मायसीनी ही ग्रीसमधील एक प्राचीन नगरी आणि प्रागैतिहासिक कांस्य (ब्राँझ) युगातील इजीअन संस्कृतीतील महत्त्वाचा भाग. या नगरीच्या नावामुळे तिला मायसीनी संस्कृती हे नामाभिधान प्राप्त झाले. पुरातत्त्वीय अवशेषांवरून सर्वसाधारणपणे इ. स. पू. १४५० ते ११०० असा तिचा काळ मानण्यात येतो. होमरच्या इलियड या काव्यात या नगरीचा उल्लेख आहे. पॉसेनिअस या दुसऱ्या शतकातील ग्रीक भूगोलज्ञाने डिस्क्रिप्शन ऑफ ग्रीस या ग्रंथात या नगरीचे वर्णन केले आहे. त्याचा आधार घेऊन पुरातत्त्वज्ञ हाइन्रिख श्लीमान यांनी इ. स. १८७६-७८ दरम्यान येथे उत्खनन करून पाच थडग्यांचे अवशेष शोधून काढले. पुढे विसाव्या शतकात ब्रिटिश संशोधक ॲलन जे. बी. वेस यांनी या संशोधनास परिपूर्णता आणून मायसीनीचा इतिहास प्रसिद्ध केला. ॲकीयन ग्रीकांचे हे मुख्य केंद्र असले, तरी हेलाडिक संस्कृतीच्या प्रारंभिक हेलाडिक काळात (इ. स. पू. २९०० ते इ. स. पू. २०००) व मध्य हेलाडिक काळात (इ. स. पू. २००० ते इ. स. पू. १६५०) ग्रीकेतर लोकांनी येथे प्रथम वसाहती केल्या. त्याचे काही अश्मयुगीन व नवाश्मयुगीन अवशेष मिळाले आहेत; परंतु या नगरीच्या प्रगतीला खरा प्रारंभ इ. स. पू. १८०० ते १७०० दरम्यान झाला. ग्रीसच्या मुख्य भूमीवर इ. स. पू. १६५० पासूनच पुढे मायसीनीअन लोकांनी सत्ता प्रस्थापित केल्यावर संस्कृतीच्या शेवटापर्यंत : उत्तर हेलेडिक काळ – १ व २ (इ. स. पू. १६५० ते इ. स. पू. १४२५) व उत्तर हेलाडिक काळ – ३ (इ. स. पू. १४२५ ते इ. स. पू. ११००) अशा तीन काळांत विभाजन केले जाते. इ. स. पू. १४०० मध्ये नॉससचा व पर्यायाने मिनोअनांचा विध्वंस झाल्यावर मायसीनींची भरभराट झाली. ग्रीसमधील पेलोपनीस क्षेत्रातील मायसीनी, टायरिन्झ, पिलॉस, अथेन्स, थीब्ज, थेसालीतीरावरील आयोकोस (Iolkos) ही मायसीनीअन संस्कृतीची प्रमुख केंद्रे होती. मिनोअन व मायसीनीअन जीवनपद्धतींत काही भेद निश्चितपणे आढळत असले, तरी मायसीनीत स्थायिक झालेल्या ॲकीयन जमातींनी मिनोअन संस्कृतीच अधिक आत्मसात केलेली दिसते. मिनोअन नगरांभोवती तटबंद्या नाहीत; पण मायसीनीअन नगरांभोवती त्या आढळतात.
मायसीनीअन कला :
मायसीनीअन संस्कृतीवर मूलतः भूमध्यसागराच्या उत्तरेकडील व्यापारी लोकांच्या संपर्कामुळे त्यांच्या कल्पनांचा प्रभाव पडला होता. आयात केलेल्या वस्तूंमध्ये सोने, हस्तिदंत (प्रामुख्याने सिरियाच्या हत्तींचे), तांबे आणि काच यांचा समावेश होता. युद्धतंत्र हे मायसीनीअन संस्कृतीचे महत्त्वाचे अंग होते, हे त्यांच्या शिल्प-चित्रकलेतून दिसून येते. मृण्मुद्रा, हस्तिदंत तसेच धातुकामातून युद्धाची दृश्ये दाखवली आहेत. येथील उत्खननात हस्तिदंती मंजूषेवरील कोरीव काम, विविध सुवर्णालंकार, कलात्मक मुखवटे, भांडीकुंडी आदी वस्तू मिळाल्या. कट्यार-खंजीर, हस्तिदंती मंजूषेवरील शिकारीची दृश्ये, भित्तिचित्रे आणि मृत्पात्रांवरही भाला व तलवारी घेतलेले सैनिक चितारलेले आढळतात. ह्या शैलीवर मिनोअन शैलीचा प्रभाव प्रकर्षाने जाणवत असला, तरी विषय मूलतः मायसीनीअन आहेत. मिनोअन कलाकारांनी वापरलेले नैसर्गिक आकार, प्रवाही आकृतिबंध मायसीनीअन कलाकारांनी आत्मसात करून आणखी योजनाबद्धतेने मांडलेले दिसतात.
वास्तुकला – शिल्पकला :
मायसीनीच्या टेकडीच्या उंच भागी दगडी तटबंदीयुक्त किल्ला आहे. त्याच्या पडलेल्या भिंती, सिंहद्वार आणि दरवाजा आदी अवशिष्ट असून काही जडावाचे काम केलेली ब्राँझची हत्यारे आणि मृत्स्नाशिल्पे किल्ल्यात आढळली आहेत. या किल्ल्याभोवती दाट लोकवस्ती व किल्ल्यात राजाचा विस्तीर्ण प्रासाद असावा, असे उत्खनित अवशेषांवरून दिसून येते. प्रासादात विविध दालने, राजसभा (मेगारा), अंतःपूर इत्यादींचे भाग दिसतात. त्यांच्या भिंतींवर चित्रकाम आढळते. वास्तू आणि इतर अनेक अवशेषांवरून होमरने या भूमीला दिलेले ‘सुवर्णभूमीʼ हे नाव सार्थ ठरते. येथील थडग्यांचा समूह ‘शॅफ्ट ग्रेव्ह्जʼ या नावाने प्रसिद्ध असून थडग्यांची बांधणी मधमाशीच्या पोळ्याप्रमाणे सर्वत्र आढळते. त्यांत सापडलेले बहुविध अवशेष तत्कालीन समाजाच्या प्रगतीचे निदर्शक असून या अवशेषांपैकी एट्रीअसचे कोषागारसदृश थडगे (ट्रेझरी ऑफ एट्रीअस) आणि ॲगमेम्नॉनची पत्नी क्लायटम्नेस्ट्राची समाधी (टूम ऑफ क्लायटम्नेस्ट्रा) या वास्तू भव्य व कलात्मक आहेत. यांशिवाय जमिनीत विहिरीसारखे खड्डे खणून त्यांत बांधलेल्या समाध्यांतून एकोणीस सांगाडे मिळाले.
एकूण मायसीनीअन नगरांच्या तटबंद्या रुंद असून प्रचंड आकारांतील दगड एकावर एक ठेवून त्या बांधल्या होत्या. टायरिन्झ येथील टेकडीवर असलेल्या तटाची रुंदी सहा मीटर वा त्याहून अधिक आहे. नगरांत भिंती व प्रवेशद्वारेही ह्याच पद्धतीने बांधली जात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे टायरिन्झ येथे अद्यापि असलेले सिंहद्वार (इ. स. पू. १३००). हे सिंहद्वार मायसीनीअन वास्तुकलेतीलच नव्हे, तर इजीअन संस्कृतीतील सर्वांत मोठ्या आकारातील शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे. प्रवेशद्वाराच्या उभ्या स्तंभांवर त्रिकोणी आकारातील चुनखडीचा दगड बसविलेला असून त्यात एकमेकांकडे तोंड करून उभे असलेले दोन सिंह दाखविले आहेत.
पुरातत्त्वशास्त्रज्ञांना मायसीनी, टायरिन्झ, पिलॉस तसेच लाकोनिया येथील उत्खननांतून मायसीनीअन प्रासादांचे अवशेष मिळाले. मायसीनीअन लोकांनी क्रीटन लॅबीरिंथ (Labyrinth)- वरून प्रभावित होऊन त्याप्रमाणे आयताकृती रचना बांधल्या, त्यांना पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी राजसभा (मेगारा) असे नाव दिले. यामध्ये आलंकारिक प्रवेशद्वारे, द्वारमंडप असलेले प्रांगण तसेच सिंहासन असलेल्या सभागृहाकडे जाणारा कक्ष आणि गोलाकार शेगडी यांचा अंतर्भाव आहे. पेलोपनीस येथील तीन प्रासादांमध्ये प्रत्येकी दोन मेगारा दालने असून प्रत्येकात एका मदिरा कोठाराचा पुरवठा केलेला आहे. प्रासादामध्ये मेगाराशिवाय दोनमजली निवासी इमारत लाकूड व दगडांच्या साहाय्याने बांधलेली असून तिला लाकडी स्तंभांचा आधार दिलेला आहे. त्याव्यतिरिक्त प्रासादात कार्यशाळाही बांधलेल्या दिसतात. प्रासादाच्या बाहेरील भिंतींना चुनखडीचा दगड वापरून सजविले आहे, तर आतील भिंतींना गिलावा दिलेला असून काही महत्त्वाच्या भिंतींवर भित्तिलेपचित्रण केलेले दिसते. या संस्कृतीतील उल्लेखनीय शिल्पांमध्ये पक्वमृदेमधील (टेराकोटा) प्राणी व उभ्या असलेल्या स्त्रियांची अथवा मातृदेवतांची लहान आकारातील मृत्स्नाशिल्पे, हस्तिदंती आणि पाषाणशिल्पे आणि कलाकुसरयुक्त भांडी यांचा समावेश होतो. मायसीनी येथे मिळालेले दोन स्त्रिया व लहान मूल यांचे हस्तिदंती शिल्प सु. ७ सेंमी. उंच असून ते उल्लेखनीय आहे. यात एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीच्या (शीर तुटलेले आहे) खांद्यावर आपला डावा हात ठेवलेला दाखविला आहे. दोघीही बसलेल्या असून त्यांच्या समोर एक लहान मूल खेळताना दाखविले आहे. दोन्ही स्त्रिया कमरेच्या वरती नग्न दाखविल्या असून दोघींचे कमरेखालील शरीर एकाच वस्त्राने आच्छादलेले दाखवले आहे. मातृदेवतांच्या मूर्तींमध्ये सामान्यतः त्यांना लांब झगा घातलेला असून डोक्यावर शंक्वाकृती केशरचना व त्यांचे दोन्ही हात बाजूला उंचावलेले अथवा छातीवर घडी घातलेले दाखवले आहेत.
मृत्पात्रे :
ग्रीसच्या मुख्य भूमीतील आरंभीच्या काळातील मायसीनीअन मृत्पात्रांना ‘क्रीटन प्रांतीयʼ म्हटले जाते. ही मृत्पात्रे त्यांचे आकार व आलंकारिक शैली यांवरून मूळची ती क्रीटची असल्याचे म्हटले जात असले, तरी ती नॉसस व फायस्टॉस येथील मृत्पात्रांइतकी सफाईदार नसल्याचे लक्षात येते. मायसीनीअन मृत्पात्रांसाठी वापरलेली मृत्तिका ही मिनोअन मृत्तिकेपेक्षा चांगल्या दर्जाची असून ती जास्त तापमानावर भाजलेली होती. काही मृत्पात्रांवर चांदी व कांस्यासारख्या दृश्य परिणामासाठी कथिलाचा मुलामा दिलेला दिसतो. मायसीनीअन लोकांनी सर्वांत जास्त पसंत केलेल्या मृत्पात्रांमध्ये उंच पाया असलेली पात्रे (कप), एका कानाची चहाची पात्रे, दारूसाठी मोठ्या कानाची पात्रे, तोटी अथवा उभ्या पट्ट्यांच्या बनवलेल्या मुठी असलेल्या सुरया अशा विविध प्रकारांचा समावेश होतो.
सर्वांत लोकप्रिय असे मृत्पात्र म्हणजे दोन कड्या असलेले भांडे (double stirrup jar). यात पात्रांच्या कान अथवा मुठींवर मध्यभागी तोटीसारखे वाटावे म्हणून अलंकरण केलेले असे, तर खरी तोटी मुठीपासून बाजूला वेगळी जोडलेली असे. दुसरे महत्त्वाचे लोकप्रिय भांडे म्हणजे विविध आकारांतील बसके भांडे (squat jar). यांतील बरीच पात्रे सुरुवातीच्या काळातील अलबास्टर दगडापासून तयार केलेल्या मृत्तिकेपासून बनवण्यात आलेली आहेत. सारकॉफगी (sarcophagi) मृत्तिकेपासून तयार केलेली शंकूच्या आकारातील मृत्पात्री धार्मिक उत्सवाच्या वेळी मद्य ओतण्यासाठी वापरत असत. मिनोअन कलाकारांप्रमाणे मायसीनीअन कलाकारांनीही सागरी जीवन, प्रामुख्याने अष्टपाद आणि कालवे, चित्रित केलेले दिसते. मृत्पात्रांच्या आकाराप्रमाणे त्याचा जास्तीत जास्त पृष्ठभाग अलंकरणाने व रेषांनी व्यापलेला दिसतो. चित्रांत मानवाकृती, रथ असे आकार रेखाटलेले दिसतात. त्रिक गाठी, दुहेरी अक्ष आणि सुळेयुक्त शिरस्त्राण ह्यांबरोबर प्राणी, पक्षी, ग्रिफीन्ससारख्या राक्षसी प्रतिमा, रेषा व पट्टीतील नियमित रचनांचे अलंकरण दिसते. उत्तर काळात इतर रूपचिन्हांबरोबर लिली, ताड आणि आयव्हीचे रेखाटन प्रामुख्याने मोठ्या भांड्यांवर केलेले दिसते. काही मृत्पात्रांवर फक्त एकसारखेच रूपचिन्ह पात्राच्या दोन्ही बाजूंस रेखाटून बाकी पृष्ठभाग रिकामा ठेवलेला दिसतो. उदा., इफिरीअन पानपात्र (Ephyrean Goblet). एकंदरीत मायसीनीअन कलाकारांनी त्यांची स्वतःची विशेष शैली साध्य केलेली दिसते.
चित्रकला :
मायसीनीअन आणि मिनोअन भित्तिलेपचित्रणांत खूप साम्य आढळते. मायसीनीअन भित्तिलेपचित्रणाचे फारसे अवशेष उपलब्ध नाहीत. मात्र भित्तिलेप चित्रणपद्धती त्या वेळी प्रचारात असावी, असे तत्कालीन भित्तिचित्रांवरून दिसून येते. मोठ्या आकारांत दाखविलेल्या आकृत्या मायसीनीअन भित्तिलेपचित्रणाचे प्रमुख वैशिष्ट्य होय. भित्तिलेपचित्रांमध्ये वनस्पती, ग्रिफीन, सिंह, वळू उडविणारे, युद्धाचे प्रसंग, सैनिक, रथ, इंग्रजी आठ (8) च्या आकारातील ढाली, रानडुकराची शिकार असे प्रसंग चित्रित केलेले दिसतात. मायसीनी येथून मिळालेल्या भित्तिलेपचित्रणाच्या एका अवशेषात तंग आवरण घातलेल्या स्त्रीच्या रेखाचित्रात तिने गळ्यात घातलेल्या हारासारखाच एक हार एका हातात घेतलेला दाखविला आहे.
धातुकाम व दागिने :
मायसीनीअन लोकांची धातुकामातील प्रगती विशेष उल्लेखनीय होती. त्यांनी बनविलेल्या धातूच्या वस्तू व दागिन्यांमध्ये विविध प्रकार आढळतात. उदा., अमूर्त आकार व फुलांचे नक्षीकाम असलेल्या कपड्यांसाठी लागणाऱ्या जोडवस्तू तसेच सोन्याचे बक्कल, पिना, बारीक तपशील असलेले नक्षीदार शाही मुकुट, हार, उठावदार दृश्यांचे नक्षीकाम असलेली सोन्या-चांदीची पात्रे व इतर भांडी. रोजच्या वापरातील भांडी व घडेही तांबे आणि कांस्याच्या पत्र्यापासून तयार केलेले आढळतात. यांशिवाय महत्त्वाच्या वस्तू म्हणजे उच्च दर्जाची कारागिरी असलेली कट्यार, तलवारी, कांस्याची बनवलेली पाती. मायसीनीअन धातू-शिल्पातील सर्वांत लक्षवेधी वस्तूंमध्ये इ. स. पू. १६०० मधील सोन्याच्या पत्र्यात बनवलेले राइतॉन (rhyton) व अंत्यविधीचा मुखवटा (death/funeral mask) यांचा समावेश होतो. हे सोन्यातील राइतॉन पात्र ठोकून ठोकून सिंहाच्या डोक्याच्या आकाराचे बनवलेले आहे. याचे वेगळेपण म्हणजे या पात्राला आयाळ दाखविलेली असून द्रव ओतण्यासाठी जाळी अथवा भोक ठेवलेले आहे. शाही दफनविधीच्या वेळी या धार्मिक भांड्याचा उपयोग केला जात होता. विद्वानांच्या मते, सिंह हा प्रतीकात्मक रीत्या नैसर्गिक ताकद व अंमल सूचित करण्यासाठी वापरला असावा. या सोन्यातील अंत्यविधीच्या मुखवट्याला श्लीमान यांनी ‘ॲगमेम्नॉनचा मुखवटाʼ असे नाव दिले. ॲगमेम्नॉन (Agamemnon) हा मायसीनीचा राजा होता. मुखवट्यामध्ये दाढी असलेला भारदस्त चेहरा दाखवलेला आहे. मुखवट्यावरील भुवया, दाढी, मिशी यांचे बारकावे रेषांनी दाखविलेले दिसतात. कानावर असलेल्या भोकांवरून मुखवटा मृत व्यक्तीच्या चेहऱ्याला बांधण्यासाठी वापरला जात असावा, असे वाटते.
क्रीट-मायसीनीअन शैलीतील सोन्याच्या पत्र्यात बनविलेली दोन उत्तम दर्जाची वाफियो (Vapheio) पात्रे मिळाली आहेत. या पात्रांच्या बाहेरील बाजूवर उत्थित शिल्पे काढलेली आहेत. पहिल्या पात्रावर बैल गाईबरोबर समागम करत असताना एक पुरुष बैलाच्या पायाभोवती दोर बांधत आहे व इतर तीन बैल चरत आहेत, असे दृश्य दाखवले आहे; तर दुसऱ्या पात्रावर माजलेल्या बैलांना पकडण्याचे दृश्य दाखविले आहे. त्यात एक बैल जाळीत पकडलेला असून दुसरा बैल दोन शिकाऱ्यांवर हल्ला करत आहे व तिसरा शिकारी हवेत उडालेला दाखविला आहे. पात्रांच्या शैलीवरून दोन्ही पात्रे एकाच कारागिराने केली असावीत; परंतु पहिले पात्र जास्त नाजूकपणे हाताळलेले दिसते. यांशिवाय रत्नांवर बारीक कोरीवकाम असलेल्या अनेक मुद्रा मिळाल्या आहेत. सिंहाचे डोके असलेल्या दानवांची मिरवणूक दर्शविणारी सोन्याची अंगठी हस्त-कारागिरीचे उत्तम उदाहरण आहे. अंगठीवर हातात मंदिराचे पात्र घेतलेले चार सिंह कोरलेले असून ते सिंहासनावर बसलेल्या राणी वा देवीकडे जात आहेत, असे दाखविले आहे. देवीने लांब झगा घातलेला असून तिने विधीचे पात्र समोर उंचावून धरले आहे. देवीच्या आसनामागे सत्तेचे प्रतीक असलेला गरुड दाखवला आहे, तर सूर्य आणि चंद्रही आकाशात कोरलेले दिसतात.
संदर्भ :
- Betancourt, Philip P. Introduction to Aegean Art, Philadelphia, 2007.
- Hafner, German, Art of Crete, Mycenae and Greece, New York, 1968.
- Higgins R. Minoan and Mycenaean Art, Thames & Hudson, 1997.
- Nelson, Glenn C. Ceramics : A potter’s handbook, Duluth, 1971.
समीक्षक : नितीन हडप