प्राचीन भारतातील एक बलाढ्य राजवंश असलेल्या सातवाहनांचा इतिहास त्यांच्या नाण्यांवरून अधिक विश्वसनीय ठरतो. सातवाहन नाण्यांचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्यांची नाणी ठरावीक भूभागांशी संबंधित आहेत. भौगोलिक कक्षेने मर्यादित आणि समकालीन नागरी वस्त्यांनी निर्देशित अशा प्रकारची चलनव्यवस्था या मौर्योत्तर कालखंडाचे एक वैशिष्ट्य मानायला हरकत नाही; किंबहुना हा नाणकशास्त्रीय परिणाम पूर्ण भारतभर दिसून येतो.
नाण्यांच्या पुराव्यांवरून त्यांचा उदय इ. स. पू. १५० च्या सुमाराला दक्षिण विदर्भ आणि उत्तर तेलंगणात झाला, असे दिसते. मौर्योत्तर काळात प्राचीन ‘दक्षिणापथा’त अनेक लहान-लहान स्वतंत्र राजघराण्यांचा उदय झाला. त्यांपैकीच सातवाहन हे एक होते. त्यांतील वासिष्ठीपुत्र सिमुक (श्रीमुख) नावाच्या राजाने पैठण-नेवासे (मराठवाडा) प्रांत व्यापून तेथून उत्तरेला नाशिक आणि दक्षिणेला वाई-कऱ्हाड या भागांत आपला अंमल बसवला आणि सातवाहन घराण्याच्या साम्राज्यवर्धनाला सुरुवात झाली. त्यांची सर्वांत प्राचीन नाणी नेवासे-पैठण भागाशी विवक्षित अशा ‘हत्ती’ प्रकारची आहेत. सातवाहन घराण्याचा मूळ पुरुष ‘सातवाहन’ याच नावाचा राजा होता, असे मत काही नाण्यांच्या आधारे वा. वि. मिराशी यांनी मांडले होते; पण नाण्यांचा अभ्यास करता ‘सातवाहन’ असे नाव असणारी बरीच उत्तरकालीन नाणीही आता ज्ञात झाली आहेत. ती घराण्याच्या नावाला लेखात प्राधान्य देऊन काढली असावीत. दक्षिण भारतात सातवाहनांनी प्रथम राजनामांकित नाणी पाडण्यास आरंभ केला. ती तांबे, शिसे, पोटीन (potin) व काही प्रमाणात चांदीची नाणी होती. त्यांना ‘कार्षापणʼ ही संज्ञा असून नागनिकेच्या नाणेघाटातील लेखात विविध श्रौत यज्ञांत हजारो कार्षापणांची दाने दिल्याचा उल्लेख आहे. नाण्यांवरील लेख प्राकृत भाषेत असून ब्राह्मी व खरोष्ठी लिपीचा प्राधान्याने उपयोग केला आहे.
सिमुकानंतर झालेला राजा सातकर्णी (सातकणी) याने सातवाहनांची साम्राज्यकक्षा पैठण-नाशिक-जुन्नर या महाराष्ट्रातल्या प्रांतांपासून विदर्भ आणि खानदेश, माळव्यातल्या नर्मदा आणि बेतवा या नद्यांच्या खोऱ्यांत असलेल्या नागरी वस्त्या तसेच जबलपूर-नजीकचे त्रिपुरी हे प्राचीन शहर येथपर्यंत वाढवली. या सर्व भूभागांतून सातकर्णीच्या नावाने पाडलेली अनेक विवक्षित प्रांतिक प्रकारांची नाणी ज्ञात आहेत. या नाण्यांवर हत्ती, सिंह, इत्यादी राजपददर्शक प्राणी, कुंपणातील झाड, नंदिपद, स्वस्तिक वगैरेंसारखी चिन्हे आणि सातवाहन घराण्याचे राजचिन्ह म्हणता येईल असे ‘चंद्रकोर-अंकित उज्जैन चिन्ह’ इत्यादी प्रकारविशेषांचा समावेश आहे. किंबहुना, सातकर्णीचा काल हा प्रकारशास्त्रीय ‘भौगोलिक विवक्षितते’चा कळसाध्याय म्हणायला हरकत नाही. सातकर्णी आणि त्याची पट्टराणी नागनिका या दोघांच्या संयुक्त नावाने पाडलेली नाणी हा प्राचीन भारतीय नाणकशास्त्रातला एक अनुपम प्रकारशास्त्रीय आविष्कार मानला जातो. ‘गजलक्ष्मी’ सारख्या दैवताचे चित्रणही सातकर्णीच्या नाण्यांवर दिसते.
सातकर्णीच्या कारकिर्दी अखेरीस सातवाहन साम्राज्य दोन किंवा तीन वेगवेगळ्या राजांच्या आधिपत्याखाली विभागले गेले, असे नाण्यांवरून दिसते. साति सिरी, जो सातकर्णीचा मुलगा होता आणि सिमुक हे साम्राज्याच्या पूर्व भागात राज्य करू लागले, असे त्यांची नाणी दर्शवतात. विदर्भ/उत्तर तेलंगण भागात राज्य करणारा सिमुक आणि सातवाहन घराण्याचा उद्गाता सिमुक हे दोन भिन्न राजे असल्याचे नाण्यांवरून स्पष्ट झाले आहे.
सातकर्णीच्या उत्तर काळात त्याचे नाव सातवाहन घराण्यात उपनावाप्रमाणे वापरले जाऊ लागले. कोसिकीपुत्र सातकर्णी आणि कोछीपुत्र सातकर्णी या सातवाहन राजांची माहिती मुख्यत्वे नाण्यांमुळे ज्ञात होते. या राजांचे राज्य फक्त महाराष्ट्राच्या काही भागांपुरतेच मर्यादित होते. या दोघांची नाणी हत्ती, सिंह, तीन कमानींचा पर्वत, इत्यादी चिन्हांनी मंडित आहेत. यानंतरच्या काळात सातवाहन घराण्याला उतरती कळा लागली आणि त्यांच्या महागामिक, महासेनापती, महाभोज इत्यादी मांडलिकांनी स्वतःची नाणी प्रचारात आणली.
रोमानांशी व्यापार सुरू झाल्यानंतर त्यांच्या चांदीच्या नाण्यांच्या रूपाने भारतात व्यापार होऊ लागला. या सुमारास शक क्षत्रपांनी सातवाहनांवर राजकीय वर्चस्व प्रस्थापित केले. परिणामतः त्याचे पडसाद सातवाहन नाण्यांत उमटलेले दिसतात. शक राजा नहपान तसेच सातवाहन राजे शिव सातकर्णी आणि गौतमीपुत्र सिरी सातकर्णी यांनी एकमेकांची नाणी पुनर्मुद्रित केली. गौतमीपुत्र सातकर्णीने पुनर्मुद्रित केलेल्या नहपानाच्या नाण्यांचा एक मोठा साठा जोगळटेंभी (नाशिक जिल्हा) येथे सापडला (१९०७). गौतमीपुत्राने नहपानाचा पराभव केला. त्याच्या कारकिर्दीपासून सातवाहन साम्राज्याची नव्याने वाढ झाली आणि त्यांच्या नाण्यांचे स्वरूपही बदलले.
गौतमीपुत्राचा मुलगा वासिष्ठीपुत्र सिरी पुळुमावी (कार. इ. स. १०६-१३०) याने सर्वप्रथम स्वतःची छबी असणारी चांदीची नाणी प्रचलित केली. पुळुमावीच्या कारकिर्दीत सातवाहनांचा राज्यविस्तार दक्षिण आणि पूर्वेकडे झाला. या प्रांतात त्याने सिंह, तीन किंवा सहा कमानींचा पर्वत इत्यादी प्रकारांची नाणी काढली. याशिवाय पुळुमावीची साम्राज्यात सर्वत्र चालणारी ‘हत्ती’ प्रकारची नाणीही प्रचलित होती. साम्राज्याच्या अर्थव्यवस्थेचे ‘नाणकीय केंद्रीकरण’ करण्याच्या दृष्टीने चांदीची छबीयुक्त नाणी आणि ही ‘हत्ती’ प्रकारची नाणी या दोन मूल्यांकांचे प्रचलन महत्त्वाचे ठरते.
पुळुमावीनंतर त्याच्या अनेक वारसदारांनी छबीयुक्त नाणी पाडली. यात सिव सिरी पुळुमावी, सिरी सातकर्णी, खद (स्कंद) सातकर्णी आणि विजय सातकर्णी, तसेच यञ (यज्ञश्री) सातकर्णी यांचा समावेश होतो. उत्तरकालीन सातवाहन राजांचीही छ्बीयुक्त नाणी ज्ञात आहेत. यज्ञश्री सातकर्णीची जहाज, नौका छापाची नाणी विशेष उल्लेखनीय आहेत. सातवाहनांच्या नाविक संबंधांचे आणि सामर्थ्याचे सुस्पष्ट चित्रण या नाण्यांतून आढळते.
बहुतेक सातवाहन नाण्यांवर लेख आढळतात. ते माहाराष्ट्री प्राकृत भाषेत आणि ब्राह्मी लिपीत लिहिलेले आहेत. लेखांची सुरुवात राजपददर्शक ‘रञो’ शब्दाने होते आणि ते षष्ठी विभक्ती-रूपात, म्हणजेच नाणे कोणा‘चे’ आहे, ते दर्शवतात. चांदीच्या छबीयुक्त नाण्यांवर माहाराष्ट्री आणि दक्षिणी अशा दोन प्राकृत भाषांतील लेख आढळतात. प्रदेशपरत्वे तेथील परिचित लिपीत त्यांवर लेख कोरले आहेत.
सातवाहन नाणी ही मुख्यत्वे ठशांचा वापर करून बनवली असली तरी प्रारंभीच्या काळातील आहत नाणीही ज्ञात आहेत. बहुतेक नाणी मिश्र धातू स्वरूपात असून तांबे, शिसे, जस्त इत्यादी धातूंना प्राधान्य होते. आंध्र-कर्नाटकातील नाण्यांत शिशाच्या नाण्यांची बहुलता आढळते. सातवाहन राजांची कालनिश्चिती, त्यांचा साम्राज्यविस्तार, धार्मिक धोरण, वित्तीय बदल आणि त्यांचा व्यापार-उदीम इत्यादी बाबींवर त्यांची नाणी प्रकाश टाकतात.
संदर्भ :
- Bhandare, Shailendra & Garg, Sanjay, Eds., ‘Linking the Past : Overstruck Coins and Chronology of the Satavahanasʼ, Felicitas : Essay in Numismatics, Epigraphy and History in Honour of Joe Cribb, 2011.
- मिराशी, वा. वि. सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास आणि कोरीव लेख, मुंबई, १९७९.
समीक्षक : मंजिरी भालेराव