भोकरदन हे ठिकाण जालना जिल्ह्यातील केळना नदीच्या उजव्या तीरावर वसले आहे. प्राचीन ‘भोगवर्धनʼचे पुरावशेष नदीच्या दोन्ही बाजूंना पांढरीच्या टेकाडांच्या रूपाने दृष्टीस पडतात. हे स्थल औरंगाबादपासून ६४ किमी. अंतरावर असून अजिंठा मार्गावर आहे. सातवाहन काळात हे एक प्रमुख व्यापारी केंद्र असल्याचे १९५८-५९ मध्ये विख्यात पुरातत्त्वज्ञ मधुसूदन देशपांडे यांच्या लक्षात आले. हे केंद्र प्राचीन व्यापारी मार्गावर होते व उज्जैन आणि पैठण या तत्कालीन महत्त्वपूर्ण केंद्रांशी तसेच जुन्नर, कार्ले, कान्हेरी, कल्याण इत्यादी केंद्रांशी जोडले गेले होते. मध्य प्रदेशातील सांची व भारहूत येथील शिलालेखांत या केंद्राचा येथील दानकर्त्यांच्या अनुषंगाने उल्लेख आढळतो. त्याचप्रमाणे मार्कंडेय पुराणातही भोगवर्धनचा उल्लेख येतो. येथे बौद्धधर्मीयांचे अनुयायी मोठ्या संख्येने राहत असावेत, असेही अनुमान केले गेले आहे. प्राचीन भोगवर्धन हे सध्याचे भोकरदन असल्याची खात्री होण्यासाठी, तसेच तत्कालीन भोगवर्धनचे महत्त्व जाणून घेण्याकरिता येथे १९७३-७४ या कालावधीत उत्खनन केले गेले. नदीच्या डाव्या भागाला, आलापूर या गावाच्या हद्दीत असलेल्या दोन पांढरीच्या टेकाडांचे  पुरातत्त्वज्ञ शांताराम देव व रमेश गुप्ते यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्तपणे विस्तृत उत्खनन करण्यात आले.

उत्खननात दोन कालखंड आढळले. पहिल्या कालखंडात सातवाहनांचा आद्य व उत्तर काळ; तर दुसऱ्या कालखंडात क्षत्रपांच्या उत्तर काळाचे पुरावशेष निदर्शनास आले.  पहिल्या आद्य सातवाहन काळातील वास्तूअवशेषांनुसार यांची घरे आकाराने लहान, भिंती मातीच्या तर लाकडी खांबांच्या आधारावर कवेलू आच्छादित छप्पर होते. संपूर्ण घराची योजना कशी होती, याची कल्पना करता आली नाही; मात्र सातवाहनांच्या उत्तर काळातील अवशेष अधिक बोलके असून त्यांनुसार तत्कालीन समृद्ध भोगवर्धनच्या वैभवाची कल्पना करता येते. या काळातील घरे आकाराने मोठी, विटांच्या भिंतींची व योजनापूर्वक पायाभरणी केलेली आढळतात. या घरांची छपरे कवेलू आच्छादित होती. प्रत्येक कवेलू लाकडी वाशांवर घट्ट टिकून राहाण्याकरिता कवेलूंना दोन जागी भोक असे; जेणेकरून ती तारांनी लाकडी वाशांना बांधता येत. ही छपरे लाकडी खांबांच्या आधारावर होती. सर्वसाधारण घर पडवी, बैठकखोली व स्वयंपाकघर अशा तीन भागांत विभागले होते. स्वयंपाकघरात धान्य व इतर काही वस्तू वा पाणी यांची साठवणूक करण्याकरिता मोठाली कुंडे होती. तसेच स्वयंपाकघरातील वापरलेल्या पाण्याचा निचरा होण्याकरिता दोन प्रकारच्या शोषणकुंडांची व्यवस्था दिसून आली. पहिल्या प्रकारामध्ये भाजलेल्या मातीच्या कड्या एकावर एक ठेवून  विहिरसदृश आकार दिलेला होता; तर दुसऱ्या प्रकारामध्ये मातीच्या कड्यांच्या जागी विटांचा वापर करून विहिरसदृश रचना केलेली होती. अशा स्वरूपाच्या रचनांमुळे सांडपाणी जमिनीत शोषून घेतले जाई. अशा प्रकारच्या व्यवस्थेमुळे सांडपाणी परिसरात न पसरता जमिनीमध्ये त्याचा निचरा होई. वसाहतीचा विस्तार मात्र योजनापूर्वक आढळत नाही. पाच घरांचा समूह तसेच सभोवताली अरुंद रस्ते अशी वसाहतरचना होती.

सातवाहनांच्या भरभराटीच्या काळात मातीच्या भांड्यांचे असंख्य प्रकार आढळतात. रोमन मद्यकुंभ, रेड पॉलिश वेअर व मेगॅरियन वेअरसारख्या भांड्यांचे अवशेष रोम देशाशी असलेले सांस्कृतिक तसेच व्यापारी संबंध अधोरेखित करतात. विविध धातूंची सु. ४०० नाणी,  निम-मौल्यवान पाषाणांपासून घडवलेले १००० मणी, असंख्य अर्चनाकुंडे, कानातील अलंकार, शंखाच्या बांगड्या, बौद्धधर्माशी निगडित प्रतीके असलेले दगडी पाटे मिळतात. यांव्यतिरिक्त काही धान्यांचे नमुने आढळले आहेत. यावरून तत्कालीन आर्थिक परिस्थितीची कल्पना करता येते.

भोकरदन उत्खननातील सर्वांत उल्लेखनीय वस्तू म्हणजे अप्रतिम हस्तिदंताची स्त्री-प्रतिमा कोरलेली आरशाची मूठ. ही प्रसाधन या वर्गात मोडणारी वस्तू प्रथमच स्तरनिबद्ध संदर्भासह अवगत झाल्याने तिचा काळ निश्चितपणे सांगता आला. त्याचप्रमाणे भोकरदन हे हस्तिदंतकलेचे एक केंद्र होते, असे अनुमानही करता आले. पाँपेई (इटली) व तेर (महाराष्ट्र, भारत) येथे सापडलेल्या हस्तिदंती प्रतिमांचे साधर्म्यही नोंद घेण्यासारखे आहे.

सातवाहन काळात भोकरदन विविध कलाकुसरीचे तसेच विविध उद्योगधंद्यांचे केंद्र होते, मात्र सातवाहनांच्या अस्तानंतर येथील वैभव लयास गेले. इसवी सनाच्या आठव्या शतकात येथे शैवपंथीयाचा प्रभाव होता, असे शेजारी असलेल्या शैलगृहावरून सांगता येते. मध्ययुगीन काळात येथे पुन्हा वसाहत झाली.

संदर्भ :

  • Deo, S.B. & Gupte, R.S. Excavations at Bhokardan (Bhogvardhan): 1973, Nagpur University, Nagpur, 1974.
  • Deotate, B.C., Joshi, P.S. & Parchure, C.N. Glimpses of Ancient Maharashtra, Bharatiya Itihas Sankalan Samitee and Deccan College Post-Graduate and Research Institute, Pune, 2013.

समीक्षक – अरुणचंद्र पाठक

This Post Has One Comment

  1. Ajay Santram Jawale

    It’s very important and helping information to research.. Thanks sir….

प्रतिक्रिया व्यक्त करा