीका (स्त्रीद्रष्ट्या), विविध देवतांची वाहने, आप्री सूक्तांचे सविस्तर विवेचन असे काही विषय यात चर्चिले आहेत. शेवटच्या नऊ वर्गांमध्ये विविध यज्ञातील मंत्रांच्या तसेच सप्तस्वरांच्या अधिष्ठात्री देवता सांगितल्या आहेत. त्याचबरोबर त्यांची शरीरातील स्थानेही सांगितली आहेत. येथे पहिल्या मंडलातील काही सूक्तांचा क्रम नंतर सर्वानुक्रमणीमधेही, बृहद्देवतेने निर्दिष्ट केलेल्या ३७ सूक्तांचा उल्लेख येत नाही. इतर ठिकाणी नोंदविलेल्या ३२ किंवा ३५ खिलांपैकी सातांचा संदर्भ बृहद्देवतेत येतो आणि त्यात सांगितलेली ३० खिले सूक्ते इतरत्र नोंदविलेली नाहीत. म्हणजे बृहद्देवतेसमोर खिलांची एक वेगळीच परंपरा असावी.
बृहद्देवतेमधे अनेक पूर्वाचार्यांचे उल्लेख येतात, त्यातील काही म्हणजे मधुक, श्वेतकेतू, गालव, यास्क, गार्ग्य, इ. शौनकाचाही यात उल्लेख येतो आणि ग्रंथकर्ता स्वतःचा उल्लेख प्रथम पुरुषात करतो. अनेक देवतांबरोबर लेखक आणखी एका महादेवतेचा निर्देश करतो ती म्हणजे परमात्मा. त्याच्या मते या सर्व देवता म्हणजे त्याचीच रूपे आहेत.
सूक्तातील देवतांविषयक विस्ताराने, मोठ्याप्रमाणावर (बृहत्) माहिती देणारा ग्रंथ असे या ग्रंथाचे स्वरूप आहे. वैदिक देवतांची सर्व रहस्ये विशद करणारा हा ग्रंथ आहे आणि देवता म्हणजे काय, तिचे स्वरूप कसे आहे, याबद्दल सर्वसाधारण माहितीही त्यात आहे. देवतांविषयक सर्व काही सांगणे हेच याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी वेळोवेळी सांगितलेल्या आख्यायिका तर प्रथम इतिहास आणि कथावाङ्मयाचा आदिम आविष्कार आहे. यादृष्टीने बृहद्देवतेचे महत्व अनन्यसाधारणच आहे.
बृहद्देवतेवर फारसे संशोधनात्मक कार्य आज उपलब्ध नाही. मॅक्डोनेल ए.ए. या साक्षेपी संशोधकाने या ग्रंथाचे विवरणात्मक आणि परिचयात्मक प्रस्तावनेसह आणि भाषांतरासह महत्वाचे संशोधनात्मक कार्य केले. ते केंब्रिज येथून १९०४ साली हार्वर्ड ओरिएन्टल सीरिजमध्ये ५ व ६ च्या ग्रंथांकांमध्ये प्रसिद्ध झाले. मोतीलाल बनारसीदास या दिल्लीच्या प्रकाशकांनी १९६५ मध्ये त्याची दुसरी आवृत्ती काढली. तसेच वाराणसीच्या चौखम्बा प्रकाशनाने काशी संस्कृत मालामध्ये १६४ वा ग्रंथांक म्हणून रामकुमार राय यांनी सिद्ध केलेल्या बृहद्देवतेची तिसरी आवृत्ती काढली. या पलिकडे या ग्रंथावर फारसे काम झालेले नाही. या ग्रंथावर जाने. १८९४ मध्ये आणि १९९६ मध्ये संशोधनपर दोन लेख प्रसिद्ध झाले. त्यातील एक भाष्याच्या उपलब्ध हस्तलिखिताच्या आधारे आहे तर दुसरा त्यातील कथांवर आहे.
संदर्भ : राय,रामकुमार (संपा), शौनकीय बृहद्देवता : ऋग्वेद के देवताओं और पुराकथाओं का सारांश,चौखम्भा संस्कृत संस्थान,वाराणसी,१९८३.
समीक्षक : ग.उ.थिटे