योगशास्त्राची रचना चार मुख्य घटकांवर आधारित असल्यामुळे योगशास्त्राला चतुर्व्यूह म्हटले जाते. ज्याप्रमाणे चिकित्साशास्त्रात (आयुर्वेदात) रोग, रोगाचे कारण, आरोग्य (रोगाचा नाश) आणि औषध (रोग नष्ट करण्याचे साधन) या चार गोष्टींचा विचार केला जातो त्याचप्रमाणे योगशास्त्रातही दु:ख, दु:खाचे कारण, मोक्ष/कैवल्य (दु:खाचा नाश) आणि कैवल्यप्राप्तीचे उपाय या चार गोष्टींचा विचार केला जातो. शास्त्रीय भाषेत या चार घटकांना हेय, हेयहेतु, हान आणि हानोपाय असे म्हटले जाते. योगदर्शनानुसार या चार घटकांचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे –

(१) हेय : हेय म्हणजे त्याज्य, त्याग करण्यायोग्य. कोणत्याही जीवाला आयुष्यात दु:खाचा अनुभव घ्यावासा वाटत नाही. प्रत्येक जण सर्वतोपरी दु:खाला टाळण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यामुळे दु:ख प्राप्त होऊ नये अथवा प्राप्त झाल्यास त्याचा प्रभाव कमी कसा करता येईल याविषयी तो सतत प्रयत्नशील असतो. त्यामुळे दु:खाला हेय म्हणजेच त्याज्य मानले आहे. परंतु, जे दु:ख आधीच अनुभवून झाले आहे अशा भूतकालीन (अतीत) दु:खाचा त्याग करता येत नाही. जे दु:ख वर्तमान क्षणात अनुभवले जात आहे, त्याचाही त्याग करता येणे शक्य नाही. त्यामुळे भविष्यात जे दु:ख येण्याची शक्यता आहे, अशा अनागत दु:खाचाच त्याग करता येऊ शकतो. त्याला टाळण्यासाठी काही उपाययोजना करता येऊ शकतात. त्यामुळे महर्षी पतंजलींनी ‘भविष्यात येणारे दु:ख त्याज्य आहे’ असे म्हटले आहे. योगसूत्राच्या काही व्याख्याकारांनी दु:खाप्रमाणेच संसारालाही हेय मानले आहे.

(२) हेयहेतु : हेयहेतु म्हणजे दु:खाचे कारण होय. जर दु:खाचे कारण समजले तरच त्याचा नाश करता येतो, त्यामुळे ‘दु:खाचे कारण’ समजणे हेही महत्त्वाचे आहे. योगदर्शनानुसार ‘द्रष्टा (पाहणारा किंवा जाणणारा) व दृश्य (पाहिले जाणारे किंवा जाणले जाणारे) या दोघांचा संयोग हे दु:खाचे कारण आहे’. पाहण्याची किंवा ज्ञान प्राप्त करून घेण्याची योग्यता फक्त चैतन्यस्वरूप पुरुषात (आत्म्यात) असल्याने आत्म्याला द्रष्टा म्हटले आहे. ५ महाभूते, ५ तन्मात्र, ५ ज्ञानेंद्रिये, ५ कर्मेंद्रिये, मन, अहंकार आणि बुद्धी या २३ तत्त्वांचे ज्ञान प्राप्त करता येऊ शकते, त्यामुळे या २३ तत्त्वांना ‘दृश्य’ म्हटले जाते. द्रष्टा पुरुष आणि दृश्यरूप २३ तत्त्वे यांचा संयोग दु:खाचे कारण आहे. पुरुष हा त्रिगुणातीत असल्याने त्याचा सुख-दु:खाशी वास्तविक संबंध नाही. कारण सुख, दु:ख आणि मोह हे क्रमश: सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांचे स्वभावधर्म आहेत. अविद्येमुळे चैतन्यस्वरूप पुरुषाला शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी या दृश्य पदार्थांशी एकत्वाचा अनुभव येतो आणि दृश्य पदार्थ त्रिगुणात्मक असल्याने त्यातील गुणांमुळे उत्पन्न होणाऱ्या सुख-दु:खाचे त्याला ज्ञान होते. ज्याप्रमाणे आपल्या सान्निध्यात असणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीचे दु:खही आपल्याला स्वत:चेच दु:ख वाटते, त्याचप्रमाणे पुरुषाच्या सान्निध्यात असणाऱ्या शरीर, मन इत्यादी दृश्य पदार्थांमधील रजोगुणामुळे उत्पन्न होणारे दु:खही पुरुषाला स्वत:चेच वाटते. अशा प्रकारे द्रष्टा (पुरुष) आणि दृश्य (२३ पदार्थ) यांचा संयोग दु:खाचे कारण होय.

(३) हान : हान या शब्दाचा अर्थ आहे ‘त्याग’. ज्यावेळी अविद्येचा त्याग/नाश होतो, त्यावेळी अविद्येमुळे होणारा पुरुष आणि दृश्य पदार्थांचा संयोगही नष्ट होतो. या अवस्थेमध्ये पुरुष आपल्या स्वरूपामध्ये राहतो व त्याला ज्ञेय असे काहीही उरत नाही, यालाच कैवल्य असे म्हणतात. कैवल्य म्हणजे दुसऱ्या कोणत्याही तत्त्वाशी संयोगाशिवाय राहणे.

(४) हानोपाय : अविद्येचा त्याग/नाश केवळ यथार्थ ज्ञानाद्वारेच होऊ शकतो. त्यामुळे पुरुष आणि दृश्य पदार्थ यामधील भेदाचे ज्ञान करवून देणारे दृढ विवेकज्ञान/विवेकख्याति हानोपाय होय. चैतन्यस्वरूप पुरुष आणि त्रिगुणात्मक २३ दृश्य पदार्थांना एक समजणे हे अविद्येचे रूप आहे आणि ते पृथक् आहेत, असे ज्ञान प्राप्त करणे म्हणजे विवेकज्ञान होय. अष्टांगयोगाचे अनुसरण केल्याने चित्तातील अशुद्धी हळूहळू कमी होत जाते. जशी जशी अशुद्धी कमी होईल तसा तसा चित्तातील सत्त्वगुण वाढून योग्याला अधिकाधिक ज्ञान प्राप्त होते. अंतिमत: योग्याला विवेकज्ञान प्राप्त होते, ज्याद्वारे अविद्या नष्ट होते.

योगसाधनेची संपूर्ण प्रक्रिया खालीलप्रमाणे मांडता येईल –

अष्टांगयोगाचे अनुसरण चित्तातील अशुद्धीचा क्षय क्रमश: ज्ञानप्राप्ती विवेकज्ञान अविद्येचा नाश पुरुष आणि दृश्य यांच्या संयोगाचा नाश दु:खाचा नाश = कैवल्य.

अशा प्रकारे योगशास्त्र मुख्यतः हेय, हेयहेतू, हान आणि हानोपाय या चार घटकांवर आधारित आहे. योगातील अन्यही सर्व विषयांचा अंतर्भाव या चारपैकी एका घटकात केला जाऊ शकतो. गौतम बुद्धांनी सांगितलेली चार आर्यसत्ये आणि योगशास्त्रातील चतुर्व्यूह या दोन संकल्पनांमध्येही समानता दिसून येते. योगशास्त्राची सैद्धांतिक रचना समजण्यासाठी चतुर्व्यूह संकल्पना अतिशय महत्त्वपूर्ण आहे.

पहा : अविद्या, दु:खत्रय, पुरुष, विवेकख्याति.

संदर्भ : ब्रह्मलीन मुनि, पातञ्जल योगदर्शन, चौखम्भा संस्कृतसंस्थान, वाराणसी, २००३.

समीक्षक : कला आचार्य