टर्की देशाच्या (तुर्कस्तानच्या) नैर्ऋत्य भागातून वाहणारी नदी. ब्यूयूक मेंडेरेस या तुर्की नावाने किंवा बिग मिॲन्डर तसेच मिॲन्डर या प्राचीन नावानेसुद्धा ही नदी ओळखली जाते. टर्कीच्या पश्चिम-मध्य भागात असलेल्या ॲनातोलिया पठाराच्या नैर्ऋत्य भागात, स. स. पासून ८८० मी. उंचीवर या नदीचा उगम होतो. आफ्यॉनकाराहिसार या शहराच्या पश्चिमेस तसेच ॲनातोलिया पठाराच्या दक्षिण भागात असलेल्या लेक डिस्ट्रिक्ट किंवा तुर्कीश लेकलँड या भूसांरचनिक प्रकारच्या उथळ सरोवर मालिकांच्या प्रदेशाजवळ या नदीचे उगमस्थान आहे. नदीची लांबी ५८४ किमी. आणि पाणलोटक्षेत्र सुमारे २५,००० चौ. किमी. आहे.
चिबड प्रदेशाचा थोडा प्रदेश वगळता वरच्या टप्प्यात नदी अरुंद दरीतून आणि कॅन्यनमधून प्रथम नैर्ऋत्येस व त्यानंतर पश्चिमेस वाहत जाते. येथे तिच्या पात्रात अनेक जलप्रपात आढळतात. सारायकॉय नगरापासून एकदम पश्चिमेस वळून पठारी प्रदेशातील रुंद व उथळ पात्रातून वाहू लागते. हा भाग वैशिष्ट्यपूर्ण भूमध्य सागरी भूप्रदेशातील असून तेथे तिच्या काठावर आणि खोर्यात ठिकठिकाणी अंजीराची झाडे, ऑलिव्हच्या वृक्षवाटिका आणि द्राक्षमळे आढळतात. आयडन शहराजवळ नैर्ऋत्यवाहिनी बनून पुढे सेमॉस बेटाच्या दक्षिणेस ती इजीअन समुद्राला मिळते. मुखाजवळ मायलीटस हे प्राचीन बंदर असून मेंडेरेस नदीने वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनाने दीर्घकाळ ते भूवेष्टित किंवा बंद होते. इ. स. सहाव्या शतकात ते पूर्णत: उद्ध्वस्त झाले. ऑर्गिआस, मार्सयास, क्लूड्रूस, लीथाअस, गेसन या उत्तरेकडून मिळणार्या; तर एरिक्यु, अकेय, आयन, ऑब्रिमस, लायकस, हार्पासर, दुसरी मार्सयास या दक्षिणेकडून मिळणार्या मेंडेरेसच्या उपनद्या आहेत. आदीगुझेल आणि सिंडेरे ही या नदीवरील प्रमुख धरणे आहेत. नाझिली, आयडन आणि सके ही नदीच्या काठावरील प्रमुख शहरे आहेत. खोर्यातील शेती, उद्योगधंदे आणि मानवी उपभोगासाठी पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने या नदीला विशेष महत्त्व आहे. शेती, फळांचे रस काढणे आणि चर्मोद्योग हे खोर्यातील प्रमुख मानवी व्यवसाय आहेत. कृषी, औद्योगिक आणि नागरी अपशिष्टांमुळे नदीच्या पाण्याचे झालेले प्रदूषण व त्यामुळे निर्माण होत असलेले मानवी आरोग्याचे प्रश्न ही फार मोठी समस्या बनली आहे. नदीपाण्याच्या वापरासंबंधीचे योग्य नियोजन करण्याच्या दृष्टीने सर्वसमावेशक अशी ‘नदीजल खोरे व्यवस्थापन समिती’ स्थापन करण्यात आलेली आहे. नदीतून केवळ लहान बोटींमार्फतच जलवाहतूक होऊ शकते.
मेंडेरेस नदीने अनेकदा आपला प्रवाह मार्ग बदललेला आहे. या नदीच्या नागमोडी वळणांच्या वैशिष्ट्यामुळे प्राचीन ग्रीक किंवा रोमन वाङ्मयात तिला मिॲन्डर (Maeander) या नावाने ओळखले जाई. त्यावरूनच मिॲन्डर (Meander) हे इंग्लीश नाव आले असून त्याचेच पुढे मेंडेरस असे झाले. थोर ग्रीक महाकवी होमर यांच्या इलिअड या महाकाव्यात या नदीचा उल्लेख आढळतो.
ब्यूयूक मेंडेरेस नदीच्या उत्तरेस कूकूक मेंडेरेस या नावाची नदी आहे. लिटल मिॲन्डर किंवा प्राचीन स्कमँडर या नावांनीही ही नदी ओळखली जाते. आयडा (काझडागी) या प्रवतश्रेणीत उगम पावणारी ही नदी पश्चिम दिशेने वाहत जाऊन इझमिर प्रांतातील सेलचूक येथे इजीअन समुद्राला मिळते. नदीची लांबी ११४ किमी. आणि जलवाहनक्षेत्र ३,५०२ चौ. किमी. आहे. ही नदी वारंवार आपले पात्र बदलते. प्राचीन इफेसस हे शहर एकेकाळी तिच्या मुखाजवळील प्रमुख बंदर होते; परंतु काळाच्या ओघात गाळाच्या संचयनामुळे ते बंद पडले.
समीक्षक : वसंत चौधरी